Thursday, January 18, 2018

काव्यप्रतिपूर्ती

ज्ञानभाषामराठी पंधरवडा
उपक्रम-चला भेंड्या खेळू!!
दिनांक-आज १२ जानेवारी
वेळ-रात्री ८ ते १०
काव्यप्रतिपूर्ती
प्रत्येकाच्या मनात भावनांचे,विचारांचे तरंग उठलेले असतात. फक्त गरज असते ती त्यांना मोकळे होण्यास वाव देण्याची.
ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान चला भेंड्या खेळू!! या उपक्रमातून तुमच्या काव्य तरंगांना मोकळी वाट करून देत आहे.
चला तर मग!!
आम्ही एक चारोळी देऊ. त्यावर आधारित त्यातील शब्दाचा/अर्थाचा वापर करून *काव्यप्रतिपूर्ती (counter) करणारी चारोळी तुम्ही (समूहातील सदस्यांनी) तयार करा* आणि तुमच्यातील काव्यकल्पनेला मोकळे करा.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
ज्ञानभाषामराठी पंधरवडा
उपक्रम-चला भेंड्या खेळू!!
चला सुरू करा...
काव्यप्रतिपूर्ती
मनातलं गूज ओठांवर
आणता आलं पाहिजे...
आपलंच गाणं आपल्यालाच
म्हणता आलं पाहिजे...
© डॉ. अमेय गोखले.
वरील चारोळीवर आधारित त्यातील शब्दाचा/अर्थाचा वापर करून काव्यप्रतिपूर्ती (counter) करणारी चारोळी तुम्ही (समूहातील सदस्यांनी) तयार करा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

