Tuesday, January 9, 2018

७ जानेवारी

🚩 ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

दि.७/१/२०१८

  🧐 मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- 'गोचीड', 'चिचुंद्री' या शब्दांवर कोणत्या मूळ भाषेची छाया आहे?

अ)ऑस्ट्रीक
ब)पोर्तुगीज
क)केरळी
ड)तमिळ

उत्तर-अ-ऑस्ट्रीक

  ऑस्ट्रीक परिवार म्हणजेच ऑस्ट्रो-एशियाटीक परिवार अथवा ऑस्ट्रीक/आग्नेय परिवार व त्याअंतर्गत येणार्या भाषा येतात.यामधे पश्चिमी व पूर्वी असे दोन गट पडले आहेत व त्याप्रमाणे भाषांचे वर्गीकरण केले आहे.पूर्वी या परिवाराचे क्षेत्र विस्तृत होते.पण कालांतराने ते सीमित झाले.आग्नेय आशियातील लोकांशी फार पूर्वी देवाणघेवाण झाली त्यात ऑस्ट्रीकमधून बरेच शब्द मराठीत आले.ताम्बूल -उदा.मागे बघितलेच.त्यामधेच गोचिड, चिचुंद्री,चिमणी ,डुक्कर इत्यादी शब्दांवर ऑस्ट्रीक भाषेची छाया आहे.

प्रश्न २- 'होल्डाॅल' हा प्रवासाशी निगडीत असणारा आणि मराठीत वापरल्या जाणारा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?

अ)इंग्रजी
ब)रोमन
क)जर्मन
ड)फ्रेंच

उत्तर-अ-इंग्रजी

   फ्रेंच,पोर्तुगीज,डच इत्यांदीपेक्षा इंग्रजांचा व आपला संबंध विशेष प्रकारचा व दीर्घकालीन असा आहे.जीवनाच्या विविध स्तरांवर इंग्रजी भाषेतील शब्दांचा प्रभाव आताही  टिकून आहे.शाळेशी संबंधीत,पोशाख,वैद्यकीय क्षेत्र,प्रवासक्षेत्र,पोस्टाच्या व्यवहारात ,वृत्तपत्रात इत्यादी क्षेत्रांतून इंग्रजी शब्द मराठीत आले.

प्रश्न ३- विसोबा खेचर यांच्या एका अभंगात 'मुळू' , 'उदानु', 'अंगुळ' या शब्दांचा उल्लेख आला आहे.हे शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे ?

अ)तेलुगु
ब)तुळू
क)ब्रजभाषा
ड)प्राकृत

उत्तर-क-ब्रजभाषा

   नामदेवांच्या उत्तरेकडील प्रवासात त्यांचा ब्रजभाषेशी संबंध आला असावा.त्यांचे गुरू विसोबा खेचर यांच्या " ' मूळ ' वदनाचा 'उदानु' नेत्राचा | 'अंगुळ' हस्ताचा स्वामी माझा" या अभंगात मूळु-एक,उदानु-तीन,अंगुळू-दहा असे ब्रजभाषेतील शब्द आले आहेत.तसेही ब्रजभाषा कृष्णगोपींची म्हणूनही ती मध्ययुगीन कवींना प्रिय वाटत होती.

प्रतिसादाबद्दल सर्व समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्यांचे अभिनंदन!!

डाॅ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषामराठीपंधरवडा🚩

#वाचनीय

ग्रीनिच प्रमाण वेळ (Greenwich Mean Time)
(इंग्रजीमध्ये ग्रीनविच असं स्पेलिंग असलं तरी मराठीत ग्रीनिच असेच म्हणतात)

ग्रीनिच हे लंडन शहराचा उप विभाग आहे. येथून जाणारे रेखावृत्त मूळ किंवा शून्य रेखावृत्त म्हणून मानलेले आहे. या रेखावृत्तावर सूर्य डोक्यावर आला की त्या ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे समजतात. हीच त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. ब्रिटीश बेटांची प्रमाणवेळ याच वेळेवरून ठरवली जाते. भारतीय प्रमाणवेळ ही जीएमटीपेक्षा ५ तास ३० मिनिटे अगोदर येते. उदाहरण: इंग्लंडमध्ये दुपारचे साडेतीन वाजले असताना भारतात रात्रीचे ९ वाजले असतात.

