Tuesday, January 16, 2018

१४ जानेवारी,२०१८

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

राजभाषा मराठी धोरण प्रश्नमंजुषा - ३

दिनांक:- आज १४ जानेवारी

वेळ:-रात्री ९ ते १०

नमस्कार,

शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा १००%वापर व्हावा आणि राजभाषा मराठी विषयक शासनाचे नेमके धोरण समजून घेणे आणि त्या दृष्टीने त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
म्हणूनच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आपल्यासमोर ही प्रश्नमंजुषा सादर करीत आहे. येत्या वर्षात वेगवेगळ्या उपक्रमांच्याद्वारे याबाबत अधिकाधिक जनजागरण केले जाईल.

गुगल फॉर्म - https://goo.gl/forms/DYmm9FMpwcvQUsEE2

#राजभाषामराठी
#लोकभाषामराठी
#मराठीबोलाचळवळ
#मराठीभाषापंधरवडा
#ज्ञानभाषामराठी

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

१४/१/२०१८

🧐मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- 'कहाडून ठेव' ही मराठीच्या कोणत्या बोलीतील रचना आहे?

अ)वऱ्हाडी
ब)अहिराणी
क)नागपुरी
ड)डांगी

उत्तर-अ-वऱ्हाडी

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस व ईशान्य सीमेपर्यंत पसरलेला विदर्भाचा फार मोठा भूभाग वऱ्हाडी बोलीचा येतो.प्रांत,जात,व्यवसाय पूर्वपरंपरा इत्यादींवरून या पोटभाषेचे अनेक उपभेद पडलेले दिसतात.नागपुरी बोलीशी वऱ्हाडीचे जवळचे नाते असले तरी ती अलीकडे वेगळी मानली जाते.

प्रश्न २- 'अथाकन','टिमकारणे' हे शब्द कोणत्या बोलीतील आहे?

अ)डांगी
ब)संगमनेरी
क)गोंडी
ड)अहिराणी

उत्तर-ड-अहिराणी

अथाकन म्हणजे इकडून आणि टिमकारणे म्हणजे चोपणे.गुजराती भाषेची छाप या बोलीवर आहे.अर्थात बराचसा भाग डोंगराळ असल्याने स्थानपरत्वे बोलीच्या स्वरूपात फरकही पडतो.

प्रश्न ३- 'मुई गेलो ,तुई गेला' ही रचना कोणत्या बोली/उपभाषेतील आहे?

अ)हळबी
ब)वऱ्हाडी
क)नागपुरी
ड)मालवणी

उत्तर-अ-हळबी

ही एक वऱ्हाडीचीच उपभाषा/बोली होय.मध्यप्रांतातील बस्तर,चांदा,भंडारा,रायपूर इत्यादी विभागातील हळब लोक हिंदीमिश्रित मराठी बोलतात.त्यांची मराठी छत्तीसगढीकडे झुकणारी आहे.'मुई गेलो,तुई गेला' ,'तुई होलीस,मुई होले' अशी भूतकाळी रूपे दिसतात.

प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्यांचे अभिनंदन!!

डाॅ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा 

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञानकथा

मिती - भ्रमण

२जानेवारी २१२१. आज आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचा पहिला दिवस. यंदा परिषदेचे आयोजन करण्याचा मान पुण्याच्या मल्टिव्हर्सिटीला मिळाला होता. पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर उद्घाटन सोहळ्यास सुरुवात झाली. पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वाना संबोधित केले. तारका अभ्यंकर यांचा पेपर सादर होईपर्यंत आपण हजर राहणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्यावर उपस्थितांनी त्यांच्या जिज्ञासेचे स्वागत केले. बुद्धिवंतांप्रमाणेच सामान्यजनही त्यांचे भाषण ऐकायला उत्सुक असल्यामुळे इंटरनेट आणि टेलिव्हिजनवरही परिषदेचे थेट प्रक्षेपण होत होते.
मल्टिव्हर्सिटीतील ज्येष्ठ वैज्ञानिक तारका अभ्यंकर म्हणजे विज्ञानजगतातील एक लखलखता ताराच. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय गटाने सजीवांच्या प्रतिकायेच्या (अँटिबॉडी) अस्तित्वाचा सादर केलेला पुरावा क्रांतिकारक ठरला होता.
पॉल डिरॅक यांनी अनुमान केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनच्या प्रतिकणाचे- पॉझ्रिटॉनचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर वैज्ञानिकांच्या लक्षात आले की, प्रत्येक परमाणूचा ‘प्रतिपरमाणू’ अस्तित्वात असतो. परमाणू व त्याच्या प्रतिपरमाणूचे मीलन झाले असता दोघांचाही नाश होऊन ऊर्जा उत्सर्जित होते. स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या ‘द ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या पुस्तकात या जगाचे ‘प्रतिविश्व’ अस्तित्वात असण्याविषयी अंदाज बांधला होता. अशा प्रतिविश्वात सर्व सजीवांच्या ‘प्रतिकाया’ अस्तित्वात असतील. त्यांनी या पुस्तकात गमतीने सल्ला दिला होता की, कृपया, तुमच्या प्रतिकायेशी हस्तांदोलन करू नका; अन्यथा तुम्हा दोघांचाही नाश होऊन ऊर्जा उत्सर्जित होईल.
तारका अभ्यंकर पेपर सादर करण्यासाठी उभ्या राहिल्यावर सभागृहात शांतता पसरली. सर्वाच्या नजरा व कान त्यांच्यावर रोखले गेले. चाळिशीतल्या तारका अभ्यंकर म्हणजे सौंदर्य व प्रज्ञेचा अनोखा संगम होता. व्यासपीठामागील भव्य पडद्यावरील स्लाइड शोच्या साहाय्याने त्यांनी पेपर सादर करायला सुरुवात केली..
‘पाच वर्षांपूर्वी मी व माझ्या सहकाऱ्यांनी सजीवांच्या प्रतिकायेचे अस्तित्व सिद्ध केल्यानंतर अधिक संशोधन करण्यासाठी प्रतिकाया प्रकल्पाचा विस्तार केला गेला. मल्टिव्हर्सिटी, ‘आयुका’, टी. आय. एफ. आर. आणि इतर दहा देशांमधील विज्ञानसंस्थांमधून दोनशे वैज्ञानिक या प्रकल्पात काम करीत आहेत. त्याचप्रमाणे काही सरकारी व खासगी क्षेत्रातील कंपन्यांचाही यात सहभाग आहे.
सजीवांच्या प्रतिकायेच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना असे दिसून आले की, हे विश्व त्रिमितीय नसून यापेक्षा अधिक मितींनी बनलेले आहे. सूर्यमाला ओलांडून आंतर-तारकीय अभिक्षेत्रात गेलेल्या ‘व्हॉयेजन’ने पाठविलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यावर ‘आयुका’च्या वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, हे अभिक्षेत्र चौमितीय असावे. हॉकिंग यांच्या ‘सुपरस्ट्रिंग थिअरी’नुसार विश्व दहा मितींनी बनलेले असावे.
विश्व तीनपेक्षा अधिक मितींचे आहे व आपल्याला जाणवणारे त्रिमितीय जग त्याचा उप-अवकाश (सब-स्पेस) आहे हे लक्षात आल्यावर द्विमितीय जगसुद्धा अस्तित्वात असण्याच्या शक्यतेचा विचार करून आम्ही त्या दिशेने संशोधन सुरू केले.
कालयंत्राच्या साहाय्याने कालभ्रमण (टाइम ट्रॅव्हल) करण्याविषयी आपण परिचित आहोत. त्याप्रमाणे ‘मितीभ्रमण’ करण्यासाठी आम्ही मितीयंत्र बनविण्याचे ठरविले. दोन वर्षांच्या परिश्रमांनंतर सजीवांना द्विमितीय जगात नेणारे पहिले ‘प्रोटोटाइप’ तयार झाले. त्याचे परीक्षण करण्यासाठी प्रथम आम्ही बेडूक व उंदीर यांच्यावर प्रयोग केले. त्यांना द्विमितीय जगात नेऊन परत आणण्यात आम्ही यशस्वी झालो.
द्विमितीय जगाचा अभ्यास करण्यासाठी कुणा व्यक्तीला त्या जगात जाणे आवश्यक होते. त्यात धोका हा होता की, द्विमितीय जगात गेलेल्या सजीवांचे अस्तित्व पूर्णपणे जाणवेनासे होते आणि कुठल्याही साधनाने ते शोधता येत नाही. त्यासाठी आम्ही मितीयंत्रात अनेक सुधारणा केल्या, सुरक्षेसाठी उपाययोजना बसविल्या आणि या प्रयोगाच्या यशस्वीतेकरिता मी स्वत: त्या जगात जाण्याचे ठरविले.
ठरलेल्या दिवशी मी मितीयंत्रात गेल्यावर सहकाऱ्यांनी मितीयंत्र सुरू केले. हळूहळू माझी एक मिती आक्रसली जाऊ लागली व काही वेळातच मी द्विमितीय जगात प्रवेश केला. प्रथम मी जवळपासच्या खाणाखुणांचा अंदाज घेतला आणि माझे श्वासोच्छ्वास मोजायला सुरुवात केली. श्वासोच्छ्वास मोजून मी तिथे किती काळ आहे याचा अंदाज घ्यायचा व जास्तीत जास्त पाच तास होताच, किंवा काहीही धोका वाटल्यास परत त्याच जागी यायचे असे आमचे ठरले होते. माझे सहकारी मला परत आणण्यासाठी मितीयंत्राचे अनुयोजन करून ते सतत सुरू ठेवणार होते.
तिथे मंदसा प्रकाश पसरलेला होता. आजूबाजूला कोणीही नव्हते. पण एका दिशेने काही आवाज येत होते. मी त्या दिशेने जाऊ लागले. वाटेत काही त्रिकोणी व चौकोनी प्राणी दिसले. जवळ आल्यावर ते थांबून काहीसा आवाज करून परत त्यांच्या मार्गाने जाऊ लागत. येथील सर्व गोष्टींना लांबी व रुंदी अशा दोनच मिती होत्या.
पुढे गेल्यानंतर मला एक वर्तुळाकार प्राणी दिसला. माझ्या जवळ येऊन स्वत:भोवती प्रदक्षिणा घालून तो उभा राहिला. काय करावे, हे न कळल्याने मी स्तब्ध उभी राहिले. माझ्याभोवती एक प्रदक्षिणा घालून तो म्हणाला, ‘तुम्ही इथे नवीन आहात वाटतं. मी श्याम. तुमचे नाव काय? तुम्ही कोठून आलात?’ मी माझे नाव व त्रिमितीय जगातून आल्याचे सांगितले. त्याला माझे नाव कळले असावे आणि मी दुसऱ्या कुठल्यातरी जगातून आल्याचे समजले असावे. तो फक्त हसला व आम्ही आवाजाच्या दिशेने चालू लागलो.
वाटेत आणखी वेगवेगळ्या आकारांचे प्राणी दिसले. त्यांच्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘या जगात सुरुवातीला तापमान खूप कमी असे. तेव्हा केवळ एकरेषीय प्राणी असत. अनेक शतकांनंतर सरासरी तापमान वाढू लागल्यावर त्यांच्यात परिवर्तन होऊन त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी असे अधिक प्रगत प्राणी निर्माण होत गेले. उत्क्रांतीच्या या टप्प्यावर माझ्या जातीचे सर्वाधिक प्रगत वर्तुळाकार प्राणी अस्तित्वात आले आहेत.
निसर्गाने आमच्या दोन डोळ्यांची रचना अशा प्रकारे केली आहे की ‘द्विनेत्री दृष्टी’मुळे (बायनॅक्युलर व्हिजन) आम्हाला सर्व गोष्टींच्या द्विमितीय आकाराची जाणीव होते. अन्य प्राण्यांना सर्व काही एकमितीय म्हणजेच एका सरळ रेषेसारखे दिसते. सर्व प्राण्यांच्या छातीच्या रंगावरून लिंगभेद ओळखता येतो. वयात आलेल्या मादीची छाती पिवळ्या रंगाची आणि नराची भुरकट रंगाची असते.’
आजपर्यंत आपल्याला अज्ञात असलेल्या द्विमितीय जगाविषयी जाणून घेत असताना माझ्या लक्षात आले की, तिथे राहण्याची पाच तासांची मुदत संपत आली आहे आणि मला त्रिमितीय जगात परतण्यासाठी प्रारंभीच्या ठिकाणी जायला हवे. मी श्यामला म्हणाले, ‘इथल्या सर्व गोष्टींविषयी, विशेषत: तुमच्याविषयी जाणून घेण्याची मला खूप इच्छा आहे. परंतु आता मला माझ्या जगात जाणे आवश्यक आहे. माझे मित्र माझी वाट बघत असतील. मी गेले नाही तर ते काळजी करतील. पण मी परत नक्की येईन.’
मी परत जाणार हे ऐकून श्याम हिरमुसला. पण त्याला माझे म्हणणे पटले व तो मला प्रारंभीच्या ठिकाणी सोडायला आला. प्रारंभीचे ठिकाण जवळ आल्यावर मी म्हणाले, ‘इतक्या लवकर जाताना मलाही वाईट वाटते आहे. पुढच्या वेळी मी जास्त वेळाकरिता येईन. पण जाण्याआधी मला एक सांगा की, वयात आलेल्या नराची छाती भुरकट व मादीची पिवळी असते, मग तुमची छाती काळपट व माझी लाल रंगाची आहे याचा अर्थ काय?’ श्याम हसत म्हणाला, ‘मी याचे सविस्तर उत्तर तुम्ही परत याल तेव्हा देईन. आता थोडय़ा वेळात सांगता येणार नाही.’ आणि स्वत:भोवतीच प्रदक्षिणा घालून तो उभा राहिला.
मीसुद्धा स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालून प्रारंभीच्या ठिकाणी जाऊन उभी राहिले. हळूहळू माझी तिसरी मिती प्रसरण पावू लागली व काही वेळातच माझा त्रिमितीय जगात प्रवेश झाला. मी सर्वत्र नजर फिरवली. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात माझे स्वागत केले. मितीयंत्र बंद करण्यात आले. आणि माझ्या सर्व शारीरिक तपासण्या करण्यासाठी मला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत ठेवून माझी रवानगी रुग्णालयात करण्यात आली.. 
या प्रकल्पातील माझ्या सहकाऱ्यांचे हे यश आपल्यासमोर सादर करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आभारी आहे.’
तारका अभ्यंकरांनी बोलणे थांबविल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालिकेने त्यांच्या द्विमितीय जगाच्या पुनर्भेटीविषयी सर्वाना उत्सुकता असल्याचे सांगून त्यांच्या प्रकल्पाला सुयश चिंतिले.   

-अविनाश ताडफळे

संदर्भ : दै. लोकसत्ता ११जानेवारी २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

#वाचनीय

नागरिकशास्त्र

वाहतूक खुणा

■ वाहतूक खूण

ही वाहतुकीचे नियमन वा मार्गदर्शन करण्यासाठी अथवा इशारा देण्यासाठी शब्दांनी वा संकेत चिन्हांनी एखादा विशिष्ट संदेश देण्याकरिता स्थिर अथवा सुबाह्य आधारावर बसविलेले साधन असते. हे सर्वांत सामान्यपणे वापरले जाणारे आणि वाहतूक नियंत्रित, सुरक्षित व त्वरेने होण्यास मदत करणारे सर्वांत जुने साधन आहे.
जेथे विशेष नियम विशिष्ट जागी किंवा कालावधीत लागू असतो, जेथे धोके स्वतः सिद्ध नसतात व जेथे माहिती पुरविणे जरूरीचे असते तेथे वाहतूक खुणा अत्यावश्यक असतात.

आ. १. इशारे देणाऱ्या काही वाहतूक खुणा : (१) नागमोडी वळण (उजवीकडे),
(२) रस्त्याच्या पातळीतील रेल्वे ओलांडणी (सुरक्षित), (३) उजवीकडील वळण,
(४) उजवीकडे फाटा, (५) उजवीकडील तीव्र वळण,
(६) अरुंद पूल. या खुणांतील कडेची चौकट तांबड्या रंगाने, आतील भाग पांढऱ्या रंगाने व प्रत्यक्ष खूण काळ्या रंगाने दर्शवितात.नियामक खुणांत थांबा, वेगमर्यादा, वेगरोधक, वळण्यास मनाई, वाहनमार्ग उपयोग, एकरेषीय वाहतूक, प्रवेश बंद, एकमार्गी वाहतूक, वाहनतळ, पादचारी वगैरे खुणांचा समावेश होतो. यांतील काही मनाई करणाऱ्या (उदा., प्रवेश बंद, वेगमर्यादा) व काही अनिवार्य (उदा., थांबा, डाव्या बाजूने चालवा) आहेत. इशारा देणाऱ्या खुणांत मोटार चालकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे अशा परिस्थिती संबंधीच्या माहितींचा समावेश असतो. या माहितीत वेग कमी करण्यासंबंधी किंवा अन्य काही हालचाली करण्यासंबंधी आवाहन असण्याची शक्यता असते. इशाऱ्याच्या खुणांचा उपयोग करणे इष्ट ठरेल अशी नमुनेदार स्थाने व धोके म्हणजे तीव्र वळणे, उभे चढ वा उतार, चौक, अरुंद रस्ते, अरुंद पूल, खराब पृष्ठभाग परिस्थिती, रेल्वेमार्ग ओलांडणी, इतर प्रवेशमार्ग व ओलांडण्या, शाळा क्षेत्र वगैरे. मार्गदर्शक खुणांत मार्ग, इष्ट स्थान, अंतर व माहिती यांचा अंतर्भाव होतो.

बहुतेक देशांत *वाहतूक खुणांच्या* बाबतीत एकविध राष्ट्रीय मानके अंगीकारण्यात आलेली आहेत.
पश्चिम यूरोपात भाषेचा अडथळा टाळण्यासाठी शब्दांऐवजी खुणा वापरणारी आंतरराष्ट्रीय पद्धत यशस्वीपणे उपयोगात आलेली आहे.

*संयुक्त राष्ट्रांच्या वाहतूक खुणांबाबतच्या करार मसुद्यात आंतरराष्ट्रीय मानके योजण्यात आलेली आहेत.*

वाहतूक चिन्हे:

 ही चिन्हे वाहतुकीचे नियमन वा मार्गदर्शन करण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी रस्त्याच्या पृष्ठभागात बसविलेली, त्याला लावलेली, फरसबंदीच्या पृष्ठभागाला किंवा दगडी कडेच्या अथवा रस्त्यांतील वा लगतच्या वस्तूंना जोडलेली असतात.

यांचे स्वरूप रेषा, संकेत चिन्हे, शब्द, रंग व वाहतूक खुणांपेक्षा अन्य साधने असे असते.
काही बाबींत ही चिन्हे इतर वाहतूक साधनांच्या नियमन करण्याच्या वा इशारा देण्याच्या कार्याला पूरक म्हणून वापरतात. इतर बाबींत चालकाचे रस्त्यावरील लक्ष विचलित न करता विशिष्ट विनिमय, इशारा वा माहिती देण्याचे कार्य परिणामकारकपणे करणारी साधने म्हणून केवळ त्यांचाच उपयोग करतात.

फरसबंदीवरील चिन्हांमध्ये मध्यवर्ती रेषा, वाहनमार्ग रेषा, न ओलांडण्याची रेषा, फरसबंदीच्या कडा दर्शविणाऱ्या रेषा, फरसबंदीच्या रुंदी संक्रमणाच्या रेषा, अडथळा जवळ येत असल्याच्या रेषा, द्रुत महामार्गांच्या प्रवेश निर्गम व उतरणी (ढाळ वाटा) दर्शविणारी चिन्हे, आडव्या रेषा (पादचारी ओलांडणी मार्ग, वाहनतळ), दगडी कडा दर्शविणारी चिन्हे आणि विविध शब्द व संकेत चिन्हे यांचा समावेश होतो.

वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्याच्या एका बाजूच्या पदपथावरून दुसऱ्या पदपथावर पादचाऱ्यांना जाण्याकरिता किंवा चौक ओलांडण्यासाठी एक राखीव पट्टी रस्त्यावर आखतात. तिला पादचारी ओलांडणी मार्ग म्हणतात. रस्त्याच्या मध्यावर या पट्टीत आसरे ठेवतात व अर्धा रस्ता ओलांडल्यावर पादचाऱ्यांना जरूर तर तेथे थांबता येते. या पट्टीवर काळ्या पांढऱ्या किंवा काळ्या पिवळ्या रंगांचे तिरपे पट्टे (झीब्रा क्रॉसिंग) काढलेले असतात. या पट्ट्यावरून पादचारी चालत जात असताना वाहनांनी थांबून पादऱ्यांना जाऊ देणे बंधनकारक असते.

परावर्तक चिन्हे ही एकाकी परावर्तक बटने, बटनांचे समूह, परावर्तक थर दिलेले लहान फलक अथवा तत्सम साधने अशा स्वरूपाची असतात. ही चिन्हे रस्त्यावरील व त्याच्या जवळील भौतिक अडथळे अथवा इतर धोके दर्शविण्यासाठी किंवा श्रेणीच्या रूपात रस्त्याची हद्द दर्शविण्याकरिता वापरतात. पहिल्या उपयोगात त्यांना धोकादर्शक चिन्हे व दुसऱ्या उपयोगात सीमारेखक म्हणतात.

वाहतूक नियंत्रण द्वीप:

हे द्वीप म्हणजे वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा पादचाऱ्यांना आसरा मिळण्यासाठी वाहनमार्गाच्या दरम्यान सीमांकित केलेले क्षेत्र असते. द्वीप क्षेत्रात, तसेच वाहतूक वळविणाऱ्या वा इशारा देणाऱ्या साधनांनी व्यापलेल्या आगम क्षेत्रात वाहनांची वर्दळ होऊ नये असा उद्देश असतो. वाहतूक द्वीपे सामान्यतः अरुंद व लांबट किंवा त्रिकोणी वा वर्तुळाकार असतात. त्यांचे सीमांकन दगडी कडा, फरसबंदी चिन्हे किंवा सुबाह्य बैठकीवर बसविलेली चिन्हे यांनी करण्यात येते.

आ. १. वर्तुळाकार वाहतूक नियंत्रण द्वीप : (१) वाहतूक नियंत्रण द्वीप, (२) पदपथ, (३) सायकल मार्ग, (४) आसरा व वाहतूक मार्गीकरण द्वीप, (५) पादचारी ओळांडणी मार्ग, (६) सुरक्षा कुंपण.

कार्यानुसार वाहतूक नियंत्रण द्वीपांचे तीन प्रकार करण्यात येतात : (१)पादचारी आसरा द्वीपांचा उपयोग शहरी क्षेत्रातील अपवादात्मक रुंद असलेल्या रस्त्यांवर किंवा जेथे पादचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अथवा पादचाऱ्यांना ओलांडणे अवघड अगर धोकादायक होईल इतकी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते अशा मोठ्या अनियमित आकाराच्या चौकांत वापरतात. 
(२) वाहतूक विभाजक द्वीपे रस्त्याच्या मार्गातच असतात आणि ही एकाच दिशेतील वा विरुद्ध दिशांतील वाहतुकीचे विभाजन करतात.
 (३)वाहतूक मार्गीकरण द्वीपे चौकांमधील क्षेत्रात वाहतुकीच्या विशिष्ट हालचाली (विशेषतः वळण्याच्या हालचाली) निश्चित मार्गात बद्ध करतात.

संदर्भ~मराठी विश्वकोश

संकलन - वृषाली गोखले
गट -रायगड
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

No comments:

Post a Comment