🚩 ज्ञानभाषामराठीपंधरवडा🚩
गणितीय माहिती
अंक - भाग ३
स्पेन व पश्चिम यूरोप
दहाव्या शतकात पोप दुसरा सिल्व्हेस्टर (मूळ नाव झेर्बेअर) याने हिंदू अंकपद्धतीचा पश्चिम युरोपात प्रसार केला. बगदाद येथे विद्वानांना जेव्हा आश्रय मिळेनासा झाला तेव्हा ते स्पेनमध्ये गेले. त्यांत रबीबेन इझ्रा (बारावे शतक) हा होता. त्याचा अंकगणितावरील एक ग्रंथ तेथे आहे. त्यात त्याने हिंदूंचे अंकगणित शून्याच्या वापरामुळे कसे सोयीचे झाले आहे हे साधार दाखविलेले आहे. ह्या ग्रंथात हिंदुपद्धतीतील फक्त शून्य घेण्यात आले आहे आणि बाकी नऊ अंकांसाठी हिब्रू अक्षरे वापरलेली आहेत. यावेळीच युरोपात शून्याचा वापर रूढ झाला. यानंतर सॅम्युएल बेन अब्बास (?- ११७४) याने अल्-तब्सीरा नावाचा अंकगणितावर ग्रंथ लिहिला. त्यात मात्र त्याने हिंदुपद्धतीच्या आकडयांचा वापर कटाक्षाने सर्वत्र केलेला आढळतो. बारव्या शतकात सेव्हिलचा जॉन याने अल्-ख्वारिज्मी याच्या अरबी ग्रंथाचे लॅटिनमध्ये डी न्यूमेरो इंडोरम् नावाने भाषांतर केले लॅटिन ही यूरोपात अभिजात भाषा मानली जात असल्याकारणाने स्वाभाविकपणे ह्या ग्रंथामुळे हिंदुपद्धतीचा परिचय सर्व यूरोपला झाला.
दशमानपद्धतीचा पुरेपूर प्रचार मात्र इटालियन गणितज्ञ लेओनार्दो फीबोनात्वी याच्यामुळे तेराव्या शतकात झाला. त्याच्या Liber Abaci (१२०२) या ग्रंथात हिंदु-अरबी पद्धतीने संख्या कशा लिहाव्यात व त्या कशा वाचाव्यात हे त्याने विस्ताराने सांगितले आहे. अशा प्रकारे हिंदु-अरबी दशमानपद्धती आधुनिक यूरोपीय जगात रूढ व स्थिर झाली.
सायमन स्टेव्हाइन (१५४८-१६२०) या डच गणितज्ञाने अपूर्णांक दर्शविण्यासाठी हिंदु-अरबी पद्धतीचा प्रथम वापर केला. यानंतर सतराव्या शतकाच्या आरंभी संख्येतील पूर्णांकी व अपूर्णांकी भाग वेगवेगळे दाखविण्यासाठी सध्याच्या दशांशचिन्हाचा वापर सुरू झाला आणि या वेळी अंकलेखनाची प्रचलित पद्धती परिपूर्णतेस पोचली. असे असले तरी अलीकडच्या काळातही पाश्चात्य देशांत काही किरकोळ भेद आढळतात. कित्येकदा एकच संज्ञा भिन्न संख्या दर्शविताना आढळते. उदा., ‘बिलियन’ ही संज्ञा अमेरिका व फ्रन्समध्ये ‘वन थाउजंड मिलियन’ म्हणजे १०९(= १,०००,०००,०००) ही संख्या दर्शविते; तर इंग्लंड व जर्मनीत तिचा अर्थ ‘मिलियन मिलियन’ म्हणजे
*१०१२ (= १,०००,०००,०००,०००) हा होतो.*
ज्योतिषशास्त्रात दूरस्थ ताऱ्यांचे अंतर दर्शविण्यासाठी फार मोठ्या संख्या वापराव्या लागतात आणि त्या लिहिणे फार गैरसोयीचे आहे. शास्त्रज्ञांनी प्रकाशवर्षाचे एकक मानून अथवा दहाच्या घातांत संख्या दर्शविण्याचा प्रघात पाडून ही अडचण सोडविली आहे.
संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩
विज्ञानकथा
अस्तित्व
अचानक जाग आली. हवेत किंचित गारवा जाणवत होता. किती वाजले असतील? उजाडलं असेल? डोळे उघडायचा प्रयत्न करतेय, पण उघडत नाहीयेत. काल दिवसभरचा त्रास अजून निवळला नाहीये. अंग मोडून आलंय. उठावंसंच वाटत नाहीये. आई गं! अचानक उजवा डोळा उघडला आणि पिवळा झोत पडला डोळ्यावर. डोळा चुरचुरतोय. त्रास होतोय त्याचा. एवढं थकायला झालंय! तो डोळा बंदही करवत नाहीये. अचानक झाला बंद. हाऽऽ! आता डावा उघडला. पुन्हा तोच झोत. कोण करतंय हे? कुठे आहे मी? डावा डोळापण बंद झाला. कुणीतरी आहेत आजूबाजूला. कुजबुजतायत काहीतरी. काय बोलतायत काही कळत नाहीये नीटसं. मोठय़ा मुश्किलीने उघडले डोळे हळूहळू. त्या धुरकट खोलीत दहा-बाराजण उभे आहेत आजूबाजूला माझ्या. माझ्याचकडे बघतायत. त्यांचे चेहरे नीटसे दिसत नाहीयेत. डोळ्यावर ताण द्यायला गेले तर डोकं आणखीनच ठणकायला लागलंय. कोण आहेत ते? इथे कधी आले मी? मला हलताही येत नाहीये. की बांधून ठेवलंय त्यांनी मला?
..आता हळूहळू सगळं स्पष्ट दिसायला लागलंय. मी हॉस्पिटलमध्ये आहे बहुतेक. मी इथे का झोपलेय? कोणी आणलं मला इथे? काय झालंय मला? आजूबाजूला डॉक्टर्स, नर्स उभ्या आहेत. एकजण माझ्या बेडवरच बसलाय. बोलतोय काहीतरी माझ्याशीच. पण काय?
‘कसं वाटतंय?’
‘ब्ब.. ब्ब.. ब्बऽऽ रं वाटतंय. बोलताना त्रास होतोय म्हणा. आवाजही बसलाय. पण कालपेक्षा नक्कीच बरं आहे.’
‘नाव काय तुमचं? आठवतंय काही?’
‘शीतल..’
सगळे इतके का खूश झाले माझं नाव ऐकून?
‘हा फोटो कुणाचा आहे आठवतंय काही?’
त्यांनी एक फोटो दाखवला. अर्थात तो माझाच आहे. मी ओळखणार नाही?
‘मा.. झा..’
‘गुड, व्हेरी गुड! आराम करा. आपण नंतर बोलू..’ असं म्हणून ते उठले जायला.
‘संदीप कुठे आहे?’
‘संदीप?’
सगळे एवढे का गोंधळलेत?
‘संदीप.. माझ्यासोबत ते आले नव्हते इथे?’
‘तुम्ही आराम करा. तुम्हाला अशक्तपणा आलाय आत्ता..’ एक नर्स जवळ येऊन इंजेक्शन देत म्हणाली, ‘बाकीचं सावकाश बोलता येईल.’
‘संदीप.. संदी.. प. कु.. कुठे आ..’
..डोळे उघडले. आता बरंच बरं वाटतंय. बाहेर अंधार पडलाय. लाइट्स लागलेत आतले. गेल्यावेळी शुद्धीवर आले त्यानंतर किती वेळ गेलाय देव जाणे. पुन्हा तेच सगळे अनोळखी डॉक्टरांचे चेहरे समोर होते.. माझ्याकडे रोखून बघत.
‘कसं वाटतंय आता?’
‘आता खूप बरं आहे.. गेल्या वेळेपेक्षा.’
‘तुम्हाला आठवतंय काही? बघा बरं आठवून.’
‘अं.. खूप गोंधळ होता. रात्र होती. मी धावत होते..’
‘हां, बरोबर. आणखीन?’
‘गोळ्यांचे आवाज..’
‘बरोबर.. पुढे?’
‘नाही एवढंच. संदीप कुठेय?’
‘ते वाचले नाहीत त्या हल्ल्यात.’
‘अच्छा. त्याला हेड शॉट लागलेला.. आठवलं.’
‘मला डिस्चार्ज कधी मिळेल?’
‘सध्यातरी नाही.’
‘का?’
‘तुम्हाला पॅरालिसिस झालाय.’
ओह नो! मीपण का नाही मेले बाकीच्यांसोबत? आता हे असं किती वर्ष पडून राहायचं.. काही काम न करता!
‘एवढंच?’ मी उपरोधाने म्हटलं.
‘नाही.’ डॉक्टरांनी नर्सला इशारा केला. ती बाजूच्या टेबलवर वळली. ही पुन्हा इंजेक्शन देऊन झोपवून ठेवतेय की काय मला?.. आरसा? काय झालंय माझ्या चेहऱ्याला? ती तो आरसा माझ्या समोर आणतेय. मी तर डोळे मिटूनच घेतले.
‘डोळे उघडा.’
‘मी नाही उघडणार. आधी मला काय झालंय ते सांगा.’
‘मॅडम डोळे उघडा. घाबरू नका.’
‘नाही. मला आधी सांगा- काय झालंय ते डॉक्टर.’ मला रडायलाच येत होतं.
‘घाबरू नका. असं काहीही झालेलं नाहीये. तुमचा चेहरा एकदम व्यवस्थित आहे. बघा तरी.’
मी हळूहळू डोळे उघडले. समोर आरसा होता. पण त्यात चेहरा..?
‘क्कोण आहे ही?’ मला घाम फुटला. ‘कोणाचा चेहरा आहे हा?’
‘तुमचाच.’
‘ही मी नाहीये. तुम्ही गेल्या वेळी दाखवला तो फोटो माझा होता. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी केलीत ना माझ्यावर?’
मी पुन्हा डोळे मिटून घेतले.
‘मी तुमच्यावर केस टाकेन. तुम्ही सगळे जेलमध्ये जाल. माझ्या परवानगीशिवाय माझ्यावर प्लॅस्टिक सर्जरी केलीच कशी तुम्ही?’
‘शांत व्हा मॅडम, शांत व्हा. तुमची प्लॅस्टिक सर्जरी केलेली नाहीये.’
‘खोटं बोलताय तुम्ही. हा चेहरा माझा नाहीये.’
‘तुमचा नव्हता हे खरं आहे, पण आता तुमचाच आहे.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे तुमचा मेंदू तुमचा स्वत:चा आहे; पण हे शरीर तुमचं नाहीये. ज्या रात्री तुमच्यावर गोळीबार झाला, त्या रात्री तुमच्या हृदयात गोळी लागली. पण तुमचा मेंदू जिवंत होता. तुमच्या मेंदूतली माहिती देशासाठी आवश्यक होती म्हणून आम्ही तुमचा मेंदू काढून लॅबमध्ये जिवंत ठेवला आणि त्यातली माहिती काढून घेत होतो इतकी वर्षे.’
‘इतकी? म्हणजे किती?’
