Monday, January 1, 2018

१जानेवारी,२०१८

आकर्षक हिरवीगार सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा

पाणथळ जागा व्यवस्थापनाचा अनोखा आदर्श

समीर केळकर

कंपनीच्या आवारात वृक्षवल्ली वाढवून तेथे छोट्या जागेत शेतीही शक्य आहे हे दाखवणारा शहरातील पहिला नैसर्गिक सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प समीर केळकर या तरुण उद्योजकाने तयार करुन दाखवला आहे. शुन्यवीज बीलात पाणी शुध्द होईलच त्यावर भली मोठी हिरवीगार बाग कंपनीच्या दर्शनी भागात तयार होईल. असा प्रयोग करणारी ग्राईन्ड मास्टर ही शहरातील पहिली कंपनी ठरली आहे. हा प्रयोग त्यांनी स्वत:पुरता मर्यादीत न ठेवता इकोसत्व एन्व्हायरमेन्ट सोल्युशन नावाची कंपनी स्थापन करुन. समाजासाठी उपलब्ध करुन दिला आहे.
अभियांत्रिकी कंपनीचा भला मोठा व्याप सांभाळून त्यांनी निसर्गरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले ते खरोखरीच कौतुकास्पद आहे.

औरंगाबाद शहरात एमआयडीसी रेल्वे स्टेशन भागात तीस वर्षे जुनी ग्राईन्ड मास्टर ही कंपनी आहे. कंपनीचे भव्य तीन प्रकल्प येथे आहेत. सुमारे अडीचशे कर्मचारी येथे काम करतात. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन हे एक आव्हनच होते. प्रत्येक कंपनीत हा प्रकल्प असतोच पण तो युरोपीयन पध्दतीचा. एक मोठी टाकी कंपनीच्या अगदी मागच्या बाजूला दिसणार नाही अशा कोपर्‍यात असते मोठ्या हौदात एका ढवळणीने चोवीसतास सांडपाणी ढवळले जाते त्याचे वीज बील वर्षाकाठी किमान साठ ते सत्तर हजार येते. यावर काही दुसरा उपाय शोधता येईल काय? याचा विचार ग्राईंड मास्टर या कंपनीचे तरुण सीईओ समीर केळकर करीत होते. त्यांना ते पुण्यात सापडले. आश्विन परांजपे हे वेटलॅन्ड मॅनेजमेन्ट द्वारे नैसर्गिक पध्दतीने सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प करुन देतात हे कळल्यावर समीर यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. आणि दिड वर्षातच औरंगाबादच्या कारखान्यातही प्रकल्प यशस्वी चालतो हे सर्व उद्योग जगताला दाखवून दिले. वीज बील तर नाहीच शिवाय या पाण्यावर तुम्ही कंपनीला एक सुंदर हिरवेगार गार्डन गिफ्ट करता येते ते त्यांनी दाखवून दिले.

औरंगाबादच्या उद्योग वसाहतीतील कंपन्यामध्ये परंपरागत पध्दतीचे सांडपाणी प्रकल्प आहेत. ते सर्वच युरोप व अमेरिकेच्या वातावरणा प्रमाणे तयार झालेले आहेत. त्याला मोठी वीज लागते. किमान दोन एच.पी.ची मोटर चोवीस तास काम करीत असते त्यामुळे वर्षाला किमान पन्नास ते साठ हजार हजार रुपये या प्रकल्पाच्या वीज बीलाचा खर्च येतो. बाकी मेन्टेनन्सचा खर्च वेगळा. ग्राईन्ड मास्टर कंपनीने नैसर्गिक पध्दतीने चालणारा सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प तयार करुन दाखवलाय. तोही कमी खर्चात. शुन्य वीज बीलात. पाणी तर शुध्द होतेच शिवाय त्या पाण्यामुळे झाडेही जोमाने वाढून वर्षभर बगीचा हिरवागार रहातो.