♦️गीत मी गाईल
पण ऐकेल का कोणी ?
मनातले ते गूज
ओळखेल का कोणी ?....किशोर झोटे,औरंगाबाद.
♦️ओठांवर येताना,
शब्द मध्येच थांबले
अलगद डोळे मिटले
आणि रूप तिचे पाहिले.......सुचिकांत
♦️भेट तुझी होणार म्हणून
हुरहूर लागली जीवाला
अलगद उलगडले शब्द
अन गीत लागले उमलायला......मृणाल
♦️अंतरातील भावना शब्दात
मांडता आल्या पाहिजे
वेदनांचे खोलवर सल
गाडता आले पाहिजे......©विजया पाटील,नवापूर
♦️नयनातील पाणी अलगद
टिपता आले पाहिजे
उरी दुःख घेऊनही
हसता आले पाहिजे......©विजया पाटील,नवापूर
♦️खळाळणा-या पाण्यासारखं
वाहता आलं पाहिजे
वाहणाऱ्या वा-यासारखं
डुलता आलं पाहिजे.......विजया पाटील,नवापूर
♦️गूढ जे मम ओठांवरी
तेच माझ्या अंतरी
वाच माझ्या नयनामधे
गीत माझे साधेसुधे.......अरविंद खानोलकर
♦️मनातलं गूज लपता लपेना
ह्रदयातली स्पंदने डोळे लपायला देईनात
ओठ आणि जीभेनेही संगनमत केले
आणि अंतरातले गाणे माझे ओठावर आले.....विद्या पाध्ये
♦️गाणे स्वछंदी आनंदी
गाता यायलाची हवे
मनातले ओठांवर
"ते" - मुक्त तुषार थवे•••••••संदीप बोबडे
♦️आज येऊदे ओठांवरती
गूज खोल अंतरीचे
त्याच सूरांनी झंकारु दे
गोड तराणे मन्मनीचे...अंजली जोशी
♦️आपण म्हटलेलं गाणं
गाणंच वाटलं पाहिजे..
योग्य त्या हृदयातच
रुजवता आलं पाहिजे....संदेश काटकर
♦️शब्द - गाणं
जीवन आहे सप्तसुरांनी बहरलेलं मधुर गाणं,
कडू गोड अनुभवांचं सुंदर लेणं
चला या सप्तसुरात न्हाऊन जाऊया,
जीवनाचे गाणे आनंदाने गाऊया.....मिताली तांबे,मुंबई
♦️गीत माझे सुरांवर
हिंदोळा झुलतात
गुज मनीचे जणु
हळुवार खोलतात........©विजया पाटील,नवापूर
♦️गुज माझ्या मनातले
शब्दरूप घेऊ दे
गीत माझे गाईन मी
सुर ओठी येऊ दे.........सुचेता गोखले.
♦️गुज ऐसे माझे गाणे व्हावे
मुक्त मोकळे मी डुंबून जावे
पंख पसरूनी दूर उडावे
अलगद - तुझ्या - ओठी विसावे
गुज ऐसे माझे गाणे व्हावे............@ संदीप बोबडे
♦️आपलं गाणं आपल्याला
म्हणता आलं पाहिजे
याला नक्कीच अर्थ आहे |
पण ऐकणारा श्रोता
आपला नसेल तर
सर्व काही व्यर्थ आहे ||.........अजित तिजोरे
♦️सूर अंतरीचे
अलगद कुणी झंकारले
गुपित मनीचे
आज अधरावरती उमटले.......रोहिणी बागल
♦️गाणे गावे असे की
न सांगता कोणालाही कळावे
भाव प्रेमाचा असावा।
पण खुणगाठ इतराशी समजावे।
न सांगता
फक्त शब्दच बोलावे।......डॉ.राजीव डोंगरदिवे
♦️आयुष्य सोसलेले
काळजात ते जपावे,
शब्दांत उतरूनी यावे
आयुष्य भोगलेले.
♦️खुपलेले जे सारे
ते खोलवर रुतावे,
तरी ओठांवर फुलावे
केवळ सुख-तराणे............-स्वागत थोरात
♦️शब्द शब्द फुल बनुनी
आसमंत दरवळला पाहिजे ...
भावस्पर्श ओठांतूनी
ओसंडला पाहिजे ....
आपलंच गाणं आपल्यालाच
म्हणता आलं पाहिजे .....प्रदीप बाजी
♦️गीत जीवनाचे ते
गातच रहावे
दु:ख जरी पर्वताएवढे
हासत पेलावे.....विकास कांबळे
♦️मनात जपले गुज
मी - विणले शब्द शब्द •••
आनंदाने (आनंदाचे) गाणे माझे
माझ्या  ओठी झाले बद्ध .......संदीप बोबडे
♦️गूज मनीचे तुला सांगते।         
ह्दयी तुझेच गीत झंकारते।
ओठांच्या तव हालचालीतून ।    
तुझ्या मनीचा भाव जाणते।.......©चंदा वाडकर.
♦️गाणे तुझे , गाणे माझे
मिळुनी सजवू मैफिल सृष्टीची
सूर तुझे , सूर माझे
मिळुनी छेडू तार अंतरीची.......अजित तिजोरे
♦️बोलण्यात घालवा वेळ
लिहिण्याचा बसवा मेळ
अलगद झेलावा शब्द
हाच शब्दांचा खेळ..........डॉ.तृप्ती लोणकर
♦️मनतरंग माझे तुझिया
झंकारतील का ओठी..?
या मधाळ युगलगीताची
घट्ट होईल का मिठी.??........श्री.गणेश तुलसी
♦️चढ उताराच गाणं
गाता यायला हवं
अनुभवांची शिदोरी घेऊन
पुढं जायला हवं ......श्री मास्तर नादवडेकर मुंबई
♦️गुज माझे भगवद्गीता
मी गुणगुणतो ओठांवरी
पावतो नंद आनंद सारा
गाणे माझे जणू - ज्ञानेश्वरी.......संदीप बोबडे
♦️आपण म्हटलेलं गाणं
गाणंच वाटलं पाहिजे..
योग्य त्या हृदयातच
रुजवता आलं पाहिजे....संदेश काटकर
♦️मैफिलीत अशा आज
मन मोकळे ते झाले
हृदयातील गोड गुज
अलवार ओठांवर आले...©विजया पाटील,नवापूर
♦️मनातल्या मोरपीसांना
वाट का फुटेना ?
आपुल्याच गीतांना
सूर का उमटेना ?......विवेक देवस्थळी
♦️आयुष्यात थोडासा रंग
आणता आला पाहिजे
सुंदर असं नक्षीकाम
विणता आलं पाहिजे......दुशंत पाटील
♦️आयुष्यातल्या अानंदांना
गुणता आलं पाहिजे
अानंदाच्या नशेमध्ये
भिनता आलं पाहिजे......दुशंत पाटील
♦️प्रयत्न केले अनेक
वाटले व्हावे ते सार्थ
शब्द दिले निवडीचे
न व्हावा कुठे - अनर्थ.....संदीप बोबडे
♦️गूज अंतरीचे
काव्यातून  यावे  ओठी
प्रेम  अंतरीचे 
गाण्यातून  गाण्यासाठी......तुकाराम गायकर
♦️गाणं म्हणायच म्हणुन
शब्दांना  ओवायला पाहिजे
उसवलेल्या भावनांना
हळुवार शिवायला पाहिजे.....धिरज लोके (डोंबिवली)
♦️शब्दांना साथ असावी ओल्या मायेची,
मायेला साथ असावी हळुवार भावनांची,
भावनांना साथ असावी स्वच्छ मनाची,
मनाला साथ असावी सदैव प्रेमाची.....मिताली तांबे, मुंबई
♦️माय मराठीची समृद्धी
चला हळुवार उलगडु या
गुज तिचे जाणुन घेवुनी
गीत तिचेच हो गाऊ या.....©विजया पाटील,नवापूर
♦️गाणं आपल्या मनाचं
ओठावरच्या सणाचं
आनंदाच्या झऱ्याचं
मोहरणाऱ्या सणाचं......नीता सावंत
♦️गीत माझे सूर तुझे..
अधरावरी येतील का..?
स्वप्नातील मैफिलीची
तान तू घेशील का..?....प्रश्नांकित कवी( तुलसी)
♦️वेदनांचे तराणे छेडून
सुखाचे सुरेल संगीत गाते
मनातल्या गूजगोष्टी ओठी आणून
जीवनाची मैफिल सजवते......चंदा वाडकर
♦️आपलं गाणं असतो आपलाच श्वास
ते असत मनातलं गुपित खास
मुक्तपणे व्यक्त व्हायलाच पाहिजे
मनातलं गाणं मनामनांत रुजवायलाच पाहिजे....प्रज्ञा वळंजू.
♦️मन  खोल ..खोल ...खोल
त्याचे गूज  त्याहून  सखोल
ओठ  आणि   वाणी 
गात  जावी  जीवनगाणी......तुकाराम गायकर
♦️मनातल प्रेम सांगता
आलं पाहिजे..
आपल्याच माणसांवर
प्रेम करता आलं पाहिजे......दिघे प्रभाकर.
♦️गुज माझ्या मनातले
शब्दरूप घेऊ दे
गीत माझे गाईन मी
सुर ओठी येऊ दे
ओठातल्या सुरांनाही
साज असा मिळू दे
शब्द असे गुंफीन मी
आज गोडी कळू दे
गोडवा मनातला
गीतामधे पाझरावा
शब्द माझा सुर माझा
मनामध्ये पसरावा.........सुचेता गोखले.
♦️शब्दांची साथ अन्
मायेचा ओलाव
मनातल्या गाण्यांचा सुर
स्वतः च गुणगुणावा.....धिरज लोके (डोंबिवली)
♦️ओठांवरच्या त्या शब्दांनी
नात नित्य गुंफलं पाहिजे.
नात्यातील भावबंध.....
आधाराची काठी झाल पाहिजे.
आपलच गाण आपल्याला
म्हणता आल पाहिजे......विलास गावंड
♦️कच्चे धागे कच्चे नाते
उसवले नाते कसे..?
वीण पक्की घाल आता
तुरपई पुरी नसे..!....... गणेश तुलसी
♦️मनातली खदखद
आता बाहेर
आली पाहिजे
गाणी-भेंड्यात अडकलेली
ज्ञानभाषा आता वास्तवाला भिडली पाहिजे!...किरण जोशी
♦️हातात तुझा हात दे
आयुष्यभर साथ दे
प्रेमाने भरलेल्या माझ्या मनाला
फक्त एकदा हाक दे.....मिताली तांबे , मुंबई
♦️आपण गेलो गुणत
तर नियती करते भागाकार
झाली थोडी वजावट
तरी पुरून उरले पाहिजे.....किरण जोशी
♦️मनाच्या खोल थरांमध्ये
खणता आलं पाहिजे
स्वतःलाचा शोधणारा
बनता आलं पाहिजे.......- दुष्यंत पाटील
♦️हातात तुझा हात दे
आयुष्यभर साथ दे
प्रेमाने भरलेल्या माझ्या मनाला
फक्त एकदा हाक दे......मिताली तांबे , मुंबई
♦️आनंद बाहेर
कुठे कुठे शोधला
अंतरी गवसता
द्विगुणित झाला ......- श्रीराम काणे
♦️कळलेच नाही मला
गाणे कधी झाले कविता
रोमारोमातुनी वाहे
माझी ही शब्द सरिता......अजित तिजोरे
♦️निशीदिन अविरत
अंक घालती फेर
अव्यक्त मनातून
फिरती सूत्रांचे हेर......
गणितज्ञांना समर्पितअजित सर......अमृता इंदूरकर
♦️चल.. गडे!
नजरेने बोलू काही...
मन.. वेडे !
बोलू देत नाही.....गणेश तुलसी
♦️सूत्र गुंफीता सूत्रांचे
होते शिखर सर !
अन्यथा पळता भुई होई थोडी
कितीही हुशार असले हेर.....अजित तिजोरे