‘९२ वर्षे. ज्यावेळी तुमचं स्वत:चं शरीर मृत झालं तेव्हाच. म्हणजे तुमचं मानसिक वय आहे ३५ वर्ष. तुमच्या मेंदूचं आज वय आहे ११७ वर्ष. आणि तुमचा मेंदू आता ज्या शरीरात इम्प्लांट केलाय त्याचं वय आहे ३० वर्ष. तुमच्या मेंदूतली देशाला हवी असलेली माहिती त्यावेळच्या संशोधकांनी दोन वर्षांत मिळवली. पण पुढची सगळी वर्षआम्ही तुमच्या मेंदूच्या मदतीने एकूणच मेंदूच्या रचनेचा अभ्यास करत होतो.’
‘मग मला आता तरी कशाला जिवंत केलंत? तुमचं काम संपलं होतं तर फेकून का नाही दिलात माझा मेंदू कचऱ्याच्या पेटीत.. तुमच्या नेहमीच्या पद्धतीने?’
‘आम्हाला बघायचं होतं, की इतक्या वर्षांनंतरही मेंदू दुसऱ्या शरीरात ट्रान्सप्लांट करून यशस्वी होतो की नाही! दुर्दैवाने ट्रान्सप्लांट करताना या शरीराच्या नर्वज् सिस्टममध्ये प्रॉब्लेम झाला. म्हणून तुम्हाला पॅरालिसिस झालाय.’
‘माझं खेळणं का बनवलंय तुम्ही?’
‘आम्ही नाही बनवलंय. तुम्ही स्वत:हून या प्रयोगाचा एक भाग बनला आहात.’
‘मला चांगलंच आठवतंय- मी अशा कुठल्याही प्रयोगाचा भाग झाले नव्हते. तुम्ही खोटं बोलू नका माझ्याशी.’
‘गुप्तचर खात्यात हजर होताना ‘या देशाची एकता, सार्वभौमता आणि सुरक्षितता अखंडित राहावी यासाठी मी कुठलीही गोष्ट करण्यासाठी सदैव तयार असेन.. प्रसंगी प्राणही देईन..’ असा करार केलाय तुम्ही.’
‘आणि त्याप्रमाणे मी प्राण दिलाऽऽऽय एकदा!’
‘तुमचं शरीर म्हणजे तुम्ही नव्हे!’
‘तुम्ही डॉक्टर आहात की संत?’
‘मी जे वास्तव आहे ते सांगतोय. तुम्ही पूर्ण विचारांती निर्णय घेऊन त्या कागदावर सही केलेली. आणि विचार मेंदूनेच केलेला.’
‘मग माझा मेंदू कुठनं काढलाय?’
‘मन, संवेदना, चेतना या मानवी समजुतीच्या आवाक्यापलीकडच्या गोष्टी आहेत मॅडम.’
‘बरं ठीक आहे. माझं शरीर मेलं, मेंदू जिवंत राहिला, तो तुम्ही साठवून ठेवला, तुम्हाला हवं ते सगळं काढून घेतलं, ठीक आहे. माझी हरकत नाहीये. माझ्या देशासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण मग मला पुन्हा जिवंत का केलंत? तुम्हाला कळतंय का माझी काय अवस्था झालीय ती?’
‘आम्हाला पूर्ण कल्पना आहे मॅडम.’
‘नाहीये कल्पना तुम्हाला डॉक्टर! मी कसं जगू तुम्ही सांगा? रोज स्वत:चं शरीर बघताना, रोज आरशात बघताना, कुणाशीतरी बोलत असताना मी सतत दुसऱ्या कुणालातरी बघत, ऐकत असेन. तुम्हाला कळतंय का? आताही मी तुमच्याशी बोलतेय, पण ते मी बोलतेय असं वाटत नाहीये. कारण हे शब्द माझे आहेत, पण हा आवाज माझा नाहीये डॉक्टर.’
‘तुम्ही शांत व्हा..’
‘मी जिवंत झाले ना? तुमचा प्रयोग यशस्वी झाला ना? चला, तुम्ही जिंकलात. पण आता दुसरं कुणीतरी म्हणून मला जगायचं नाहीये. मला तुम्ही मारून टाका.’
‘आय अॅम सॉरी मॅडम.’
‘प्लीज- माझ्यासाठी तेवढं तरी करा. मी हिंडू-फिरू शकले असते तर स्वत:च जीव दिला असता. पण पॅरालिसिसमुळे मी या बेडवरून हलूही शकत नाही. मला एवढी मदत कराल का?’
‘सॉरी, मी समजू शकतो तुमच्या भावना. पण तुमच्यासाठी मी तेवढंही करू शकत नाही. इच्छामरणाला अजूनही परवानगी नाहीये या देशात.’
-प्रसन्न करंदीकर Kprasanna.mangesh@gmail.com
संदर्भ : दै. लोकसत्ता १५ फेब्रुवारी २०१५.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🚩 ज्ञानभाषामराठीपंधरवडा*🚩
दि.११/१/२०१८
🧐 *मूळ भाषेतील शब्द शोधा🧐
उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण
प्रश्न १- 'आंडेर','आंडोर' हे शब्द कोणत्या बोलीतील आहेत?
अ)बाणकोटी
ब)अहिराणी
क)मालवणी
ड)गोंडी
उत्तर-ब-अहिराणी
ज्या भाषिक प्रदेशात ही भाषा बोलली जाते त्या खानदेशावरून 'खानदेशी भाषा'आणि जे आभिर,अहिर लोक ही भाषा बोलतात त्यावरून 'अहिराणी' हे नाव पडले आहे.अहिराणी भाषा बऱ्हाणपूर ,धुळे,जळगाव,नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग आणि बुलढाण्यापर्यंत बोलली जाते.या प्रदेशात भिल्ल,ठाकूर,कातकरी,वारली आणि आभीर जमातीचे लोक राहतात.
प्रश्न २- 'हांडवन्या'ही शिवी कोणत्या बोलीमधे वापरली जाते?
अ)कुडाळी
ब)ठाकरी
क)नागपुरी
ड)धनगरी
उत्तर-क-नागपुरी
नागपुरी बोली नागपूर ,वर्धा जिल्हा,चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच छिंदवाडा-सौंसर व बालेघाटचा नैऋत्य भाग या प्रदेशात बोलली जाते.'हांडवन्या'ही नागपुरी बोलीतील शिवी आहे.हांडवन्या म्हणजे बायक्या या अर्थी ही शिवी वापरतात.
प्रश्न ३- 'मस्टि' हा शब्द कोणत्या बोलीतील आहे?
अ)वऱ्हाडी
ब)अहिराणी
क)भंडारी
ड)डांगी
उत्तर-ड-डांगी
१९६०मधे महाराष्ट्र आणि गुजरात ही स्वतंत्र राज्ये झाली.तेव्हा ६५० चौरस मैलांचा दांग जंगलाचा प्रदेश गुजरात राज्यास जोडण्यात आला. डांगीची प्रमुख बोली भिल्ली ही आहे.डाॅ.ग्रिर्यसन यांनी डांगीचा गुजराती भाषेशी संबंध दर्शविला असून तिला गुजरातीची पोटभाषा मानली आहे.तर काही अभ्यासक डांगीचा मूळ गाभा मराठी असल्याचे मानतात.डांगी बोलीत 'मस्टि'म्हणजे स्मशान.
प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन!
डाॅ. अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
नमस्कार मित्रांनो,
मराठी भाषा पंधरवड्यातील पहिल्या मराठी प्रश्नमंजुषेसाठी तयार आहात ना?
बरोबर रात्री ९ वाजता दुवा प्रतिसाद स्वीकारण्यास सुरुवात करेल...
२ विज्ञानपर उतारे आणि २ कविता अभ्यासून त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत....
विजेत्या सदस्याला ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
गुगल फॉर्म https://goo.gl/forms/mSXZmeQSutV7YBPm1
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषापंधरवडा
No comments:
Post a Comment