काय आहे संकल्पना

ग्राईन्ड मास्टर कंपनीचे सीईओ समीर केळकर यांनी सांगितले की, या प्रकाराला वेट लॅन्ड मॅनेजमेन्ट (पाणथळ जागा व्यवस्थापन) असे प्रचलित नाव आहे. भारतात वर्षभर भरपूर सुर्यप्रकाश असल्याने ही पध्दत सुयोग्य आहे असे जाणवल्याने तो आम्ही नुसताच राबवला नाही तर यशस्वीपणे इतरांना करुनही दाखवला. सांडपाणी कंपनीतील सर्व सांडपाणी एका टाकीत गोळा केले जाते, त्याखाली मोठा सिमेंटचा चौकोनी हौद बांधून त्याचे चार भाग केले जातात. पहिल्या भागात दगडी खडी त्यावर झाडपाल्याचा कचरा टाकला जातो (शेडनेट) तेथून पाणी गाळून पुढच्या टाकीत जाते तेथे केळी, पुदीना, मका अशी झाडे लावून (चक्क शेती करु शकता) झाडांच्या त्यांच्या मुळ्या पाणी शुद्ध करतात. अशुध्द घटक शोषुन पाणी शुध्द करतात. त्यापुढच्या टाकीत कर्दळीची झाडे लावली जातात त्या झाडांच्या मुळ्या हे पाणी अधिक शुध्द करतात. हे पाणी ७.५ पी.एच. होते ते झाडांना घालण्यास योग्य होते. पुढे या पाण्यावर अधिक प्रक्रीया केली तर ते पिण्यायोग्य होते. पण झाडांना घालण्यालायक ते पाणी शुध्द झालं तरी समाजात मोठी क्रांती होऊ शकते हेच हा प्रयोग सांगतो.

दररोज होते ५ हजार लिटर पाण्याचे होते शुध्दीकरण ...

ग्राईंन्ड मास्टर कंपनीत या प्रकल्पाला एक दिड वर्ष झाले. जो खर्च लागला तो एकदाचाच (सुमारे सहा लाख रुपये) खर्च कमी किंवा जास्त हे प्रकल्पाच्या आकारावर अवलंबून आहे. वीज नाही बाकी मेन्टेनन्स नाही, दररोज पाच हजार लिटर शुध्द पाणी तयार होते, त्यावर कंपनीची बाग हिरवीगार झाली आहे. या प्रकल्पावर खेडेगावात शेती करता येईल इतका तो सहज अन सोपा आहे. खेडेगावात सांडपाणी व्यवस्थापन होत नाही त्यामुळे जागोजागी घाणपाण्याची डबकी दिसतात तेथे हा प्रकल्प वरदान ठरु शकतो असा दावा समीर यांचा आहे.

इकोसत्वची स्थापना…

समीर केळकर यांनी ही सांगितले की ही नैसर्गिक संकल्पना पुणे येथील आश्वीन परांजपे यांनी तयार करुन दिली. पण त्यांनी याला कमर्शियल स्वरुप दिले नव्हते. वर्षाला ते अवघे चार प्रकल्प तयार करुन देत होते. त्यांना मी औरंगाबादच्या अनेक कंपन्यात हा प्रकल्प सुरु करता येईल असे सांगितले कारण हा प्रकल्प कमालीचा प्रभावी आहे. कंपनीच्या अगदी दर्शनी भागातही तो करता येतो, हे मला कळल्याने मी परांजपे यांचा पिच्छा पुरवला. शेवटी आम्ही एक नवी कंपनीच स्थापन केली. खूप विचार करुन ‘इकोसत्व एन्व्हायरमेन्टल सोल्युशन’ असे कंपनीला नाव दिले आहे. नयात आश्वीन परांजपे, गौरी मिराशी,  नताशा झरीन या संचालक आहेत.

हिरव्यागार बागेत शोधावा लागतो प्रकल्प....

आम्ही इकोसत्व चा नैसर्गिक सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प पहावयास गेलो तेव्हा ग्राइंड मास्टर ही इंजिनिअरिंग कंपनी हिरव्यागार वृक्षांनी नटलेली दिसली. दुरवर एक चौकोनी विहीर दिसली. तीच्यावर एक जाळी होती त्यातून कर्दळी, पुदीना, मका अशी झाडे दिसली. कुठे आहे तुमचा प्रकल्प म्हटल्यावर समीर केळकर यांनी तो दाखवला अन आश्चर्याचा धक्काच बसला. शेतातील दांडाच्या पाण्यावर जशी हिरवाई असते तशीच येथे दिसली. हौदावर घनदाट झाडी आणि त्याखाली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लपलेला होता. त्याची प्रक्रीया समजून सांगितल्यावर ही शेती नसून तो सांडपाणी प्रकल्प आहे, असे आम्हाला कळले. एका तरुण उद्योजकाने जुने नैसर्गिक तत्वज्ञान नुसतेच राबवले नाही तर त्याचा फायदा इतरांना व्हावा म्हणून तो प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कंपनीच्या रुपात पुढे आणला आहे.

या विषयी जिज्ञासुंना माहिती हवी असल्यास आश्विन परांजपे- ८३८०००३१५४ , गौरी मिराशी - ९५०३२४९४९४ आणि नताशा झरीन- ९०४९४९२२०० या मोबाईल वर संपर्क साधू शकता.

श्री. समीर केळकर,संचालक ग्राइंड मास्टर

http://hindi.indiawaterportal.org/node/57012

(मूळ लेख: जल संवाद, मे २०१७)

संकलन:-निवेदिता खांडेकर

समूह:-ज्ञानभाषा मराठी मुख्य समूह प्रशासक,ज्ञानभाषा मराठी विदर्भ विभाग

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञानकथा

आरसा

लोखंडवालाच्या बरिस्तात बसून अलका वाट बघत होती. साडेचार वाजून गेले होते. इथे नेहमीची गजबज होतीच. कोणी सीरियलच्या कास्टिंगवर बोलत होतं, तर कोणी अ‍ॅड फिल्मच्या स्क्रिप्टवर. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे विद्याला सोयीचं पडणार होतं. ती बिचारी ओपीडी आटोपून संध्याकाळच्या क्लिनिकला जायच्या आधी येणार होती. क्लिनिक इथेच. राहते पण इथेच.. लोखंडवालाला. म्हणूनच एक तास काढून साडेचारला येणार होती.
पंधरा मिनिटं होऊन गेली. म्हणजे आपल्याला पाऊण तासच मिळणार तिच्याबरोबर.. आणि सांगायचं इतकं काही आहे.. अलकाच्या डोक्यात विचार चालू होते.
भर्रकन् वळण घेऊन एक लाल गाडी समोर लागली तसा अलकाने नि:श्वास टाकला. आली!

‘‘ऑर्डर केलंयस का काही?’’ हातातले सनग्लासेस टेबलवर टाकत विद्याने झपझप बोलायला सुरुवात केली.
‘‘कर कसलीही कॉफी आणि बोलू या लगेच..’’ संभाषणाची सूत्रं हातात घेत अलका म्हणाली.
‘‘ओके. बोल. सायलीबद्दल ना?’’ सवयीने
विद्याने आपले लांब केस एका बाजूने खांद्यावर पुढे आणले आणि तिने मोबाइलवर मेसेजेस चेक करायला सुरुवात केली.

‘‘अगं, असं इथे बसून बोलताना खूप अवघड वाटतंय. थोडक्यात सांगते. तिचं वागणं बदलायला लागलं आहे. खूप बेफिकिरीने वागते. मुख्य म्हणजे तिला पैशांची अजिबात तमा नाही.’’

‘‘ती आता चौदा वर्षांची आहे. बरोबर? हॉर्मोन्स- आणखी काय! डोन्ट वरी!’’
‘‘डोन्ट वरी काय? मी इथे एकटी कमावतेय. मलाही कितीतरी आघाडय़ांवर लढायचं असतं.’’ अलकाने समोर आलेल्या कॉफीत साखर पेरत आपल्या मोबाइलवर एक नजर टाकून घेतली.

‘‘ठीक आहे. काही बॉयफ्रेंड ट्रबल नाही ना?’’
‘‘अजून तरी नाही वाटत. आणि टीनएज वगैरे सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आईचं ऐकायचं नाही, बंडखोरी करत बसायचं- वगैरेच्या पलीकडचं सांग काही..’’
‘‘ठीक आहे. पैसे खूप उडवते का? तेवढाच प्रॉब्लेम आहे का?’’
‘‘नाही गं. मागच्या महिन्यातली गोष्ट. ऑनलाइन होती. हाका मारून मला बोलावून घेतलं. जाऊन बघते तर तिला एक ड्रेस घ्यायचा होता आणि मला क्रेडिट कार्ड वापरून पे करायला सांगत होती. मी रागावले. विचारलं- तुला तुझं डेबिट कार्ड दिलेलं आहे ना? मी महिन्याला तुझ्या अकाऊंटमध्ये आठ हजार भरते ते? तर म्हणते की, मी मागच्या महिन्यात एका साइटवर वापरलं, ते हॅक झालं. मी एकदम पेटून उठले. हॅक झालं? आणि ते मला कधी सांगणार? कार्ड ब्लॉक नको करायला? तर म्हणाली की, विसरलेच. ते जाऊ दे. पण हा ड्रेस घे नं- पे करशील ना?’’
‘‘ओह!’’
‘‘आणि कितीतरी किस्से सांगू शकेन.’’ अलका हताश होऊन म्हणाली.

‘‘ती निष्काळजी आहे की खरोखरच विसरते? तिच्या बाजूने पण विचार करायला हवा.’’
‘‘तेवढंच नाही गं, त्या दिवशी मैत्रिणीकडे जाते म्हणून निघाली. मी वर बाल्कनीतून पाहत होते. खाली उतरली ती गेटपाशीच थांबली. भांबावून. पुतळ्यासारखी. शेवटी मी खाली गेले आणि हलवून विचारलं तेव्हा झोपेतून जागी झाल्यासारखी बघायला लागली. मी घाबरले खूप अगं.’’
‘‘एकेकदा ब्लँक होते. काही दिवशी खूप खाते, तर काही वेळा जेवण स्किप करते. कधी कधी तब्येत एकदम बिनसते. दुलईत तोंड खुपसून पडून असते दिवसभर घरी. मी दमून आले तर या बाई म्हणतात, शाळेत गेलेच नाही म्हणून! दहावी आली आता. करू तरी काय मी?’’
विद्या सावधपणे म्हणाली, ‘‘असं करू या का- एकदा तिला माझ्या क्लिनिकवर आण.’’
‘‘ऐकत नाही गं ती. खूप भडकते एकदम कधी कधी. मी अशी कधीच नव्हते.’’ आणि अचानक अलका चपापली. मग विद्याची नजर टाळत ती उगीचच हातातल्या मोबाइलशी खेळ करायला लागली.

‘‘काही चेकअप्सना ती तयार होणार नाही. हो ना? काहीतरी युक्ती करायला हवी.’’ विद्या काळजीने म्हणाली, ‘‘आणि सॉरी. हा विषय काढतेय, पण प्रभातशीसुद्धा बोलायला हवं.’’
‘‘का?’’
‘‘अगं, तुम्ही नसाल राहत एकत्र; पण ती त्याची पण मुलगी आहे ना? का गं? एकदम काय झालं?’’

आपले पाणावलेले डोळे पुसत अलकाने फक्त मान हलवली.
‘‘ओके.. ओके.’’ आजूबाजूला पाहत विद्याने सावरून घेतलं. ‘‘लेट्स टॉक डिटेल्स लेटर. मात्र एक- तिला सांभाळून घे. ओरडू नकोस. आपल्याला तिचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कम्पाऊंड करायचा नाही.’’
बाजूला काही कॉलेजकन्यका येऊन थडकल्या. त्यांचा चिवचिवाट सुरू झाला तशी अलकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेदना उमटली.
‘‘कॉफी झालीय पिऊन. गाडीत बसून बोलूयात?’’ तिने अर्धवट उठत विचारलं. विद्यालाही हायसं वाटलं. आपले सनग्लासेस उचलत ती निघाली. दोघी कारमध्ये बसल्या तशी अलकाने अवघडत सुरुवात केली..
‘‘विद्या, एक मला सांगायला हवं. सायली प्रभातची मुलगी नाही.’’
‘‘म्हणजे?’’ विद्याला धक्का सहन झाला नाही. ‘‘व्हॉट डू यू मीन?’’
‘‘ती माझी एकटीचीच मुलगी आहे.’’
‘‘हाऊ इज दॅट पॉसिबल?’’ विद्या जवळजवळ ओरडलीच. ती दोघांना कित्येक र्वष ओळखत होती.
‘‘ती- आय मिन मी ती वंदनाच्या मदतीने.. क्लोन..’’
‘‘क्लोन? आर यू सीरियस? केवढी मोठी मिस्टेक केलीस! मला का नाही विचारलंस एकदाही?’’ विद्या आता खूपच चिडली..
‘‘तुला माहीत आहेत क्लोनिंगचे प्रॉब्लेम्स?’’
‘‘हो. म्हणजे नंतर वाचले मी.’’ चाचरत अलका उत्तरली.
‘‘एक तर क्लोनिंगचा सक्सेस रेट अगदी अल्प.. म्हणजे एक-शतांशापेक्षाही कमी असतो. तुझ्याबाबतीत झालं ते सक्सेसफुल. पण पुढचा विचार केलास का? मेंढय़ांवर प्रयोग झाले त्यात म्हणतात की मुख्य अवयवांची वाढ अपुरी तरी असते, नाहीतर अति झालेली असते. माणसात तर किती गुंतागुंत होईल! त्यात क्लोनच्या मेंदूवर, विचारांवर काय काय परिणाम होत असतील याचा अभ्यास कुठे झालाय? आणि तू कशी अशी?’’ संतापाने तिच्या तोंडून शब्ददेखील फुटेना.

‘‘विद्या, तेव्हा मला वंदनाने ग्वाही दिली होती की हे सेफ आहे म्हणून.’’
‘‘वंदना ढीग सांगेल, पण म्हणून तू कशी बधलीस? गेलीस तरी कशी या वाटेला?’’
‘‘काय सांगू?’’ डोळ्यातलं पाणी पुसत अलका म्हणाली, ‘‘प्रभातवरचं प्रेम कधी आटलं, कळलंच नाही. वाद विकोपाला जात होते. अवघ्या दोन वर्षांतच. काही समजतच नव्हतं. मन भरकटत होतं आणि त्या भरात ठरवलं, की मूल हवं, पण त्यात प्रभात नको. फक्त आपलं एकटीचं मूल.’’
‘‘मी एकटीने बॉटनीची वाट धरली होती. पण आपल्या ग्रुपमधल्या तुम्ही बऱ्याच जणी मेडिकलला गेला होतात. वंदना तेव्हा मला खूप जवळची. मीही तिच्याशी खूप मनापासून बोलायचे. माझी ही इच्छा सांगितली तेव्हा तिने हा क्लोनिंगचा मार्ग सुचवला. तिचे काही सहकारी हे प्रयोग करत होते. चुपचापच करायचं होतं सगळं. तेव्हा ते खूप एक्सायटिंग वाटलं होतं. एक प्रकारे प्रभातवर सूड उगवल्यासारखं.’’
‘‘काय करून बसलीस हे?’’ डोकं हातात गच्च दाबत विद्या म्हणाली.
‘‘तुला माहीत आहे पुढचं. सायली झाल्यावरही आमच्या संसाराचा विस्कटलेला सूर पूर्ववत झालाच नाही. आणि मग फक्त लेक्चररशिप सांभाळत एकटीने तिला मोठं करत धडपडत राहिले..’’
‘‘वंदना- तिच्याशी कधी बोललीस नंतर?’’
‘‘न.. नाही. ज्यांनी प्रयोग केले ते नंतर ऑस्ट्रेलियाला सेट्ल झाले तिघेही. आणि मी काही साइन नव्हतं केलं, की कुठेही रेकॉर्ड्सही नाहीत.’’
‘‘बिग मिस्टेक अलका. अगं, आरशात पाहावं असं नसतं पाहायचं मुलांमध्ये!’’
‘‘मान्य आहे.’’
‘‘उलट, आरसा समोर घेऊन आपले गुण-दोष सगळे नीट पाहिले असतेस तर तू हा निर्णय घेतलाच नसतास. आपलीच प्रतिमा तशीच्या तशी बनवण्यात काय अर्थ? पुढच्या पिढीत वेगळेपण नसेल, विविधता नसेल, तर हव्यात कशाला नव्या पिढय़ा? आणि आपल्याच आवृत्त्या परत परत काढत बसलो तर नवीन काय? आई-बापांमधले गुण-दोष मिक्स करून पुढे न्यायचे, हे निसर्गाचं काम. आपण त्यात ढवळाढवळ नाही करायची. तंतोतंत बापासारखा मुलगा, हुबेहूब आईसारखी मुलगी अशा एकसुरीपणाने टिकेल का मानवजात?’’
अलकाकडे तिच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.

प्रज्ञा सहस्रबुद्धे – pradnya2@gmail.com

संदर्भ : दै. लोकसत्ता २० डिसेंबर २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषामराठीपंधरवडा🚩

नवीन बूट घेताय?

बूटखरेदीची योग्य वेळ माहिती आहे का?

_बूट खरेदीची योग्य वेळ आहे दुपारी तीननंतर ._

कारण दिवसभर चालल्याने अथवा उष्ण हवामानामुळे आपले पाय प्रसरण पावलेले असतात आणि त्यांचा आकार ५-१०% ने वाढलेला असतो.

दुपारी तीननंतर जर आपण बूट विकत घेतले तर अधिक योग्य मापाचे बूट मिळण्यात तुम्हाला मदत होते.

पण तुम्ही दुपारपर्यंत झोपून राहत असाल तर मग याचा काहीच उपयोग नाही हां!😁

#ज्ञानकण - १
#मराठीभाषापंधरवडा
#ज्ञानभाषामराठीपंधरवडा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

🧐 मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- ' प्रावृष' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ज्याचे मराठीतील बदललेले रूप 'पाऊस' आहे.

*अ)* मागधी
*ब)* पाली
*क)* शौरसेनी
*ड)* महाराष्ट्री

उत्तर:-ब -पाली

मराठीत शेकडा सत्तर टक्के शब्द संग्रह संस्कृतनिष्ठ असले तरी मराठी भाषानिर्मीतीसाठी अनेक प्राकृत व अपभ्रंश भाषांची देखील मदत झालेली आहे.एखाद्या शब्दाचे मूळ रूप संस्कृत असले तरी कालांतराने त्यामधे होत जाणारे स्वनलोप,स्वनरूपांतर,वर्णबदल,प्रयोगातील वेगळेपणा,वचनबदल तर उच्चारबदल इत्यादींमुळे ते रूप परिवर्तन होत होत पुढील भाषेत ते बदललेले रूपच तो शब्दच बनून जातात.'प्रावृट्'चे एक वचन प्रावृष आहे पण पुढे वर्णबदल होता होता पालीमधे प्रावृष रूढ झाले व कालांतराने त्याचे पाऊस झाले व मराठीत ते रूढ झाले.  

प्रश्न २- 'तहान'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे जो मराठीतही सहज वापरल्या जातो?

*अ)* प्राकृत
*ब)* अर्धमागधी
*क)* पैशाची
*ड)* पाली

उत्तर:-क-पैशाची

मराठीने पैशाची भाषेतील एक विशेष उचललेला आहे.तो म्हणजे पैशाचीत 'ण'कार नाही,'ण'साठी नेहमी 'न'चा वापर झालेला आहे.मराठीने 'ण'चा 'न'करण्याची प्रवृत्ती पैशाचीकडून घेतलेली आहे.त्यामुळे संस्कृतात आपल्याला तृष्णा दिसते तर पैशाचीमधे त्याचे 'तहान'मधे परिवर्तन झाले आहे जे मराठीने जसेच्या तसे घेतले.

प्रश्न३- 'कुक्कुट' हा कोणत्या भाषाकूळातील शब्द आहे जो संस्कृतमधेही आढळतो?

*अ)* द्रविड
*ब)* इंडो-युरोपियन
*क)* आस्ट्रिक
*ड)* सेमेटिक

उत्तर:-अ-द्रविड

संस्कृतातही हा शब्द आढळतो.द्रविडकूळातून संस्कृतात साधारणतः एकहजारच्याही वरती शब्द आलेले आहेत.कुक्कुट हा द्रविडकूळातील शब्द आहे.

प्रतिसादाबद्दल समूहातील सदस्यांचे आभार!!!

डाॅ.अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान.
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

No comments:

Post a Comment