♦️मनामधलं हे गुज
गाण्याकडे हात मागतंय
ओठांवर व्यक्त व्हायला
सुरांची साथ मागतय .....धीरज लोके,डोंबिवली
♦️नजरेनजरेने मनातील
गुज चल सांगुया
आठवांच्या बरसातीत
गीत चल गाऊया.......©विजया पाटील,नवापूर
♦️गूज अंतरी चे मनातून ओठात येते
हृदयातून गालावरुन हस्यात जे तरंगते
ते प्रम असते शब्दातून काव्यात,
काव्यातून गाण्यात नेतात ते सूर असते .....सुचेता वाडेकर
♦️दूर दिसे पैलतीर,
होडी कशी वल्हवू?
बेचैन मनास ह्या,
कसं मी समजवु?...... अर्चित साखळकर (गिरगाव)
♦️माझ्यासमोर व्यक्त होताना
तुला शब्दांची गरज नाही
तुझे डोळेच सांगतात सर्वकाही......मिताली तांबे
♦️माझ्या एकटेपणात मन माझं,
किना-याच्‍या वाळूसारखं वाटतं...
जणू लाटांसोबत वाहून जातं,
व लाट्यासोबत किना-यावर साचतं....सागर ननवरे
♦️मनातल गाण मनात
ओठावरच गाण मनात
मनाने नाही ओळखले ओठ
ओठांनी पण नाही ओळखले मन..श्रीधर गोडबोले
♦️दुःखाचे प्रतिबिंब सुखाने पाहुदे ..
अंतरीच्या यातनांना मायेने कवटाळूदे ...
नात्यांच्या अंगणात सदैव
आनंदाचं झाड पाहिजे ....
आपलंच गाणं आपल्यालाच
म्हणता आलं पाहिजे ......प्रदीप बाजी
♦️शब्द,शब्द मनातले
गुंजत राहिले ह्रदयात
माय मराठीच्या तबकात
सजले चारोळीच्या रूपात....स्नेहा वाबळे,कोल्हापूर
♦️तू मुळू मुळू रडायचं
मी ढसा ढसा रडायचं
तू मुळू मुळू रडायचं
मी ढसा ढसा रडायचं
मग आपल्या पोरांनी भोकाड पसरायच.....सागर ननवरे
♦️कवितांच्या दुनियेत
कवितांच्या दुनियेत
किती मजा असते,
एकट एकट वाटताना
अखी दुनिया बरोबर असते...........सागर ननवरे
♦️शब्द- दूर
दूर गेलेल्या नात्यांना
हृदयात अलगद जपावं
रुसलेल्या मनांना मायेने जवळ करावं.......मिताली तांबे
♦️काळजातले बोल जेव्हा
ओठांशी त्या गुज करतात
शब्दांचे जणु गीत होत
भ्रमरागत गुंजन करतात.....©विजया पाटील,नवापूर
♦️फुलपाखरुपरी आस्वाद घेत
बागडता आले पाहिजे
पंख कितीही छाटले तरीही
भरारी घेता आलीच पाहिजे.....©विजया पाटील,नवापूर
♦️जीवनाचे गीत
तुझी माझी प्रीत
आठवांना येतो ऊत
भासावे दोहोंचे एकरूप.....©चंदा वाडकर
♦️मायेनी मायेच्याच गोष्टी
जवळ येतात
कितीही माया केली तरीही
वेळेप्रसंगी एकट सोडून जातात....सागर ननवरे
♦️शब्द मुके झाले
तरी हरकत नाही,
नजरभेटीने गूज
ओळखता आलं पाहिजे....©शिवानी गोखले.
♦️मनाची गम्मत काय सांगू
त्याला नाही तोड
काहूर असे अंतरी जरी
ओठावर हसू गोड.....प्रियांका कुंटे
♦️अर्किडीज अन् पायथॕगोरस..
डावखुरा खेळ असे..
शिखरावरी आहोच आम्ही
आर्यभट्टाचा देश असे !
(तिजोरे सरांच्या सन्मानार्थ..).....गणेश तुलसी
♦️कृष्णाचा ध्यास ...…..  
सप्तसुरांची कास…
कृष्णभेटीची.....               
राधेला आस!......कल्पना माने
♦️नजरेनजरेने मनातील
गुज चल सांगुया
आठवांच्या बरसातीत
गीत चल गाऊया.......©विजया पाटील,नवापूर
♦️काळजातले बोल जेव्हा
ओठांशी त्या गुज करतात
शब्दांचे जणु गीत होत
भ्रमरागत गुंजन करतात.....©विजया पाटील,नवापूर
♦️फुलपाखरुपरी आस्वाद घेत
बागडता आले पाहिजे
पंख कितीही छाटले तरीही
भरारी घेता आलीच पाहिजे........©विजया पाटील,नवापूर
♦️गुजगोष्टी तुझ्यामाझ्या
जणु भ्रमरांचा गुंजारव
गीत भिजले मधातले
जसा नदीचा कलरव.......©विजया पाटील,नवापूर
♦️जीवन  हे एक गाणं आहे
आपलं मन ते जाणून आहे
मनाला नसतं वयाचं बंधन
म्हणूनच तर आहे जीवनात गुंजन
तरूण मनाला माहित नसते वार्धक्याचे गणित
म्हणूनच एव्हरग्रीन ज्येष्ठ नागरिकांचा
आनंद असे अगणित .....सौ.स्वाती महादेव जगताप
शिक्षण विकास मंच.
♦️गुरू कोविंद दोऊ खडे
काके खिंचू पाव,
लाल-बिहारी गुरु आपने
पाॅलिटिक्स दियो सिखाय !!
          - करीबदास.....नितीन खंडाळे
♦️गुंजले ते बोल मराठी
गायले ते गीत मराठी
उधळले ते शब्द मराठी
पुजिली ती भाषा मराठी
वंदिली ती माय मराठी
धन्य धन्य बोलते मराठी...©विजया पाटील,नवापूर
♦️गुज माझे भगवद्गीता 
गुणगुणतो ओठांवरी
पावतो नंद आनंद सारा
गाणे माझे - ज्ञानेश्वरी
गाणे माझे - ज्ञानेश्वरी
सर्व ओठांवरी यावे
आपल्या शब्द सूरांत
रंगून - गुंफून घ्यावे
शब्द सूरांत आपल्या
रंगून - गुंफून घ्यावे
मनसोक्त एकवार
गाणे आपलेच गावे
या ओठी गुणगुणावे
तीच प्रचिती आपली
लावते टाळ ईश्वरी
गाणे माझे - ज्ञानेश्वरी
मुक्त छंदात तासूनी
लावते टाळ ईश्वरी
गाणे माझे - ज्ञानेश्वरी
लावते टाळ ईश्वरी
गाणे माझे - ज्ञानेश्वरी
गाणे माझे - ज्ञानेश्वरी.....संदीप बोबडे
एक मुक्त छंद !!
♦️चावळ तुन्हीमन्ही
जशी भिंगोटानी भुनभून
गानं भिजायनं मधमान
जसी नदीनी खयखय.....नितीन खंडाळे
♦️मानातल्यो गोष्टी मनात ठेव
सांगूक कशाक हव्यो
न सांगता एखाद्याक
ओळखूक येउक हव्यो......प्रियांका कुंटे
♦️मनन्या गुजगोष्टी देख
चल सांगस तुना कानमा
पाखरु व्हईसन उडसुत
चल गाणं गासुत रानमा.....©विजया पाटील,नवापूर
♦️मुक्या या शब्दांनी
हरकत जणु घेतलीय
नजरभेटिच्या व्यक्त होण्याने
मनाशी फारकत जणु घेतलीय ....धिरज लोके (डोंबिवली)
♦️कायीजमधला बोल जव्हय
व्हटेस्शी त्या गुलगुल करतस
शब्दस्ना जनु गाना व्हतस
भिंगोटास्नागत गुनगन करतस !!...नितीन खंडाळे
♦️बघा,बघा बहरली कशी अहिराणी,
रूप तिचे हो साजिरे,जशी शोभे हो राणी......वृषाली ताई
♦️मनी अहिरानीनी गोडी
जसी नारयमानं पाणी
खान्देसनी शे तीच
एकलीच राणी......विजया पाटील,नवापूर
♦️नयनांनी बोलावे काही अन् तू
तर पापण्या मिटून घ्यावे...
स्वप्नांनी उघडावे पंख अन् तू
त्या पंखानी फिरून यावे....दीपा ठाणेकर
♦️ओंजळीत धरावे मोती अन् तू
ते अलवार ओघळू द्यावे ..
हिशेब करावा देेण्याचा अन् तू
तर घेेण्याचे करार करावे.....दीपा ठाणेकर
♦️गीत माझे नवे जरी
प्रीत तुझी  माझी जुनी
सूर ताल जरी नवे
अधर मात्र तुझे जुने......प्रशांत दांडेकर
♦️गाणं म्हणजे गाणं असत...
त्यात आमचं तुमचं असं काही नसतं.....
ते एकाच्या मुखातून बाहेर पडत....
तर इतरांच्या हृदयाला जाऊन भिडत......प्रमोद जाधव
♦️भुसा काढतो डोक्याचा
किस शब्दांचा पडतो
गोंधळतो आपसूक
जीव ही अडखळतो
किस शब्दांचा पडतो
किस शब्दांचा पडतो........संदीप बोबडे
♦️प्रयत्न केले अनेक
वाटले व्हावे ते सार्थ
शब्द दिले निवडीचे
न व्हावा कुठे - अनर्थ......संदीप बोबडे
♦️तुझ्या मनात काय हा
ता माका  नाय ठाव
पण तू घेऊन ऱ्हवलस
माझ्या काळजचो ठाव......प्रियांका कुंटे
♦️आकाशात चंद्रमा हा
गुज चांदण्यांशी करतो
अंगणी परीमळ निशेचा
वा-याबरोबर गीत गातो.....©विजया पाटील,नवापूर
♦️लढवय्ये ज्ञानभाषाचे
स्फुरण चढले चारोळ्यांचे
विशेष आज दिवसाचे
स्मरण झाले जिजाऊ , विवेकांचे.....दीपा ठाणेकर
♦️गान म्हंजे गान र्‍हास
तेम्हा तुम्हनं आम्हनं आस काही नही र्‍हास,
ते एकना तोंडवाटे भायर पडसं
तर दुसरास्ना कायीजले जाई भिडसं !!....नितीन खंडाळे
♦️मन उघडे करायला
खूप धैर्य लागते
काही गोष्टी पचवायला
काळीज मोठे लागते.....प्रियांका कुंटे
♦️काव्यात बोलती सारे
आनंदाचे सुटले वारे....वृषाली गोखले
♦️तुन्हा मनम्हा काय शे
ते माले ठाउक नही
पन तू लेयी लिधा
मन्हा कायीजना ठाक !!....नितीन खंडाळे
♦️छंद जडला काव्याचा
जमला मेळ आठवणींचा
संचार झाला भाषा प्रेमाचा
बहर दिसे तो शब्द वैभवाचा....वृषाली गोखले
♦️मन उघड कराले
भल्त डेरींग लागस
काही गोट पचाडाले
कायीज मोठं लागस !!.....नितीन खंडाळे
♦️मन हे मन नसून
आरसा आहे
डोळे आणि काळजाचा
तो ठसा आहे.......प्रशांत कुंटे
♦️त्या गानयातील अर्थ फक्त
तुला च कळला पाहिजे
जे वाटते ते खरच तुलाही वाटते का
हे मनाला विचारायल पाहिजे
तेंव्हाच् म्हणावे वाटेल की
गुज ओठावर आले ते कळले पाहिजे.....प्रेरणा कोल्हारकर
♦️गुजातल्या सत्वाने
मनातल्या ममत्वाने
स्वत्वाच्या झंकाराने
आणि आपल्याच हुंकाराने
साद घालता आली पाहिजे....अमरजा


Wednesday, January 17, 2018

१५ जानेवारी,२०१८

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

शिकण्यासाठी सक्षमता

लेखक~डॉ रमेश पानसे

शिक्षणाच्या अनुषंगाने शाळा, शिक्षक यांविषयीची चर्चा नेहमीच होत असते. पण पालकत्वाला केंद्रीभूत मानून शिक्षणाचा विचार होत नाही. पालकांनी ठरवले, तर शाळेवर वा ‘मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जा’वर अवलंबून न राहता मुले शिक्षणासाठी सक्षम होऊ शकतात,अशी भूमिका मांडणारे टिपण..

मुले आणि त्यांचे आई-वडील हा एक नैसर्गिक संबंध असतो. नैसर्गिकतेने मूल जन्माला येते आणि संबंधित स्त्री-पुरुषाचे रूपांतर ‘आई-वडील’ या नात्यात होते. आपल्या मुला-मुलींचे लालन, पालन व पोषण करण्याची व्यावहारिक जबाबदारी मात्र निसर्ग आई-वडिलांच्या पदरात टाकतो. हे कसे करावे, याविषयीचे काहीसे ज्ञान आजूबाजूचा समाजाकडून येते; आणि मुले आपापल्या कुटुंबात वाढू लागतात.

मुलांचा जन्म ही जशी एक नैसर्गिक घटना आहे तशीच मुला-मुलींची होत जाणारी वाढ ही देखील निसर्गनियमांनी ठरवून दिलेली असते. मुलांची होणारी शारीरिक वाढ, त्यांच्या विकसित होत जाणाऱ्या क्षमता तसेच त्यांना हळूहळू येत जाणारी शारीरिक कौशल्ये व भाषा, या साऱ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातात, ही सर्वच आई-वडिलांना माहीत असलेली, त्यांच्या नित्य ओळखीची अशी बाब आहे. सहजपणे घडत जाणाऱ्या या बाबी सर्वाच्या परिचयाच्या असतात.

या सर्व नैसर्गिक वाढीच्या एका विशिष्ट टप्प्याला मूल समाजाने ठरवून दिलेल्या अशा ‘शिकण्या’च्या वयात पदार्पण करते तेव्हा, मुलाचे रूपांतर ‘विद्यार्थ्यांत’ होते आणि आई-वडिलांचे रूपांतर ‘पालकां’मध्ये होते. आणि मग आपल्या मुलांची बौद्धिक प्रगती, बौद्धिक वाढ हे विषय पालकांना जवळिकीचे व चिंतेचे वाटू लागतात. या, मुलांच्या औपचारिक (म्हणजे, ज्याच्या आशय आणि पद्धती समाजाने निर्धारित केलेल्या आहेत अशा ) शिक्षणाच्या टप्प्याला पालक अधिक जागरूक होतात.  मुलांचे लालन, पालन, पोषण यांच्याबरोबर शिक्षणाची नवीन जबाबदारी पालकांवर येऊन पडते; आणि मग आपल्याला मुलांकडे ‘विद्यार्थ्यांच्या’ अंगाने ते पाहू लागतात. चांगले शिक्षण, चांगली शाळा, शिक्षणाचे माध्यम, शाळेचे शुल्क, गणवेश, क्रमिक पुस्तके, शाळेत नेण्या-आणण्याच्या व्यवस्था, शाळेतील स्पर्धा,परीक्षा, निकाल, हुशारपण असे विषय पालकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. याचवेळी आणखीही दोन गोष्टी, बऱ्याचदा पालकांच्या नकळतच, पालकांच्या मनाचा ताबा घेऊ लागतात. एक म्हणजे, आपला पाल्य हा इतर मुलांच्या तुलनेने आजमावण्याची सवय त्यांना लागते. म्हणजे आता त्यांना आपला मुलगा नुसता हुशार नको असतो, तर तो इतरांच्या तुलनेने- इतर मुलांपेक्षा अधिक- हुशार हवा असतो. दुसरे म्हणजे, आत्ताच्या पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याची स्वप्ने पडू लागतात; आणि पाल्याबाबतच्या अपेक्षांची पालवी त्यांच्या मनात फुटू लागते. या दोन्हींतून पालकांची आपल्या पाल्याकडे पाहण्याची दृष्टी घडू लागते. मुले ही आई-वडिलांच्या अशा आकांक्षांची प्रतीके बनू लागतात. आणि हे कसे सारे सहजपणाने घडून येते. पालकांनी ठरविलेल्या दिशेने मुलांची प्रगती व्हावी यासाठी केवळ पालकांची जंगी धडपड सुरू होते. ठराविक दिशेने मुलांना नेण्याची जबाबदारी पालक घेऊ लागतात; आणि साहजिकच स्वतला ‘जबाबदार पालक’ मानतात.

इथे खरी मुलांची ‘विद्यार्थी’ म्हणून होणारी परवड सुरू होते. जोवर मुले लहान असतात, आई-वडिलांवरच खूपशी अवलंबून असतात, तोवर पालक व पाल्य यांच्या संबंधात फारसे वितुष्ट येत नाही. परंतु मुले बाल्यावस्थेतून बाहेर पडून कुमार वयात शिरतात, पुढे युवावस्थेत पदार्पण करतात, तेव्हा असे वितुष्ट यायला सुरुवात होते. मुले जेव्हा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतच्या मनाचा ताबा स्वतकडे घेऊ लागतात, त्यांना स्वतंत्र विचाराची पालवी फुटू लागते आणि स्वतचे हित स्वत पाहण्याची ओढ निर्माण होते; याच काळात मुलांना उपजत असलेल्या बुद्धिमत्ता (ज्या पुढे जाऊन मुलांचा पेशा ठरविणार असतात.) त्यांना आपल्याकडे आकर्षति करून घेऊ लागतात. मुलांचा कल, मुलांची आवड आणि यांची दैनंदिन शिक्षणाची सांगड घालण्याचा प्रयत्न मुले प्रामाणिकपणे करू लागतात. जिथे ही सांगड नीटपणे घातली जाते, तिथे मुले जुळवून घेतात. पण जिथे ही सांगड घातली जात नाही तिथे मुले बंड करतात, अथवा त्यांच्यापासून पळ तरी काढतात. पालकासाठी पेचाचे प्रसंग उद्भवतात.

कुटुंबातील शैक्षणिक वातावरणाचे हे सर्वसामान्य चित्र आहे. जागरूक, जबाबदार पालक आपापल्या कुटुंबापुरते हे चित्र बदलू शकतात. त्यासाठी त्यांना जरा वेगळ्या वाटेने जावे लागेल. त्यासाठी काही वेगळा विचार करावा लागेल; वेळप्रसंगी काही शिकावेही लागेल. त्यांना हे समजावून घ्यावे लागेल की, आई-वडील होणे ही नैसर्गिक घटना आहे तर पालक होणे ही एक सामाजिक घटना आहे. मुले शालेय शिक्षण घेऊ लागतात तेव्हा पालकांना दोन गोष्टी शिकाव्या लागतात. एक, शिकणारे मूल असते कसे? ते शिकते कसे? शिकताना त्यांच्या बौद्धिक गरजा काय असतात? भावनिक गरजा काय असतात? वाढते वय आणि वाढते शिक्षण यांचा परस्पर संबंध आणि त्यातच टप्प्याटप्प्याने होत जाणारा स्वभावातील बदल, यांची नेटकी कल्पना पालकांना असायला हवी. थोडक्यात असे की, पालकांना, शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर असणारे मूल समजावून घायला हवे. दुसरे असे की, मुलांना कोणते शिक्षण कोणत्या माध्यमातून केव्हा कसे आणि का घ्यायचे असते? मुलांच्या उपजत बुद्धिमत्तांना, त्यांना मध्यवर्ती स्थान देऊन, शिक्षणात त्याचे ज्ञान, त्याची कौशल्ये, कशी मिळतील? कुठे मिळतील? आपल्या पाल्याचे शिक्षण इतर मुलांपेक्षा काही वेगळे असेल काय? त्यातून त्याचा पेशा कसा ठरेल? समाजातील यशस्वी पेशांचे शिक्षण मुलांना घ्यायचे की, मूल यशस्वी ठरेल अशा पेशाचे शिक्षण मुलांना द्यायचे? या आणि अशा कित्येक प्रश्नांच्या वाजवी उत्तरांसाठी पालकांनी शिक्षण घेणे, हे खास शिक्षण घेणे गरजेचे आहे. तशा व्यवस्था म्हणजे पालक- शिक्षणाची केंद्रे अजूनही आपल्याला समाजात नाहीत. या व्यवस्था जोवर निर्माण होत नाहीत तोवर आपल्या शिक्षणाची जबाबदारी पालकांनाच  घ्यावी स्वतच लागेल.

आपल्या मुलांना, त्यांच्या शिक्षणात खूप मदत व्हावी असे जर पालकांना वाटत असेल तर, त्यांचा पाल्य कोणत्याही वयाचा आणि शिक्षणातील कोणत्याही पायरीवर (प्राथमिक शाळेत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इ.) असो, त्याच्या शिक्षणाबाबत काही मूलभूत गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात, त्या अशा:

(१) सर्वच मुले आपली आपण शिकू शकतात; आणि मुख्य म्हणजे शिकायला उत्सुक असतात. त्यामुळे शिकण्याच्या संधींच्या सागरात खुशाल मुलांना यथेच्छ पोहू द्यावे. असे केल्याने मुले भरपूर शिकतात; आणि मुख्य म्हणजे स्वतहून शिकायला शिकतात. याचा त्यांना कुठल्याही क्षेत्रात आणि पुढील आयुष्यात उपयोग होतो.

(२) सर्वच मुलांना सतत नवे नवे शिकायला आणि काहीतरी शोध घेऊन शिकायला आवडते. आपल्या शाळा, आपली महाविद्यालये विशिष्ट अभ्यासक्रम व त्यावरील लेखी परीक्षा या जंजाळात अडकून राहिल्यामुळे, अशा शोधांच्या नित्य नूतन संधी त्या मुलांना देऊ शकत नाहीत. पालक, नेमकी इथे मुलांना चांगली मदत करू शकतात. शाळेबाहेरचे अफाट विश्व म्हणजे विराट प्रमाणावरील शोधसंधींचा खजिनाच आहे. आपल्या मुलांना शाळेबाहेरच्या शिक्षणसंधी घ्यायला प्रवृत्त करता येते.. नव्हे, प्रयत्नपूर्वक केले पाहिजे.

(३) अनुभवांतून शिकणे, नवे नवे विविधांगी अनुभव घेऊन शिकणे, हीच खरे तर शिकण्याची एकमेव पद्धत आहे. शाळा-महाविद्यालये आपल्या मर्यादित व बंदिस्त चौकटीत, विविध अनुभवांची धमाल उडवून मुलांचे शिक्षण प्रभावी करणारे काम करू शकत नाहीत. पण शाळा महाविद्यालये पुरवू शकत नाहीत अशा कितीतरी संधी घरे पुरवू शकतात. स्वतचे घर- कुटुंब हे शिक्षणाचे सर्वात चांगले व संपन्न असे प्रभावी केंद्र असू शकते. पालकांनी ते कसे असू शकते. याचा स्वतच शोध घ्यायला हवा. शाळांतील शिक्षणाला घरातील अनुभवांधारितशिक्षणाची जोड द्यायला हवी.

(४)  सामान्यत आपण असे मानतो की, मुलांचे शिक्षण हे केवळ बौद्धिक काम आहे. त्यामुळे, मुलांच्या बुद्धिची वाढ, बुद्धीवाढीसाठी वेगवेगळे उपाय किंवा बुध्यांकाचा अंदाज घेणे अशा अनेक गोष्टी पालकांच्या मनात व व्यवहारात असतात. मुख्य समजावून घायची गोष्ट अशी की, बुद्धी ही एकटी नसते. बुद्धी आणि भावना यांची कायमच निसर्गाने बांधून ठेवलेली जोडगोळी ती असते. त्यामुळे बुद्धीबरोबर आणि बुद्धिविकासासाठीही मुलांच्या भावनांची नेहमीच कदर राखावी लागते. मुले प्रसन्न भावनेने शिकत असतील तर ती एकाग्र होऊन शिकतात. आणि चांगले मन लावून शिकायला मिळाले तर आनंदी होतात. त्यांच्या बुद्धीचा विकास आपसूकच व वेगाने होतो. आपण आपल्या मुलांना प्रसन्न, समाधानी, आनंदी ठेवण्याचा विचार कितपत करतो? केवळ ‘अभ्यास’ या आग्रहापोटी त्यांची आनंद उभारी तर आपण मारत नाही ना?

(५) भावनांचा विचार केवळ शिकण्याशी संबंधित नाही, तो अधिक करून आपल्या जीवनाशीच संबंधित असतो. मुलांना दुसऱ्यांच्या भावना ओळखून, समजावून घेऊनच आयुष्यभर समाजात वावरायचे असते. त्यावरच समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. तसेच, व्यवहारात वेळोवेळी आपल्याला मन आवरून वावरावे लागते. अशावेळी, स्वतच्या भाव-भावनांचे नियंत्रण करण्याचे कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे असते. परंतु या महत्त्वाच्या गोष्टींचे शिक्षण शाळा-महाविद्यालये त्यांच्या मर्यादांमुळे देऊ शकत नाहीत; त्यामुळे ही जबाबदारी सुद्धा पालकांनी आपापल्या कुटुंबामध्ये घ्यायला हवी. कशी घ्यायची? पालकांनी स्वतच शोध घ्यायला नको का?

सूज्ञ पालक हे नेहमीच, आपल्या पाल्यांच्या केवळ परीक्षांतील यशाचाच विचार करून थांबत नाहीत. ते आपल्या पाल्यांच्या अधिक सक्षम, अधिक संपन्न, अधिक समाजोपयोगी अशा जीवनाचा विचार करतात.

शिकण्याची प्रक्रिया ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असते. तिच्यासाठी सक्षम करणे, म्हणजे मुलांचे शिक्षण करणे होय! तसे आपण करू शकलो तर आपण आपले पालकत्व पूर्णाशाने निभावले असे म्हणता येईल !

लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत

संदर्भ~loksatta.com

संकलन - वृषाली गोखले

गट -रायगड
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

आज १५ जानेवारी!
मराठी भाषा पंधरवड्याचा शेवटचा दिवस.

गेल्या १५ दिवसांत पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या विविध whatsapp गटांवर *ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान* ने  वेगवेगळे उपक्रम घेतले, या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत. या उपक्रमांतर्गत घेतलेल्या परीक्षांचे निकाल पुढीलप्रमाणे :-

टंकलेखन स्पर्धा - पूर्ण देशात स्मार्टफोनवर सर्वात जास्त मराठीतून लिहिले जाते. हे प्रमाण अजून वाढावे, प्रोत्साहन मिळावे याकरता ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.

[गुगल फॉर्म मार्फत परीक्षा घेण्याची सुविधा करून दिल्याबद्दल गुगलचे आभार]

निकाल :-

डेस्कटॉप- महेश शेट्टी (इतर)
स्मार्टफोन- मंदार शिंदे (ज्ञानभाषा मराठी - पुणे गट)

निबंध स्पर्धा - निबंध स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष आहे. मराठीत तंत्रज्ञानावर अवांतर लिखाण अतिशय कमी होते आणि हा प्रश्न लक्षात घेऊनच निबंध स्पर्धेचे विषय ठरवले गेले. 

१ - मला आवडलेले गॅजेट
२ - मला आवडलेली चारचाकी/दुचाकी
३ - समाज माध्यमे आणि मी
४ - २१ व्या शतकातील शेती
५ - डिजिटल युगातील शिक्षक

पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा स्पर्धा कशा पद्धतीने घेऊन जाता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आलेले सर्व निबंध ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून देण्याकरता ब्रोनाटो सारख्या ईपुस्तक निर्मात्यांची मदत घेण्यात येईल.

हे सर्व निबंध ईमेल मार्फत मागवले गेले होते, याचा प्रचार whatsapp, फेसबुक, ट्वीटर मार्फत करण्यात आला. या सर्व संबंधित apps चे मनापासून आभार.

निकाल :- २६ जानेवारी.

मराठी प्रश्नमंजुषा - या उपक्रमात एकूण ३ प्रश्नमंजुषा घेतल्या गेल्या. यावेळी प्रथमच व्याकरणावर भर न देता, आकलनावर भर देत इंग्रजीच्या शालेय परीक्षा/शिष्यवृत्ती परीक्षा ज्याप्रमाणे सेट केल्या जातात साधारण त्याप्रमाणे मराठी उतारे आणि कविता देऊन त्यावरील प्रश्नोत्तरे/संबंधित प्रश्न विचारले गेले. यासाठी प्रभाकर खाडिलकर, तुषार जोशी, डॉ. अमेय गोखले, ओमकार करंबळेकर यांच्या साहित्याचा वापर करण्यात आला. या स्वरूपात अजून काय सुधारणा करता येतील याबाबत विचार केला जाईल. तिसरी प्रश्नमंजुषा राजभाषा मराठी अधिनियामाबाबत होती, जेणेकरून मराठीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना नियम समजतील आणि असे सर्व नियम दाखवून मराठीचे प्रश्न धसास लावण्याकरता त्यांच्याकडे कायदेशीर माहिती उपलब्ध असेल.

[या सर्व प्रश्नमंजुषा गुगलफॉर्मवर घेतल्या गेल्या]

निकाल:-

प्रथम प्रश्नमंजुषा - रोहिणी बागुल - ज्ञानभाषामराठी
गुण- २९/३०

द्वितीय प्रश्नमंजुषा - कीर्ती कर्पूर - इतर
गुण- २५/२५

तृतीय प्रश्नमंजुषा - वर्षा चोपदार - ज्ञानभाषामराठी
गुण - ९/१०

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषापंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञानकथा

फोन कॉल

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’

‘कम ऑन यार! तुला माहितेय- मला या मशीनशी बोलायला नाही आवडत. कितीदा सांगितलं सेलफोन वापरत जा. बर्थडेला मी तुला सेलफोन गिफ्ट करतोय आणि तो तू वापरणारेस. ओके? नो मोर डिस्कशन! आणि हो, आज मी घरी लेट येईन. फायनल रीडिंग्ज घ्यायच्यात. बाय. लव यू!’

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थॅंक यू!’

‘हॅल्लोऽऽऽऽ, एकदम एक्स्पेक्टेड रिझल्ट्स मिळालेत. एक बिग सरप्राइज आहे! आज रात्री सेलिब्रेट करूया! लवकर परत ये. मीपण पोहोचेन अध्र्या तासात घरी. ओके? लेट्स सेलिब्रेट युहूऽऽऽऽऽ!’

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थॅंक यू!’

‘ए नको ना करूस असं! उचल ना फोन! का वागतेस अशी? मला माहितेय- तिथेच आहेस.. मुद्दाम उचलत नाहीयेस. का चिडलीयस? बोल ना नीट. माहितेय ना- तू नीट नाही बोललीस की माझा मूड पण बिघडतो मग सगळा. किती खूश होतो मगाशी माहितेय? डिमेंशन फोल्ड फायनली शोधून काढलाय मी. आता एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाणं शक्य होईल- माहितेय? प्लीज- फोन उचल ना..’

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’

‘काय झालंय? तू का चिडलीयस इतकी? आय नो- मी तुझ्या आईशी नीट बोललो नाही काल. सॉरी खरंच! एकतर माझा मूड आधीच ठीक नव्हता; त्यात पुन्हा त्या असं टिप्पिकल बोलत होत्या ना! आय जस्ट हेट- व्हेन शी कॉल्स मी जावईबापू. मला एकदम गांधीजी झाल्यासारखं वाटतं. म्हणतात- नातवाचं तोंड कधी बघायला मिळणार? आई शपथ.. असलं डोकं सटकलं ना! आय मीन- सॉरी. तुझ्या आईची चूक नाही म्हणत मी; पण एकंदरीत आपली मागची जनरेशनच ना..! सगळे डोक्यात जातात. यांचं समाधान नेमकं कशात आहे तेच कळत नाही. शिक्षण झालं की नोकरी, नोकरी मिळाली की लग्न, लग्न झाल्यावर नातवंड.. यापलीकडे काही लाइफ आहे की नाही? मूल काय नुस्तं जन्माला घातलं म्हणजे झालं? त्याचं पुढे सगळं व्यवस्थित व्हायला नको? आपलं ठरलंय ना? सांग ना आईला नीट समजावून. एकतर इथे आपल्यालाच एकमेकांचं तोंड बघायला वेळ नाही; त्यात त्या बाळाचे हाल कशाला? आय नो- मी हेच नीट शब्दांत सांगायला हवं होतं. जरा जास्तच उर्मटपणे बोललो. आम रियली रियली सॉरी.’

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’

‘रात्रीचे साडेअकरा वाजलेयत. मला माहितेय- तू बसलीयस तिथेच. कसला राग आलाय तुला एवढा? तो विशाल तुला काहीतरी सांगतो आणि तू त्यावर विश्वास ठेवतेस? ठीके. मी मान्य करतो- माझं स्नेहावर होतं प्रेम कॉलेजमध्ये असताना. मग त्यात गैर काय? पुढे काही नाही झालं.. मी सोडून दिला विषय. आता त्याच त्या जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या? आता इतक्या वर्षांनी ती अशी अचानक भेटल्यानंतर मला नेमकं कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं, कळलंच नाही. मनात कुठेतरी तिच्याबद्दल काहीतरी वाटत असेल कदाचित अजून- म्हणून बोलत राहिलो तिच्याशी. पण याचा अर्थ असा नाही ना गं, की मी तुला फसवतोय. ती भूतकाळ आहे माझा. मी तो नाही बदलू शकत. मी काय करू आता त्याला? तूच सांग ना आता! तू भांड माझ्याशी. ओरड माझ्यावर. चीड खूप. रागाव हवं तेवढं. पण बोल ना- प्लीऽऽऽज! उचल ना फोन एकदाच. प्लीज, फक्त एकदाच!’

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’

‘हॅलो, प्लीज फोन उचल ना गं! आय नो- मी तुला नेहमी डॉमिनेट करायला बघतो. माझ्या प्रायॉरिटीज् तुझ्या कामांपेक्षा जास्त इम्पॉर्टन्ट आहेत अशा आविर्भावात असतो. माझे विचार तुझ्यावर लादत असतो सारखे.. माहितेय मला. पण मी सुधारतोय ना आता हळूहळू? ऐकतोय की नाही मी तुझं हल्ली? कळतंय, माझं काय काय चुकतंय ते. एकटय़ानेच झालो गं मी लहानाचा मोठा. कुणी भावंडं पण नाहीत. माहितेय ना? सगळेच लाड करायचे माझे. मागितलेलं सगळं मिळायचं. सांगितलेलं सगळे ऐकायचे. कधीच कुठली गोष्ट शेअर करावी लागली नाही कुणासोबत. त्यामुळे खूप मनमानी करायचो पूर्वी.. हे जाणवतंय आता. तू खूप समजून घेतलंस मला नेहमी- आय नो! खूप सहन केलंस माझं मनमानी वागणं. पण कधीच उलटून बोलत नाहीस. कधी चिडली नाहीस. नेहमी शांतपणे सहन करतेस. नंतर कळतं- चूक माझीच होती; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मला कल्पना आहे- खूप चुका केल्यात मी. कुठलंही नातं दोन लोकांनी मिळून टिकवायचं असतं.. आपल्यात ते तू एकटी सांभाळत्येयस. खरंच, इथून पुढे मी नाही वागणार कधी असं. प्लीज, ऐक ना.. फोन उचल ना एकदाच- प्लीज!’

ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ’
‘..’
‘हॅलोऽऽऽ’
‘..’
‘कोण बोलतंय?’
‘श.. श्.. श्वेता?’
‘आ.. आकाश?’
‘कशी आहेस?’
‘..’
‘बोल ना.. प्लीज, तुझा आवाज ऐकायला मी.. मी.. किती कॉल केलेत.. माहितेय..?’
‘..’
‘बोल नाऽऽ तुला माहितेय, मी किती फिरलोय तुला शोधायला? रीडिंग्स परफेक्ट आलीयत. वी हॅव मेड इट! फायनली! वी हॅव डिस्कवर्ड डिमेंशन फोल्ड. कन्फ.. कन्फर्मड्!’
‘कुठून.. बोलतोयस.. तू?’
‘आत्ताच आलोय माहितेय इथे. थकलोय गं जाम तुला शोधून! तुला माहितेय- समांतर विश्वात उघडणारा दरवाजा सापडलाय. यू कॅन ट्रॅव्हल अक्रोस द युनिव्हर्स यार! आपण शोध लावलाय याचा. मी हेच सांगायला तुला कॉल केला, पण तू उचललाच नाहीस, माहितेय? मी वेडय़ासारखा शोधतोय तुला ते सांगायला तेव्हापासून. पण तू नव्हतीसच!’
‘म्हणजे? कुठे होते मी.. तेव्हा?’
‘नव्हतीसच गं तू! कुठेच नव्हतीस.. मी घरी परत आलो तुला सरप्राइज द्यायला त्या रात्री.. पण.. तू.. आलीच नाहीस माहितेय.. फक्त एक.. फोन आला.. तू.. हॉस्. हॉस्पिटलमध्ये असल्याचा. अ‍ॅक्.. सिडंट झालेला.. तुझा त्या रात्री.. मला सुचेचना काही.. माहितेय? त्यानंतर.. विश्वासच बसला नाही त्या गोष्टीवर. त्यानंतर काही दिवस असेच सुन्न बसून काढले. मग मग एक दिवस ठरवलं- या फोल्डमध्ये शिरायचं.. आणि पोहोचायचं- त्याच दिवशी.. त्याच वेळी.. पण दुसऱ्या विश्वातल्या.. आणि.. आणि फोन करायचा तुला.. तिथून. पण तू उचलायचीसच नाही तिथेही.. ‘मी बाहेर आहे..’ तोच मेसेज ऐकू यायचा- रात्री साडेअकरा वाजताही.. मग मी समजून जायचो.. की तू नाहीस त्या विश्वातही आता. पण मग त्रास व्हायचा खूप.. त्या गोष्टीचा.. मग बोलून टाकायचो जे मनात येईल ते.. तुला जे जे सांगायचं राहून गेलेलं ते सगळं तुझ्या त्या रेकॉर्डेड आवाजालाच सांगायचो.. मग परत शिरायचो या फोल्डमध्ये आणि निघून जायचो दुसऱ्या समांतर विश्वात- त्याच दिवशी, त्याच वेळेला.. तिथे पोहोचल्यावर पुन्हा कॉल करायचो तू उचलशील या अपेक्षेने.. पण.. तोच एक मेसेज ऐकू यायचा दरवेळी. असं वाटलं, की जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा ती सगळ्या समांतर विश्वातूनही निघून जाते कायमची कदाचित.. पण आज तू फोन उचललास.. मला यायचंय आता घरी.. खूप बोलायचंय तुझ्याशी.. मी..’
‘नको! तू.. जा परत. नको येऊस इथे! तू जा परत- जिथून आलायस तिथे.’
‘ए, नको ना बोलूस असं.. मी नेमक्या कुठल्या विश्वातून आलोय हे पुन्हा शोधून काढणं अशक्य आहे गं..’
‘तुला जावंच लागेल आकाश.. कारण.. या विश्वात तू नाहीयेस आता..’

प्रसन्न करंदीकर

Kprasanna.mangesh@gmail.com

संदर्भ : दै. लोकसत्ता २७ सप्टेंबर २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

*१५/१/२०१८

🧐मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- 'मनला' ,'इरूध' हे शब्द कोणत्या बोलीतील आहेत?

अ)कारवारी
ब)बालाघाटी मऱ्हेटी
क)धनगरी
ड)कोष्टी

उत्तर-ब-बालाघाटी मऱ्हेटी

बालाघाटच्या परिसरातील मऱ्हेटी बोली हिंदी भाषेच्या प्रभावाखाली दिसते.पण काही रूपे वऱ्हाडीच्या जवळ जाणारी देखील दिसतात.'मनला'म्हणजे म्हणाला आणि 'इरूध'म्हणजे विरूद्ध.या बोलीमधे मात्र वाक्यातील लिंगभेदाचा थोडा घोटाळा आहे.

प्रश्न २- 'घोळा', 'ईर' हे शब्द कोणत्या बोलीतील आहेत?

अ)चंद्रपुरी वऱ्हाडी
ब)कमारी
क)गोवारी
ड)झारपी

उत्तर-ड-झारपी

एलिचपूर जिल्ह्यातील काही थोडे लोक वऱ्हाडीच्या जवळपास येणारी ही बोली बोलतात.'घोळा'म्हणजे घोडा.या बोलीत 'ड'साठी 'ळ' येतो.तर 'ईर' म्हणजे वेळ , 'ळ' साठी 'र'येतो.

प्रश्न ३- 'आंदुळो' ,'घोऊश' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?

अ)चित्पावनी कोकणी
ब)मावळी
क)घाटी
ड)भिल्ली

उत्तर-अ-चित्पावनी कोकणी

रत्नागिरी,वेंगुर्ले,सावंतवाडी,गोमंतकाचा काही भाग इत्यादी भागातील ब्राह्मण लोक जी भाषा बोलतात ती चित्पावनी होय.यामधे सानुनासिक उच्चारण अधिक असते.ओकारान्त शब्द अधिक असतात. 'आंदुळो'म्हणजे झोपाळा तर 'घोऊश'म्हणजे नवरा.

प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्यांचे अभिनंदन!!

डाॅ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा