Tuesday, January 2, 2018

2 जानेवारी


च्युईंग गम खाल्ल्याचे फायदे!

२००९ मध्ये NCBI ने याबाबत लेख प्रसिद्ध केलेला असून त्यात च्युईंग गम चघळल्याने मेंदू सतर्क राहतो असे म्हटलेले आहे तर २०११ मध्ये NBCNEWS ने दिलेल्या वृत्ताप्रमाणे पुढील माहिती समोर आली :

 अमेरिकेच्या सेंट लॉरेंस विद्यापीठात हा प्रयोग करण्यात आला. परीक्षेच्या आधी ५ मिनिट च्युईंगगम चघळत वाचलेले अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिले. च्युईंग गम चघळल्याने मेंदू सतर्क राहतो,त्याचप्रमाणे चघळण्याच्या प्रक्रियेमुळे हृदयाची गती , मेंदूला होणारा रक्तप्रवाह, रक्तदाब वाढून हा प्रभाव पुढील १५-२० मिनिटे टिकून राहतो. विद्यार्थी साधारण याच १५-२० मिनिटाचा फायदा करून परीक्षेत चांगले गुण मिळवण्याकरता प्रयत्न करू शकतात.

 एवढंच नाही तर २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या *“Clinical Practice and Epidemiology in Mental Health - Publisher: BioMed Central Ltd, Bentham Open”* या संशोधनामध्ये असेही आढळून आले की, साधारण २ आठवडे दिवसातून २ वेळा च्युईंगगम चघळल्याने अभ्यासाशी निगडीत चिंता, भय, नैराश्य, मानसिक थकवा आणि संभ्रम कमी होण्यास मदत मिळू शकते.

#म
#मराठी
#ज्ञानकण - २
#मराठीभाषापंधरवडा
#ज्ञानभाषामराठीपंधरवडा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

◾◾◾◾◾◾◾◾◾◾

ज्ञानभाषामराठीपंधरवडा

दि.२/१/२०१८

🧐 मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरणे

◾ प्रश्न १- ' ताम्बूल' शब्द कोणत्या भाषेतील आहे जो संस्कृतमधे समाविष्ट झाला.

अ) रोमन
ब)तुर्की
क)बंगाली
ड)ऑस्ट्रिक

उत्तर-ड- ऑस्ट्रीक

संस्कृतमधे ऑस्ट्रीक भाषेतून देखील शंभरपेक्षा जास्त शब्द समाविष्ट झालेले आहेत.'ताम्बूल' हा शब्द ऑस्ट्रीक भाषेतून आला आहे.हा शब्द आपण हमखास पौरोहित्य करणार्या भटजींच्या तोंडून पूजाविधींमधे संस्कृतमधून नेहमीच ऐकतो.

प्रश्न २- यवन,यवनिका हे शब्द कोणत्या मूळ भाषेतून संस्कृतमधे आलेत?

अ)ईराणी
ब)यूनानी
क)अर्धमागधी
ड)प्राकृत

उत्तर-ब-यूनानी

सिकंदर भारतात येण्यापूर्वीपासून
यूनान व भारतामधे बरेच जुने व्यापारी संबंध होते.या संपर्कामुळेच बरेच शब्द यूनानी भाषेने संस्कृतमधून घेतले तर संस्कृतने यूनानीमधून घेतले.म्हणजेच यूनानी-संस्कृतमधे त्यावेळी भाषिक आदानप्रदान झालेले आहे.परिणामस्वरूप यवन,यवनिका यूनानीमधून सहजच संस्कृतमधे आले व कालांतराने मराठीने देखील घेतले.

प्रश्न ३- ' मिहीर' म्हणजे सूर्य.हा कोणत्या भाषेतून आला ?

अ)अरबी
ब)ईराणी
क)उर्दू
ड)संस्कृत

उत्तर-ब-ईराणी

भाषावर्गिकरणानूसार भारतीय भाषापरिवारातील 'भारत-ईराणी'ही एक शाखा आहे.या शाखेमधे ईराणी अंतर्गत अवेस्ता,फारसी,पश्तो आदि भाषा येतात.यापैकी कोणत्याही भाषेमधून मिहीर शब्दाचे आदानप्रदान झालेले संभवते;म्हणून इथे पर्यायांमधे सर्वसमावेशक असा ईराणी हा पर्याय दिला आहे.ईराण आणि भारतातील संबंध प्राचीन आहेत.यामुळे ईराणी भाषांमधून शेकडो शब्द भारतात आले.मिहीरप्रमाणे 'बादाम'हा शब्द देखील ईराणमधूनच आलेला आहे.

डाॅ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञानकथा

ब्रह्म


प्रो. परांजपे गेले कित्येक महिने एका फोन कॉलची वाट पाहत होते. त्यांचा मुलगा ब्रह्म याच्या फोन कॉलची. तो एक कॉल त्यांच्या आयुष्याचं सार्थक करणार होता. आयुष्यभर उराशी जपलेलं स्वप्न साकारणार होता. कैक रात्री त्यांनी या कॉलची वाट बघत जागून काढल्या होत्या. मध्यरात्री त्यांचा फोन खणाणला. थरथरत्या हातांनी त्यांनी तो उचलला. जिनिव्हाचा नंबर बघून त्यांना खात्रीच पटली.. हाच तो कॉल.. त्यांचं आयुष्य सार्थकी लावणारा. फोन CERN डिरेक्टरचा होता. (CERN ही जिनिव्हातील नामांकित प्रयोगशाळा आहे.विश्वनिर्मितीचं गूढ उकलणारे प्रयोग या प्रयोगशाळेत केले जातात.) त्यांच्याशी बोलल्यावर परांजपे मटकन् खुर्चीतच कोसळले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकतेय की काय असं त्यांना वाटू लागलं. सुन्न होऊन ते पलंगावर पडून राहिले.

गेल्या २८ वर्षांतला काळ भराभर त्यांच्या नजरेसमोरून सरकू लागला. ब्रह्म हा त्यांचा एकुलता एक मुलगा. जन्मला त्या दिवशी त्यांना कोण आनंद झाला होता! ब्रह्मच्या रूपाने त्यांचं अपुरं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं एक साधनच त्यांना मिळालं होतं. परांजपे स्वत: विज्ञानाचे प्राध्यापक होते. देशातल्या अग्रगण्य विज्ञान संशोधन संस्थेत ते कार्यरत होते. पदार्थविज्ञानाचे ते नावाजलेले प्रोफेसर होते. त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं, वैज्ञानिक लेख प्रसिद्ध झाले होते. न्यूटन, आइनस्टाईन यांच्याप्रमाणे आपणही काहीतरी भव्यदिव्य शोध लावावा, जगप्रसिद्ध व्हावं असं त्यांना नेहमी वाटे. त्यासाठी चिकाटीने त्यांचं संशोधनही चालू होतं. परंतु त्यांना अपेक्षित असलेलं यश त्यांच्या दृष्टिपथातही आलं नव्हतं. म्हणूनच आपलं हे अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ब्रह्मचा जन्म झाला आहे असं त्यांना वाटू लागलं. त्याकरता त्यांनी मुलाचं नावही ‘ब्रह्म’ ठेवलं. ब्रह्म.. सृष्टी निर्माण करणारा!

ब्रह्मला त्यांनी वाढवलंही तसंच. त्याच्या आजूबाजूला सतत विज्ञानच असेल याची त्यांनी काळजी घेतली. इतर मुलांसारखा तो वाढलाच नाही. मित्र नाहीत. खेळ नाहीत. खेळणी म्हणजे फक्त scientific toys. वडिलांबरोबर क्रिकेट, फुटबॉल खेळताना त्याला न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करावे लागत, तर पाण्यात खेळताना आर्किमिडीजचे. सुरुवातीला ब्रह्मने त्याबद्दल आकांडतांडव करून पाहिलं. त्यालाही वाटे, बरोबरीच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळावं, पतंग उडवावे. परंतु हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं, की यातलं आपल्याला काहीही करता येणार नाही. मग स्वत:ला तो त्याच्या अभ्यासिकेत कोंडून घेऊ लागला. तिथेच त्याने छोटीशी प्रयोगशाळाही सुरू केली. विज्ञानावरची अनेक पुस्तकं गोळा केली. ब्रह्म तीव्र बुद्धिमत्तेचा होताच. विज्ञानात पीएच. डी. संपादन करून पुढील शिक्षणासाठी तो परदेशी गेला.

जिनिव्हा येथील CERN सारख्या नामांकित संस्थेत त्याची नेमणूक झाली. ‘god’s particle’ शोधण्याच्या मोहिमेत त्याने मोलाची कामगिरी पार पाडली. अखंड मेहनत आणि तीव्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर लवकरच तो मानाच्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत जाऊन बसला. CERN इथे विश्वनिर्मितीची उकल करणारे अनेक प्रयोग सुरू होते. विश्वाच्या निर्मितीच्या वेळी निर्माण झालेली द्रव्याची अवस्था प्रयोगशाळेत निर्माण करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ तिथे अहोरात्र कार्यरत होते. ब्रह्मदेखील या टीमबरोबर काम करीत होता. त्याच्या कामगिरीवर परांजपे खूश होतेच; परंतु ब्रह्मचा जन्मच मुळी काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी झालाय, हे ते विसरत नव्हते. सहा महिन्यांपूर्वी ब्रह्मने त्यांना फोन करून कळवलं होतं- ‘बाबा, तुमच्या इच्छापूर्तीचा क्षण जवळ येऊन ठेपलाय. लवकरच तुम्हाला अपेक्षित असलेलं संशोधन मी प्रकाशात आणणार आहे.’ हे ऐकून परांजपेंना आभाळ ठेंगणं झालं होतं. ब्रह्मच्या फोनची म्हणूनच ते वाट पाहत होते. आणि आता फोन आला होता CERN director चा.. ‘ब्रह्मला अटक केल्याचं’ कळवणारा!

ब्रह्मने प्रयोगशाळेत बऱ्याच प्रमाणात antimatter (प्रतिद्रव्य) बनवून त्यापासून बॉम्ब बनवला होता. अणुबॉम्बपेक्षाही कितीतरी पटीने संहार करण्याची क्षमता त्यात होती. ब्रह्म सृष्टी निर्माण करणारा न ठरता सृष्टीचा विनाश करणारा ठरला होता. Antimatter बऱ्याच प्रमाणात तयार करणं आणि साठवून ठेवणं हे खरं तर ब्रह्मने साधलेलं खूप मोठं यश होतं. भल्या भल्या शास्त्रज्ञांना ते जमलं नव्हतं. परंतु त्याचा वापर ब्रह्मने विनाशासाठी करायचा असं ठरवलं होतं. त्याच्या सहकाऱ्याला त्याच्या या प्रयोगाची कुणकुण लागल्याने त्याने ही बातमी वरिष्ठांच्या कानावर घातली होती आणि म्हणूनच ब्रह्मला अटक झाली होती. त्याने केलेला गुन्हाच इतका भयंकर होता, की यातून त्याच्या सुटकेची अपेक्षा करणंही व्यर्थ होतं. आपल्या अविवेकी, अतिरेकी महत्त्वाकांक्षेचं ओझं ब्रह्मने आयुष्यभर बाळगलं होतं, म्हणूनच तो आज असा वागला होता. त्याच्या ऱ्हासाला आपणच कारणीभूत असल्याची जाणीव परांजपेंना झाली. पण त्याला आता फार उशीर झाला होता.. फार उशीर..

(टीप : antimatter- एखाद्या कणाइतकेच वस्तुमान; परंतु विरुद्ध प्रभार असलेला कण म्हणजे antiparticle. अशा कणांचा समूह म्हणजे antimatter. (उदा. electron चा antiparticle positron आहे.)

भाग्यश्री चाळके – bachalke@gmail.com

संदर्भ : दै. लोकसत्ता ६ डिसेंबर २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषामराठीपंधरवडा🚩

भारतातील प्रसिद्ध सरोवरे:- चिलका सरोवर

मराठीत ज्याला खाजण म्हणतात तसे चिलका सरोवर हे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे.जगातील हे दुसर्‍या क्रमांकाचे खाजण आहे. ओरिसा राज्यातील पूरी, खुर्दा व जंगम या तीन जिल्ह्याच्या निकट हे सरोवर वसले आहे. आसपासच्या ३५६० चौरस किलोमीटर परिसरातून या सरोवराकडे उतार असून तिथून या सरोवरात पाण्याची आवक होते. भार्गवी, दया, मक्रा, मलगवी, लुना या सारख्या नद्या व इतर ४७ विविध प्रवाह या सरोवरात पाण्याची भर घालत असतात. सातपाडा हा ३२ किलोमीटर लांबीचा चिंचोळा प्रवाह या सरोवरातील अतिरिक्त पाणी बंगालच्या उपसागराकडे वळवितो.

या सरोवराची लांबी ६४ किलोमीटर असून त्याचे क्षेत्रफळ जवळपास ९०० चौरस किलोमीटर आहे. या सरोवराची जास्तीतजास्त खोली ही ४.२ मीटर एवढी आहे. म्हणजेच हे सरोवर बरेच उथळ असल्याचे आपल्या लक्षात येईल. विविध देशातील व परदेशातील प्रदेशातून येणारे पक्षांचे थवे हे या सरोवराचे वैशिष्ट्य आहे. जगातील प्रसिद्ध कास्पियन, बैकल, अरल सरोवराकडूनच नव्हे तर रशिया, किरगीजस्तान, मंगोलिया, लडाख, दक्षिण पूर्व आशिया व हिमालयीन रांगा इतक्या दूरदूरुन विविध जातींचे पक्षी इथे निवासासाठी येत असतात. अभ्यासातून असे लक्षात आले आहे की जवळपास १६० प्रजातींचे पक्षी येथे येत असतात.

१०००० वर्षांपूर्वी हे सरोवर बंगालच्या उपसागराचाच एक भाग होता असे म्हणतात. १९८१ साली झालेल्या जागतिक रामसर कराराप्रमाणे जगातील दलदलीचा प्रदेश म्हणून या सरोवराला मान्यता मिळाली आहे. फार पूर्वीचे काळी कलिंग राज्याच्या कालखंडात हे जागतिक बाजारासाठी एक महत्वाचे बंदर असल्याचे पुरावे पुढे आले आहेत. इथे उत्खनन करतांना अनेक जाहजांची नांगरे सापडली आहेत. या सरोवरात असंख्य बेटे आहेत. १३२ गावातील दीड लाखांचे वर मच्छिमारांचा रोजगार या सरोवरावर अवलंबून आहे.

या सरोवराच्या विकासासाठी १९९२ साली चिलका डेव्हेलपमेंट अथॉरिटी नावाची संस्था स्थापन करण्यात येवून तिच्याकडे या सरोवराच्या विकासाची जबाबदारी या संस्थेवर सोपविली गेली आहे. इंडीयन सोसायटी रजिस्ट्रेशन ACT या कायद्याखाली या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणेः (१) सरोवराच्या पारिस्थितीकीचे संरक्षण करणे (२) समाजाच्या हिताच्या दृष्टीने उपलब्ध साधनसामग्रीचा एकात्मिक विकास साधणे (३) जगातील व देशातील इतर संस्थांच्या मदतीने बहुआयामी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे (४) जगातील व देशातील या संबंधात कार्य करणार्‍या संस्थांशी संपर्क साधून भविष्यातील विकासाची दिशा ठरविणे.

या संस्थेने एक अतिशय उपयुक्त अशी भागीदारी प्रस्थिापित केली आहे. या भागीदारीत राज्य सरकारची १७ कार्यालये, ३३ स्वयंसेवी संस्था, ४ देशाची मंत्रालये, ६ राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संस्था, १२ संशोधन संस्था व ५ कमियुनिटी ग्रूप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. १९९२ साली सुरवातीला या सर्वांना घेवून एक कृती आराखडा तयार करण्यात आला पण योग्य तांत्रिक ज्ञानाअभावी तो मूर्त स्वरुपात ये़वू शकला नाही. म्हणून १९९७ साली आधीच्या आराखड्याची पुनर्रचना करुन त्यातील दोष दूर केले व नवीन कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संस्थेला केलेल्या कामाबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्‍त झाले आहेत.

संदर्भ: जल संवाद, जुलै २०१७
(http://hindi.indiawaterportal.org/node/56647)

संकलन:-निवेदिता खांडेकर

समूह:- ज्ञानभाषा मराठी मुख्य समूह
प्रशासक, ज्ञानभाषा मराठी, विदर्भ विभाग

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment