Thursday, January 4, 2018

४ जानेवारी,२०१८


🚩 *ज्ञानभाषामराठीपंधरवडा*🚩

*#वाचनीय*

न समजलेले नागरिकशास्त्र

January 7, 2016
जगदीश अनंत पटवर्धन

लहानपणी प्रत्येक मुलाचे काही ना काही स्वप्न असते. कोणाला डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. वकील, आर्किटेक तर कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असत. स्वप्न नक्कीच चांगलीच आहेत पण तरीही कोणाला देशाचा चांगला नागरिक, चांगले आई-बाबा, पालक व्हावेसे वाटतेच ना? प्रत्येकाने स्वत:च्या आंतरमनात शिरून विचार करावा की मग असे लक्षात येईल की या सगळ्या स्वप्नांतून मी नक्की काय प्राप्त केले? मला जे हवे होते ते मिळाले का? मी जे शिक्षण किंवा डिग्री घेतली याने मी चांगला आदर्श मुलगा/मुलगी, पालक, आई-बाबा नक्की झालो असेन पण देशाचा चांगला नागरिक झालो का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सतत रुंजी घालत असतो. आणि मग समाजात भ्रष्टाचार, खून, मारामाऱ्या, लबाडी, व्यसनासाठी खोट बोलणारी मूल/मुली बघितली, कोवळ्या जीवांची हे जग बघण्या अगोदर भ्रूणहत्या करणारे नराधम बघितले की वाटते शिक्षण घेऊन सुद्धा माणूस सुधारत नसेल तर त्या शिक्षणाला, संस्कारांना काय अर्थ आहे. मोठमोठया डिग्र्या काय कामाच्या? हे सगळे वैभव काय कामाचे? जगातील शाश्त्रज्ञांनी एवढे कष्ट घेऊन शोध लावले पण काही माणसे त्याचा उपयोग मानवाच्या हितासाठी न करता विध्वसंक कामासाठी करतात ! संतांच्या शिकवणी/बोल तोकडे पडतात का? माणसाला आपल्याच माणसांशी सत्याने, प्रेमाने, नीती धर्माने व माणुसकीने वागता येत नसेल तर या सगळ्याचा काय उपयोग? त्याला माणूस म्हणून तरी जगायचा अधिकार आहे का? अर्थात ही गोष्ट किंवा नियम किंवा स्वभाव सर्वांना सारखा लागू होईल असे नाही तरीही, पण आणि परंतू राहतातच…..असो.

सध्याच्या शालेय आणि कॉलेजीय स्तरावरील अभ्यासक्रमात भाषा, गणित, भौतिक, रसायन, अर्थशास्त्र, अकौंटन्सी, तंत्रशिक्षणासारख्या विषयांच्या आकर्षणात शाळा, विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांकडून इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र ह्या विषयांना कमी महत्व दिले जाते असे वाटते. कारण ४०-५० दशकापूर्वी इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र असा एक १०० मार्कांचा पेपर असे किंवा इतिहास, भूगोल आणि ना.शास्त्र असे १०० मार्कांचे वेगवेगळे स्पे.विषय निवडण्यास मिळत असत. आत्ता ही असतील? एखाद्या गावातून शहरात येणाऱ्या मुलाची जी अवस्था होते तशी सध्या नागरिकशास्त्राची, इतिहास-भूगोलामध्ये सँडविच झाल्यासारखी वाटते. प्रश्नपत्रिकेतही या विषयावर एखादाच प्रश्न व तोही क्लिष्ट व्याख्या व मुद्दे पाठ करून लिहावा लागत असल्याने मुले शक्यतो हा विषय ऑप्शनला टाकतात. साहजिकच सध्याच्या युगात आवश्यक असणाऱ्या वरील विषयांत म्हणजे “इभूना” हे विषय सोडून इतर विषयात प्राविण्यासह प्रगती करूनसुद्धा दैनदिन जीवनात आणि नोकरी धंद्यात त्यांचा किती उपयोग होतो हा प्रश्न सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांसमोर आहेच. मग काहीजण देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचे शिक्षण न घेताच शालेय आणि कॉलेजीय शिक्षण पूर्ण करतात असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.

देशाची राज्यघटना, लोकशाहीचा राज्य घटनेला अभिप्रेत असलेला अर्थ, देशातील नागरिकांची कर्तव्ये याबाबतीत काही नागरिक उदासीन आहेत असे वाटते आणि त्यांच्या रोजच्या कृतीतून हे दिसून येते याला नागरिकशास्त्रासारख्या महत्वाच्या विषयाकडॆ केलेले अक्षम्य दुर्लक्षच कारणीभूत आहे असे आपल्याला वाटत नाही का? काहीजण नागरिकशास्त्राचा चांगला अभ्यास करतात परंतू त्यांच्या वागण्या बोलण्यातून किंवा कृतीतून ते दिसून येत नाही. परिसर आणि पर्यावरणाचे रक्षण कसे करावे ह्याचे शिक्षण नागरिकशास्त्र विषयातून अगदी शालेयस्तरावर दिले जाते परंतू मोठेपणी त्याचा विसर पडून “गिरवावे धडे नागरिकशास्त्राचे, ऐकावे मनाचे” असे होऊन जाते. याला कारण अमर्याद वागणे, स्वैराचार आणि इच्छाशक्तीचा अभाव.

आपल्या देशात शासन आणि व्यक्तिगत पातळीवर नागरिकशास्त्र या विषयाला महत्व दिले जाते ते फक्त प्रशासकीय (आय.ए.एस. आणि आय.पी.एस) अश्या उच्च पदासाठी असणार्‍या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करितांना. परंतू ज्यांना प्रशासकीय सेवेत नोकरी करून आपले भविष्य घडवायचे असते किंवा देशातील नागरिकांची सेवा करायची असते अश्या परीक्षेस बसणाऱ्यांची संख्या फारच कमी असते. नागरिकशास्त्र ह्या विषयाचे ज्ञान सर्व जनतेसाठी असावयास हवे व ते लहानपणीच, संस्कारक्षम वयात म्हणजे शालेय आणि कॉलेजीय स्तरावर दिले गेले पाहिजे. त्याची जाण प्रत्येकाने ठेवावी एवढीच अल्प अपेक्षा शासन आणि शिक्षण संस्थानची आहे. एकंदरीतच केंद्र आणि राज्य स्थरावर सध्याच्या काळात जी काही राजकीय व सामाजिक उलथापालथ होत आहे त्यावरून असे वाटते की राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठीदेखील नागरिकशास्त्राची पदवी परिक्षा अनिवार्य ठेवली तर राजकारण व सहकार यात निश्चित सुधारणा होईल.

वरील उल्लेखलेले सर्व विषय व्यक्तीमत्व विकास व व्यवसायांसाठी आवश्यक असल्याने त्यांचे महत्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजते. मात्र नागरिकशास्त्रासारखा विषयाने देशाच्या जडणघडणीत आणि व्यक्तिगत उन्नतीत बरेच महत्व आहे. परंतू समाजाच्या व देशाच्या एकंदरीतच मर्यादशील शिस्तीच्या दृष्टीने याला अनन्यसाधारण महत्व आहे. हा विषय सर्व पक्षांचे पदाधिकारी, संसंद सदस्य, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि गावखेड्यातील गोरगरिबांना विविध माध्यमांच्या साह्याने जसे इलेट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया, स्पर्धा, पथनाट्य स्वरुपात आणि मातृभाषेत समजावून सांगितला तर नक्की स्वभावात आणि वागणुकीत फरक पडेल. तसेच कार्यशाळेतून त्याचे येणाऱ्या काळात काय महत्व आहे ते सांगून आणि त्याला कृतीशील उपक्रमांची जोड देऊन लोकशाही, समाजवाद व राष्ट्रीयत्व यांचे महत्व मनावर बिंबवले तर नागरिकांकडून भ्रष्टाचार, विध्वंसक कृत्ये घडणार नाहीत. जातीय, धार्मिक वा प्रांतीय भेदांच्याऐवजी राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्या मनात जागृत होईल व शांतता, विकास व सहजीवन या दिशेने भविष्यात आपल्या देशाची वाटचाल अधिक चांगल्या दिशेने होईल असे वाटते !

जगदीश पटवर्धन, दादर

संदर्भ~marathisrushti.com

संकलन - वृषाली गोखले

गट -रायगड
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा 🚩

विज्ञानकथा

नको! सहन नाही होणार त्यांना!

घरात अगदी गडबड चालली होती. अरुण आणि वरुणची बॅग आवरण्यात आईची धांदल उडाली होती. खरे तर एवढय़ा छोटय़ा मुलांना सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात पाठवायला ती राजी नव्हती. आणि तेही एकदम आठवडाभर! दुसरीत तर आहेत दोघे! कसे राहतील एकटे? पण त्यांच्या वर्गशिक्षिकेनं तिला समजावलं होतं. ‘‘व्यवस्थित राहतात मुलं अगदी. शिवाय जिथे जाणार आहेत तिथले पालकही सांभाळून घेतात त्यांना. आता जूनमध्ये तिकडची दोन मुलं तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्हीही त्यांची काळजी घ्यालच ना? तसंच! काही चिंता करू नका. अरुण आणि वरुण एकदम व्यवस्थित राहतील. छान मजाही करतील. आणि खूप काही शिकूनसुद्धा येतील.’’ शेवटी मनाची तयारी करून तिने होकार दिला होता.

घरातून बाहेर पडताना दोघांनी आजोबांना कडकडून मिठी मारली. त्यांना आजोबांचा अतिशय लळा होता. हे आजोबा म्हणजे खरे तर त्यांचे सख्खे आजोबा नव्हते. त्यांचे दोन्ही- कडचे आजी-आजोबा ते जन्माला यायच्या आधीच वारले होते. अरुण-वरुण एकच वर्षांचे असताना बाबांच्या जुन्या मित्राची आई वारली. मित्र परदेशी होता. तिथल्या हवेशी आणि परदेशी सुनेशीही त्याच्या बाबांचे जमले नाही. ते परत आले आणि एकटेच राहिले. तेव्हा बाबांनीच त्यांना त्यांच्याकडे बोलावून घेतले. आपल्या मुलांना आजोबा नाहीत याचे दु:ख त्यांना तसेही होतेच. आत्ता त्या दोघांनी आजोबांना मारलेली घट्ट मिठी बघून त्यांना भरून आले. बरे झाले आजोबांना घरी घेऊन आलो.. असे परत एकदा वाटून गेले. पटकन् त्यांनी क्लिक् करून ती गोड मिठी फोनमध्ये जपून ठेवली.

वर्ष भराभर उलटत गेली होती. बघता बघता अरुण आणि वरुण नववीत पोचले होते. ते आज त्यांच्या मित्राकडे अभ्यासाला गेले होते आणि तिकडेच राहणार होते. झोपताना बाबा अस्वस्थ होते. सगळं आटपून झाल्यावर आईने विचारलं, ‘‘आज कसल्या तरी चिंतेत दिसताय?’’
‘‘हं..’’ बाबा म्हणाले, ‘‘आजोबांची काळजी घेणं हळूहळू अवघड होत चाललंय ग.’’
‘‘का बरं, काय झालं?’’
‘‘आता तेरा र्वष झाली ग त्यांना. त्यांचे पार्ट्स मिळणं खूप अवघड होत चाललंय. मला भयंकर ताण येतो त्यांना तपासणीला घेऊन जाताना. मागच्या वेळी एक-दोन पार्ट्स मिळतच नव्हते. मग कितीतरी प्रयत्न करून कुणाकडून तरी वापरलेले पार्ट्स मिळवावे लागले. प्रत्येक वेळी ते मिळतीलच असं नाही.’’
‘‘पण कितीतरी दुकानं, कंपन्या आता यंत्रमानव वापरतात की! त्यांना अशी अडचण येत नाही? ’’
‘‘अगं, सगळेजण चार-पाच र्वषच वापरतात. आजकाल तर चार वर्षांतच पूर्ण डेप्रिसिएशन दाखवतात. आणि बहुतेक सर्वजण स्टील फिनिश वापरतात ना! स्किन फिनिश कुणीही वापरत नाही. एजिंग स्किन तर त्याहून कमी वापरली जाते. आता या मॉडेलशी कॉम्पॅटिबल पार्ट्स मिळणं खूप अवघड झालंय. त्यातून आपलं मॉडेल मेड-टू-ऑर्डर आहे. इतरांना काय, बंद पडलं तर उघड उघड दुरुस्तीला नेता येतं. आपल्याला तीही सोय नाही. अचानक काहीतरी बंद पडलं तर मुलांना कळेल ना!’’
आईपण विचारात पडली. ‘‘मग आपण मुलांना सांगूनच टाकूयात ना- म्हणजे मग सारखं टेन्शन नाही.’’
‘‘नको! सहन नाही होणार त्यांना! लहानपणापासून ‘आजोबा.. आजोबा’ करत त्यांच्यामागे असतात.’’
‘‘पण आता कमी झालंय जरा त्यांचंसुद्धा. मोठे झाले आहेत ते आता. घेतील दोघं समजून.’’
‘‘नाही.. नाही. भयंकर मोठा धक्का बसेल त्यांना. अगं, एक वर्षांचे असल्यापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेत ते. आठवतं तुला- लहानपणी किती वेळा घोडा घोडा खेळायचे. गोष्टी ऐकायचे. लपाछपी खेळायचे. मग आजोबांबरोबर कॉम्प्युटर गेम्स खेळायचे. फिरायला जायचे. मग चक्क त्यांच्याबरोबर अभ्याससुद्धा करायचे. आता जरी ते आजोबांबरोबर खेळत नसले तरी खूप लळा आहे दोघांना आजोबांचा.’’
‘‘आणि काळजीही.’’ आई म्हणाली- ‘‘जेवताना आठवणीनं त्यांना बोलावतात. सकाळी त्यांच्या हातात पेपर आणून देतात. नवीन माहिती कळली की त्यांना सांगतात. बरोबर आहे.. कळता कामा नये त्यांना.’’
‘‘होय. मी ऑफिसमध्ये एकाशी बोलतो आणि काही सुचतं का बघतो.’’

जेमतेम आठवडा झाला असेल, शाळेत अरुण-वरुणला सरांनी वर्गाबाहेर बोलावून घेतलं. त्यांना थोडे पैसे देऊन लगेच आधार हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. आई-बाबांचा फोन आला होता. आजोबांना काहीतरी झालं होतं. आधार हॉस्पिटल डॉ. गुप्तांचं.. त्यांच्या फॅमिली डॉक्टरचं छोटं हॉस्पिटल होतं. बाबांना मोठी हॉस्पिटल्स आवडत नसत. नुसते पैसे उकळायला बसलेले असतात सगळे.. असं त्यांचं मत होतं. त्यामुळे ते शक्यतोवर डॉ. गुप्तांकडेच जात. दुर्दैवाने अरुण-वरुण तिथे पोहोचेपर्यंत आजोबा गेलेले होते. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता.
आजोबांना जाऊन आज एक वर्ष झालं होतं. त्यामुळे घरात जरा नरम वातावरण होतं. बाबा खोलीत वाचत बसले होते. अरुण आणि वरुणसुद्धा त्यांच्या खोलीत होते. मुलांशी जरा बोलावं म्हणून आई त्यांच्या खोलीजवळ गेली तर तिला ऐकू आलं..
‘‘आजोबांना ऑफ करून आज वर्ष झालं रे.’’
न राहवून आई लगेच खोलीत गेली. मुले एकदम गप्प झाली. ‘‘काय म्हणालास आत्ता वरुण?’’ तिनं विचारलं. दोघंही काही बोलेनात. शेवटी काही इलाज नाही म्हटल्यावर हळूहळू ते जराशानं बोलायला लागले.

‘‘आई, आम्हाला माहितीय, की आजोबांना हृदयविकाराचा झटका नव्हता आला.. त्यांना ऑफ केलं होतं. ते यंत्रमानव होते.’’
आता गप्प बसण्याची पाळी आईची होती. शेवटी धीर धरून तिनं विचारलं- ‘‘कसं कळलं तुम्हाला? आणि केव्हा?’’
‘‘आई, आठवतंय- आम्ही दुसरीत सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात आठवडाभर गेलो होतो ते? तिथं आम्हाला पहिल्यांदा जाणवलं, की आपले आजोबा वेगळे आहेत. त्यांच्या वागण्यातले काही फरक आम्हाला तिथे कळले.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे तिथले जे आजोबा होते ना, ते थोडे वेगळे वागायचे. म्हणजे आम्ही मुलं त्यांच्याबरोबर खेळायला गेलो तर ते नेहमी खेळायचेच असं नाही. कधी कधी ‘आत्ता मला झोपायचं आहे,’ असं म्हणायचे. आम्ही मुलं खेळताना ओरडलो की त्यांना त्रास व्हायचा. ते कधी कधी त्यांच्या गोळ्या घ्यायला विसरायचे. आपल्या आजोबांचं असं कधीच व्हायचं नाही. पहिल्यांदा आम्हाला वाटलं, की ते आजोबा जरा वेगळे आहेत. पण तिथे आम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तिथल्या आजीसुद्धा तिथल्या आजोबांना गोळ्या घेण्याची आठवण करत होत्या. आपल्याकडे असं कधीच बघितलं नव्हतं. आणि तुमच्या वागण्यातला फरकसुद्धा आम्हाला जाणवे.’’
‘‘आमच्या वागण्यातला फरक?’’
‘‘हो. तिथे आजोबांनी टीव्ही लावला असेल तर तिथले आई-बाबा आम्हाला लांब जाऊन खेळायला सांगायचे. आम्ही तेव्हाच कार्टून लावायचा प्रयत्न केला तर रागवायचे. आजोबा झोपले असतील तर गप्प बसायला सांगायचे. आपल्याकडे असं व्हायचं नाही.’’
‘‘हो, आणि आपले आजोबा पूर्वीच्या आठवणी सांगायचे. पण त्या सांगताना तिथल्या आजोबांना खूप छान वाटायचं तसं आपल्या आजोबांना नाही वाटायचं. आणि आपल्या आजोबांना कधी कुठली गोष्ट अर्धवट आठवायची नाही. त्यांना एकतर एखादी जुनी आठवण माहीत असायची किंवा नसायची. तिथल्या आजोबांना काहीतरी धूसर आठवायचं. मग त्याविषयी बोलायला लागले की कधी थोडं जास्त आठवत जायचं.’’
‘‘आणि आई, आम्ही त्या आजोबांच्या खोलीत दोन रात्री झोपलो. दोन्ही रात्री ते उठून बाथरूमला जाऊन आले. आपल्या आजोबांबरोबर आम्ही किती वेळा झोपलोय. पण ते एकदाही गेले नाहीत असे.’’
‘‘शिवाय बाबा ‘अपोलो रोबोटिक्स’मध्ये! तरी खात्री नव्हती. मग आम्ही बाकी आजोबांचं जरा जास्त निरीक्षण केलं आणि आम्हाला नक्की कळलं. बाबांनी आणि अपोलोनी आजोबांना खूप खऱ्यासारखं बनवलं. पण त्यांच्यात पुरेसे बारीकसारीक दोष घातले नाहीत. त्यामुळेच आम्हाला कळलं.’’

पाच मिनिटं आई काही बोलली नाही. मुलं किती हुशार आणि शहाणी आहेत याचा तिला अभिमान वाटला. विचार करून मग ती म्हणाली, ‘‘चला, आपण बाबांना सांगू या.’’
‘‘नको! सहन नाही होणार त्यांना!’’ दोघेही एकदमच म्हणाले.

पराग देऊसकर
deuskars@gmail.com

संदर्भ : दै. लोकसत्ता ८ नोव्हेंबर २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

दि.४/१/२०१८

  🧐 मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- ' जिन्नस' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत स्थिरावला ?

अ) ईराणी
ब)फारसी
क)अरबी
ड)उर्दू

उत्तर-१-ब-फारसी

प्रश्न २-इरसाल,सैतान,फलाणा,इमारत,
अखबार यांसारखे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत स्थिरावले?

अ)अरबी
ब)यूनानी
क)इजिप्शियन
ड)अफगाणी

उत्तर-२-अ-अरबी

    यादवांच्या काळापासूनच इस्लाम धर्मियांचा संबंध महाराष्ट्राशी विशेष प्रकारचा आला.बहामनी काळात व नंतर पाच शाहींच्या अमदानीत फारसी-अरबी भाषांचा प्रभाव तीव्रतेने मराठीवर पडत गेला.अगदी सरकारदरबारी पत्रव्यवहारापासून ते दैनंदिन संभाषणापर्यंत मराठीवर फारसी-अरबीने वर्चस्व गाजवले.

प्रश्न ३- महानुभाव साहित्यामध्ये आढळणारा ' आरोगणे' हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?

अ)मल्याळम
ब)तुळू
क)कन्नड
ड)तमीळ

उत्तर-३-क-कन्नड

    प्राचीन काळात महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र इत्यादी प्रदेशांवर सारख्याच राजवटी असल्याने देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणावर होत होती.भक्तीमार्गियांचे मुख्य दैवत विठोबा हे कर्नाटकी वा कानडी असल्याने शब्दांची देवाणघेवाण फार स्वाभाविक होती.जसे ज्ञानदेवांच्या काळातील मराठीत कन्नड,तेलुगु इत्यादी भाषांतील काही शब्द आढळतात त्याचप्रमाणे यातीलच काही शब्द महानुभावी साहित्यातही समाविष्ट झालेत.त्यातूनच पुढे स्थिर झालेला शब्द म्हणजे 'आरोगणे'.

प्रतिसादाबद्दल समूहातील सर्वांचे आभार आणि अचूक उत्तर देणाऱ्यांचे अभिनंदन!!

डाॅ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषाभाषापंधरवडा

No comments:

Post a Comment