ग्रीनविच मीन टाईम

जीएमटी – खरं तर मानकीकरण आणि नियमीकरणाचा प्रयत्न आहे ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जागेवर त्या त्या वेळी किती वाजलेत हे सांगू शकतो. इ.स. १८८४ ते १९७२ पर्यंत जीएमटीच आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ होती. आज त्याची जागा UTC म्हणजे Coordinated Universal Time ने घेतली असली तरी भारतात अजूनही बऱ्यापैकी जीएमटीचा बोलबाला आहे.

जीएमटी जगाची प्रमाणवेळ कशी झाली?

इ.स. १८८४ मध्ये आंतरराष्ट्रीय रेखावृत्त परिषदेत (International Meridian Conference) ग्रीनिच मेरीडीयन (Greenwich Meridian) हेच मुख्य रेखावृत्त (Prime Meridian) असेल असा ठराव संमत झाला. याला मुख्य दोन कारणे होती. एक तर अमेरिकेने आपल्या राष्ट्रीय वेळ सारिणीसाठी ग्रीनिच वेळच प्रमाण धरली होती. दुसरं, १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी, जगाचा ७२% व्यवसाय समुद्री नकाश्यांवर अवलंबून होता, जे ग्रीनिच रेखावृत्ताला मुख्य रेखावृत्त मानून बनले होते. या दोन कारणांनी असे ठरले की ग्रीनिच रेखावृत्तालाच मुख्य रेखावृत्त म्हणजेच O° रेखावृत्त घोषित केले तर जगातली अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल.     

संदर्भ:डायमंड भूगोल–पर्यावरणशास्त्र कोश

संकेतस्थळ:रॉयल म्यूझियम ग्रीनवीच
http://www.rmg.co.uk/discover/explore/greenwich-mean-time-gmt
लेख: History of Greenwich mean time
https://www.theguardian.com/uk/2008/oct/16/jerseyisland1

संकलन:- निवेदिता खांडेकर

समूह: ज्ञानभाषा मराठी मुख्य समूह
प्रशासक, ज्ञानभाषा मराठी, विदर्भ विभाग

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञान कथा

स्टँटिक बॉक्स

‘कॉंग्रॅच्युलेशन, छान एम्ब्रियो तयार झालाय. आता याचे नीताच्या गर्भाशयात रोपण केले की शी विल बी प्रेग्नंट! ’ असे मी जेव्हा नीता आणि अनिकेत यांना सांगितले तेव्हा त्यांच्याकडून मला अपेक्षित असलेली कुठलीही आनंदाची प्रतिक्रिया आली नाही. उलट मोठय़ा पेचात सापडल्याचे भावच त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.
आय. व्ही. एफ.च्या पहिल्या दोन सायकल्स अयशस्वी झाल्यानंतर जेव्हा तिसऱ्या सायकलमध्ये गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली; तेव्हा साहजिकच त्यांना खूप आनंद होईल अशी माझी अपेक्षा होती. पण ‘अरे बापरे! हा मोठाच प्रश्न उभा राहिला.’ या अनिकेतच्या उद्गाराने मला बुचकळ्यात टाकले.
‘का? तुम्हाला आनंद नाही झाला?’ मी त्यांना विचारले.
‘आनंद झाला डॉक्टर! पण झालं असं की आमच्या कंपनीचे न्यू यॉर्कच्या आय.बी.एन.शी काही टायअप्स झाले आहेत. त्यानुसार मला पुढच्या महिन्यात यू.एस.ला पाठविण्याचे मॅनेजमेंटने ठरविले आहे. अ‍ॅण्ड इट्स अ लाइफ टाइम ऑपॉच्र्युनिटी फॉर मी,’ नीता म्हणाली.
‘पण भारतातच सेटल व्हायचा निर्णय तुम्ही मागेच घेतला होता ना?’ मी विचारले.
‘यू.एस.मध्ये सेटल व्हायचा काही विचार नाही. पण ही संधी सोडली तर माझ्यासारखी मूर्ख मीच ठरेन. दोनच वर्षांचा प्रश्न आहे, पण भारतात परत आल्यावर माय करिअर विल बी फ्लश विद सक्सेस. शिवाय प्रेग्नन्सीच्या कारणाने मी जर नकार दिला तर मॅनेजमेंटवर वाईट इम्प्रेशन पडेल आणि माझ्या करिअरला कायमची खीळ बसेल,  दे मे इवन फायर मी.’ नीता उत्तरली.
‘तुमच्या वैयक्तिक निर्णयात मी ढवळाढवळ करू शकत नाही. पण हा एम्ब्रियो जर आपण इम्प्लांट केला नाही तर नंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूप कमी आहे. एक डॉक्टर या नात्याने या गोष्टीची कल्पना तुम्हाला देणे हे मी माझे कर्तव्य समजतो.’ मी दोघांना निर्वाणीचा इशारा दिला.
‘डॉक्टर, आम्हाला बाळ हवंय हो! असं नाही का करता येणार? हा एम्ब्रियो तसाच ठेवून नीता न्यू यॉर्कवरून परत आल्यावर तो तिच्या गर्भाशयात इम्प्लांट करायचा?’ अनिकेतने विचारले.
‘हो, तसे तंत्रज्ञान आहे. त्याला एम्ब्रियो फ्रीझिंग असे म्हणतात. टेस्ट टय़ूब बेबी ट्रीटमेंटच्या वेळेस जेव्हा एकापेक्षा अधिक भ्रूण तयार होतात तेव्हा त्यापैकी एकाचे रोपण स्त्रीच्या गर्भाशयात करून उरलेले भ्रूण गोठविले जातात. गरज पडल्यास ते पुढच्या वेळेस स्त्रीच्या गर्भाशयात सोडता येतात. किंवा काही जोडपी असे भ्रूण दुसऱ्या जोडप्यांना डोनेटही करतात. पण त्यात काही धोके आहेत. हे तंत्रज्ञान कधी कधी अपयशीही ठरू शकते.’ मी कल्पना दिली.
‘आम्ही तयार आहोत डॉक्टर. शिवाय दुसरा पर्यायही नाही.’ नीता उत्तरली.

त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नीता भारतात परतली. आता मात्र दोघांनाही नव्या पाहुण्याची उत्कंठा लागून राहिली होती. फ्रीझ केलेला एम्ब्रियो नीताच्या गर्भाशयात इम्प्लांट करण्यात आला. मला त्यात व्यंग निर्माण होण्याची भीती होती. सुदैवाने सर्व टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्या. गर्भाच्या वाढीवर सोनोग्राफीद्वारे माझे बारीक लक्ष होते. माझा प्रयोग यशस्वी झाला होता. सर्व काही व्यवस्थित होते. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. डिलेवरीची तारीख जवळ येऊ  लागली. एके दिवशी अचानक अनिकेतचा मला फोन आला. त्या दोघांना मला अर्जंट भेटायचे होते. गर्भाचीच काही समस्या निर्माण झाली असावी असे मला वाटले. मी त्यांना अपॉइंटमेंट दिली.
‘डॉक्टर, आपल्याला ही डिलेवरी पुढे नाही का ढकलता येणार?’ माझ्यासमोर बसल्या बसल्या अनिकेत म्हणाला.
‘अरे, ही बाळाची डिलेवरी आहे  निर्जीव मालाची नाही.’ मी जरा रागानेच म्हटले.
‘सॉरी डॉक्टर, पण आम्हालाही बाळाची ओढ आहेच ना! प्रॉब्लेमच तसा उभा राहिला आहे. रिसेशनमुळे नुकताच माझा जॉब गेलाय. बदललेल्या कामगार कायद्यांमुळे नीताला प्रेग्नन्सी लिव्हमध्ये कुठलाही पगार मिळणार नाहीये. तेव्हा वी कान्ट अफोर्ड अरायवल ऑफ न्यू मेंबर इन अवर फॅमिली.’ अनिकेतने समस्या सांगितली.
‘हे बघ अनिकेत, दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०६० पर्यंत असे करता येत नसे. पण तुमच्या सुदैवाने असा शोध नुकताच लागला आहे. गर्भ जिवंत ठेवून त्याची वाढ थांबवून डिलेवरी पुढे ढकलण्यासाठी एक इंजेक्शन मिळते. हे इंजेक्शन दर महिन्याला शिरेद्वारे घ्यावे लागते.’ मी पर्याय सांगितला. दिवसेंदिवस कुटुंबसंस्था उद्ध्वस्थ होत चालली आहे. एकमेकांना मदत करणे, नातीगोती सांभाळणे या सगळ्याला मागच्या शतकातच ओहोटी लागली होती. आता तर या गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे प्रसूतीसारख्या घटनाही आयुष्यात खूपच ताणतणाव वाढवतात. आमच्या आयुष्यातील नेहमीच्या घटनाही बाजारपेठेच्या नियामांनीच नियंत्रित होऊ  लागल्या आहेत. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे! लोकांच्या गरजा लक्षात घेऊन असे संशोधन होऊ  लागले आहे.
नीताने हा इंजेक्शनचा पर्याय स्वीकारला. अवघडलेल्या स्थितीत नीता ऑफिसला जाऊ लागली. अनिकेतला नवी नोकरी मिळालीच नाही. पुढे त्याने स्वत:चा बिझनेस सुरू केला. व्यवसायात स्थिरस्थावर होईपर्यंत दोन वर्षे निघून गेली. दोन वर्षांनंतर त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. एव्हाना नीताची चाळिशी उलटून गेली होती. या वयातील बाळंतपण, त्यातही पहिली खेप, खूपच धोकादायक असते. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा पूर्ण वापर करून तिचे सिझेरियन करण्यात आले. बाळ- बाळंतीण यातून सुखरूप बाहेर पडल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

त्यानंतर तीन महिन्यांनी मी स्वित्झर्लंडला सहलीला गेलो. तिथे अनपेक्षितपणे अनिकेत आणि नीता मला एका रिसोर्टमध्ये भेटले. दोघेही सुटीची मजा घेत होते. पण त्यांच्यासोबत त्यांचे बाळ दिसत नव्हते.
‘अरेच्चा! तुम्ही इथे कसे? आणि बाळ कुठे आहे?’ मी विचारले.
‘काही नाही डॉक्टर. गेली काही वर्षे खूपच धावपळीची होती. त्यानंतर नीताची डिलेवरी! बाळानेही सुरुवातीला खूप त्रास दिला. रात्र रात्र झोपत नसे. दोन-अडीच वर्षांच्या प्रेग्नन्सीने नीताची पाठही खूप दुखायची. बाळाला बाहेरचं दूध लवकरच सुरू करण्याचा आम्ही डिसिजन घेतला. पण त्यानेही बाळाला सुरुवातीला खूप जुलाब झाले. या सगळ्याचा खूप स्ट्रेस आला होता. म्हणून म्हटलं, लेट्स टेक अ ब्रेक.’ अनिकेत सांगत होता.
‘मग बाळाला काय पाळणाघरात ठेवले?’ माझा प्रश्न.
‘नाही, स्टँटिक बॉक्समध्ये ठेवले.’ अनिकेत उत्तरला.
‘स्टँटिक बॉक्स?’ मी आश्चर्याने विचारले.
‘हुं, नुकताच शोध लागलाय त्याचा. इंडियात अजून मिळतही नाही. खास यू.एस.मधून मागविला हा बॉक्स आम्ही़ ’ अनिकेत सांगू लागला.
‘‘मी समजलो नाही. स्टँटिक बॉक्स हा शब्द प्रथमच ऐकतो आहे मी.’ मी म्हणालो.
‘तुम्हाला माहीत आहेच, हल्लीचं आयुष्य कसं डिमांडिंग आहे ते. आणि मूल वाढवणं काही कमी हेक्टिक काम नाही. त्यामुळे संशोधकांनी हा बॉक्स तयार केला आहे. या बॉक्समध्ये मूल घातलं कीते फ्रीझ होतं. त्याचा श्वासोच्छ्वास, हृदय सुरू राहते, पण ते हालचाल करीत नाही. या काळात ते अतिशय कमी ऊर्जा वापरते. त्यामुळे त्याला अन्नाचीही गरज नसते. या काळात त्याचे वयसुद्धा स्थिर राहते. एक प्रकारच्या सुप्तावस्थेत जाते ते. दरम्यान पालक आपापली  महत्त्वाची कामे करून घेऊ  शकतात. बॉक्समधून बाहेर काढतात. त्याची स्मृती आणि हालचाली पूर्ववत होतात. हिवाळ्यात अन्न मिळत नाही तेव्हा बर्फाळ प्रदेशातील प्राणी आणि गोठलेल्या तळ्यातील बेडूक हेच तंत्र वापरतात.  आमच्यासारख्या बिझी पालकांसाठी एक वरदानच आहे हा बॉक्स. या बॉक्समध्ये काही तासांपासून काही वर्षांपर्यंत कितीही वेळ आपण बाळ ठेवू शकतो.’ अनिकेतने सांगितले.
त्यानंतर वर्षांमागून वर्षे गेली. मी माझ्या वयाची नव्वदी केव्हाच ओलांडली आहे. वाढत्या वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्यमान वाढले. साहजिकच प्रदीर्घ कंटाळवाणे म्हातारपण नशिबी आले. एकदा संध्याकाळच्या वेळेस पेन्शनर्स पार्कमध्ये गेलेलो असता एक सत्तरीचे जोडपे एका दोन -अडीच वर्षांच्या लहान मुलाला खेळवत होते.
‘‘अरे वा ! नातू वाटतं?’’ मी सहज गप्पा माराव्यात म्हणून म्हणालो. आताशा एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणे ही गोष्टच नामशेष झाली आहे असे वाटत होते. शेजारीपाजारी सोडा, पण नवरा-बायको, बाप-मुलगा हेदेखील एकमेकांना व्हर्चुअल जगातच भेटत. त्यामुळे बाळाला खेळविणारे आजी-आजोबा पाहून मला जरा अप्रूपच वाटले.
‘डॉक्टर तुम्ही! ओळखलं नाही का आम्हाला?’ त्यातल्या स्त्रीने विचारले.
‘वयोमानाप्रमाणे स्मृती जरा क्षीण झाली आहे खरी! नाही ओळखू येत चेहरे लवकर.’ मी ओळखण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो. जुने पेशंट असे अवचित भेटतात आणि पंचाईत होते.
‘अहो, मी अनिकेत आणि ही नीता. तुम्हीही कसे ओळखणार म्हणा! पंचवीस वर्षे केव्हाच उलटून गेली असतील भेटून.’
खरेच की! पांढरे केस आणि जीर्ण चेहऱ्यातून मला हळूहळू ओळख पटू लागली .
‘कमाल आहे! त्या वेळेस इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेणारे तुम्ही असे नातवाला खेळाविताना बघून खरेच आनंद वाटला.’ मी समाधानाने म्हणालो.
‘नाही डॉक्टर, हा नातू नाही आमचा. हा तोच मुलगा आहे. तुमच्या ट्रीटमेंटने झालेला. विश्वजित.’ नीता म्हणाली. मी बुचकळ्यात पडलो.
‘पण तो तर आता सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांचा असेल नं?’ मी विचारले.
यावर दोघेही काही क्षण गप्प झाले. मग अनिकेत अपराधी चेहऱ्याने सांगू लागला. ‘ती आमची एक चूकच झाली. तुम्हाला तर माहीत आहे. त्या काळात आम्ही प्रचंड बिझी होतो. माझा व्यवसाय नुकताच जोर पकडू लागला होता आणि नीता करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होती. सारख्या मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, क्लायंट्सशी चर्चा, भेटीगाठी सतत चालू असायच्या. शिवाय कामाचाही प्रचंड स्ट्रेस असायचा. तेव्हा नुकताच मार्केटमध्ये लाँच झालेल्या  स्टँटिक बॉक्सचा आम्हाला खूपच आधार वाटू लागला. डेड लाइन चार दिवसांवर आलीय? टाका बाळाला बॉक्समध्ये. मीटिंगमध्ये महत्त्वाचं प्रेझेन्टेशन द्यायचे आहे, टाका बाळाला बॉक्समध्ये. चार दिवस बिझनेस टूरवर जायचं आहे? टाका बॉक्समध्ये. सुरुवातीला दोन-चार दिवसांचा असलेला स्टँटिक बॉक्समध्ये बाळाला टाकण्याचा कालावधी नंतर नंतर वाढू लागला. आजारपण, धंद्यात नुकसान, जॉब बदलणे, आलेले नैराश्य या कारणांनी विश्वजित महिनोन्महिने बॉक्समध्ये राहू लागला. त्याची शी-शू काढणे, आजारपणात रात्र रात्र जागणे, त्याचे मूड्स सांभाळणे या सगळ्यांसाठी त्या काळात आमच्याकडे वेळच नव्हता. कधी जागेची कमतरता, कधी आर्थिक अस्थिरता यामुळे आपण त्याला दर्जेदार सोयीसुविधा देण्यात कुठे कमी पडू नये असे वाटायचे. मध्यंतरी काही वर्षे सतत युद्धाचे वातावरण होते. त्याचा दुष्परिणाम विश्वजीतवर होऊ  नये असे वाटायचे. त्यामुळे त्याला त्या काळात पूर्ण वेळ स्टँटिक बॉक्समध्येच ठेवले होते. कधी कधी आपण आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय असं वाटायचं, पण हे सगळे आपण विश्वजीतच्या भल्यासाठीच करतोय या विचाराने अपराधी भाव कमी व्हायचा. आपण मुलांना या जगात जन्माला घालतो, पण आपली मुले आनंदाने वाढू शकतील असं जग कुठे आपण त्यांना देऊ  शकतो? आज ना उद्या परिस्थिती बदलेल, आपण आपल्या मुलाला अधिक चांगल्या जगात वाढवू असं वाटायचं. पण त्याचा परिणाम उलटाच झाला. आज आम्ही दोघांनी साठी ओलांडली. मात्र, आमचे बाळ अजून अडीच वर्षांचेच आहे. बाकी परिस्थिती जैसे थे आहे. काल ज्या समस्या आमच्या पुढे होत्या त्या आजही आहेत, हे आमच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही स्टँटिक बॉक्स फोडूनच टाकला. जग तर आपण बदलू शकत नाही मग आपणच बदलायचं, आपल्या मुलांना अधिक चांगल्या काळात वाढविण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत समाधान शोधायला आम्हीही शिकत आहोत आणि त्यालाही शिकविणार आहोत.’
या सगळ्याशी अनभिज्ञ एकटाच स्वत:च्या विश्वात मश्गूल होऊन खेळणाऱ्या विश्वजीतकडे पाहून माझे डोळे भरून आले. तो आता स्टँटिक बॉक्समध्ये नाही.  मात्र खेळात मग्न झाल्याने काळ जणू त्याच्यासाठी स्तब्ध झाला आहे. त्याला काळजी फक्त या क्षणाची आहे. पण हा हळूहळू मोठा होईल. स्पर्धेचं युग त्याच्यावरही आपला अंमल चढवेल. तोही या उंदरांच्या शर्यतीत अथक धावू लागेल. मग त्याला आपल्या अति वृद्धपण पुढारलेल्या विज्ञानाने आयुष्यमान वाढलेल्या आई-वडिलांची अडचण होऊ  लागेल. विश्वजीत मोठा होऊन आपल्या आई-वडिलांना वारंवार  स्टँटिक बॉक्समध्ये टाकतो आहे आणि हळूहळू त्यांना स्टँटिक बॉक्समधून कधीच न काढण्याचा निर्णय त्याने घेतला आहे, असे चित्र मला स्पष्ट दिसू लागले.

-डॉ. अमित शिंदे

amitshinde112@gmail.com

संदर्भ : दै. लोकसत्ता १९ जुलै २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🐕 ये लाल रंग...!🔴

http://tusharki.blogspot.in/2018/01/blog-post.html
अंगणात तुळशीवृंदावन, दारात पायरीजवळ वेलकमसदृश काहीतरी  लिहलेले एखादे पायपुसणे आणि कुंपण वगैरे असलेच तर त्यावर नावाची पाटी असे काहीसे वर्णन आपल्या घरांचे करता येईल. फ्लॅटसंस्कृती येऊनदेखील यात फारसा बदल झाला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून दारासमोरील घटकांमध्ये आणखी एका वस्तूची भर पडली आहे. सजावटीचा, संस्कृतीचा भाग नसूनही या वस्तूने घरासमोरील मानाचे स्थान पटकावले आहे. ही नविन गोष्ट म्हणजे ‘लाल रंगाची बाटली’! साध्या कौलारू घरांपासूून ते बहुमजली इमारतींपर्यंत, शेतकरी कष्टकऱ्याच्या दारापासून ते उच्चशिक्षित आणि धनाढ्यांच्या बंगल्यांपर्यंत या लाल बाटलीने स्थान मिळवलेय.
असे काय विशेष आहे या बाटलीत? कशासाठी या घरासमोर ठेवल्या जातात?
या ‘लाल बाटल्या’ ठेवण्यामागचं कारण एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. भटक्या कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी, घरापासून दूर हाकलण्यासाठी या बाटल्या ठेवल्या जाताहेत. या लाल रंगाच्या बाटल्या बघून कुत्रे त्या परिसरात फिरकत नाहीत असा दावाही केला जातोय. जेव्हा एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणावर केली जाते तेव्हा त्यावरील विश्वास वाढत जातो. अशा विश्वासातूनच सगळीकडे हा प्रकार वाढत गेला. लाल सिग्नल पाहील्यानंतर भली मोठी रेल्वेही थांबते मग कुत्र्याची काय बिशाद? या लाल रंगाचा धसका कुत्र्यांनी का घेतला असावा?
आपल्या मनातील सर्व शंका-कुशंकांची शास्त्रीय अंगाने चर्चा केल्यावर काय हाती लागते ते पाहू.
आपल्याला हे माहीत आहे की, रंगांचा जन्मच मुळी प्रकाशातून होतो. काचेच्या लोलकाप्रमाणे असणाऱ्या पावसाच्या थेंबातून सूर्याचा पांढरा प्रकाश जेव्हा जातो; तेव्हा पाऊस आणि उन्हं एकाच वेळी आलीत की सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं. एखादी वस्तू पाहिल्यानंतर तिची प्रतिमा, तिचे रंग याबाबतची माहिती मेंदूकडे पाठवण्याकरिता आपल्या डोळ्यात दोन प्रकारच्या पेशी असतात. कोन सेल्स अर्थात ‘शंकू पेशी’ आणि रॉड सेल्स अर्थात ‘दंडगोल पेशी’. दंडगोल पेशींमुळे आपल्याला कमी प्रकाशातही दिसू शकतं, पण या पेशींमार्फत आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंग दिसू शकत नाहीत. शंकू पेशींमुळे आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंगांचं ज्ञान होतं. पण त्या पेशी केवळ जास्त प्रकाशातच त्यांचं प्रतिमाज्ञान करवून द्यायचं काम करू शकतात. शंकू पेशी या तीन प्रकारच्या असतात- तांबडय़ा, हिरव्या आणि निळ्या रंगांचं ज्ञान करवून देणाऱ्या या पेशींमुळेच आपल्याला रंगज्ञान होत असतं. हे होतं मानवाच्या बाबतीत पण कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये मात्र पिवळ्या आणि निळ्या रंगाच्याच कोन पेशी असतात. लाल रंग ओळखू येण्यासाठी आवश्यक लाल रंग संवेदन कोनपेशी कुत्र्याच्या डोळ्यांत नसतात. याचा अर्थ असा नाही की कुत्र्याला लाल रंगाच्या वस्तू दिसत नाहीत, तर तो अशा वस्तू पाहू शकतो परंतु लाल-हिरव्या रंगातील फरक कळत नाही. म्हणजे एक प्रकारे ‘रंगाधळेपणाच!’ असे असले तरी रंगाच्या प्रकाश तीव्रतेच्या आधारे तो दोन रंगांतील फरक ओळखू शकतो.  थोडक्यात काय तर ‘कुत्र्यांना लाल रंग ओळखता येत नाही.’ असेच काहीसे लाल रंग दिसल्यास बैल किंवा वळू हल्ला करतो या बाबतीतही होते. हे प्राणीसुद्धा लाल रंग ओळखू शकत नाहीत.
डिस्ने पिक्चर्सच्या ‘प्लुटो’ नावाच्या कार्टूनवर एक मस्त एपिसोड आहे. या भागाची सुरूवातच _*“कुत्ता अपने नाक से देखता है!”*_  या वाक्याने सुरू होते. यात वासाच्या साह्याने शोध घेणारा प्लुटो आणि त्याची फजिती करणारी खार यांचे गंमतीदार प्रसंग आहेत. यातील गंमतीचा आणि अतिशयोक्तोची भाग सोडला तर कुत्रा या प्राण्याची वास घेण्याची क्षमता उच्च असते. त्यात भर म्हणून कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना कमी वारंवारतेचे ध्वनी ऐकण्याची क्षमता प्राप्त आहे. त्यामुळे कुत्र्याच्या दृष्टीपेक्षाही अधिक ज्ञान त्याला इतर इंद्रियांपासून मिळते.
वरील माहीतीचा विचार केल्यास लाल रंगाच्या बाटलीमुळे कुत्रे दूर जातात ही एक आधुनिक अंधश्रद्धा असल्याचे लक्षात येईल. ‘लाल रंग आणि कुत्रा’ या दोघांचा संबंध सर्वप्रथम जोडणारे असामान्य संशोधक आणि अतिशय वेगाने त्याची अंमलबजावणी करणारी सामान्य जनता अशा दोघांच्या संयोगाने हा अ(ति)सामान्य उपाय वापरला गेला. मात्र लाल बाटल्या घरासमोर ठेवल्यानंतर काहींना कोणताच परिणाम न जाणवल्याने आता हळू हळू या नविन सजावटीने आपले स्थान गमावले आहे.
*‘कुत्रा आणि लाल रंगाची बाटली’* हे नविन युगातल्या अंधश्रद्धांचा केवळ एक नमुना उदाहरण आहे. शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी न करता अशा अनेक अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम आपण इमानेइतबारे करत आहोत. समाजमाध्यमांनी ग्रासलेल्या सध्याच्या काळात तर या थोतांडांना अधिक बळ मिळत आहे.  सुरूवातीला निरर्थक आणि निर्धोक वाटणाऱ्या या नविन अंधश्रद्धा कधी मोठे रुप धारण करतात हे कळत देखील नाही. या अशा अंध विचारांना थांबवण्यासाठी गरज आहे ती सारासार विवेकबुद्धीची आणि शास्त्रीय दृष्टीकोनाची.  विज्ञानाच्या चोख दृष्टीतून पाहील्यास या अंधश्रद्धांच्या पलीकडील सत्य सापडून  ज्ञानाचा प्रकाश पसरू शकेल. इतरांचं जाऊद्या, ही सकारात्मक सुरूवात आपल्यापासूनच करूया.

- श्री. तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment