🚩 ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩
दि.८/१/२०१८
🧐 मूळ भाषेतील शब्द शोधा🧐
उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण
प्रश्न १- 'धन्यवाद 'शब्द कोणत्या भाषेतून येऊन सहजपणे मराठीत मिसळला?
अ)हिंदी
ब)गुजराती
क)सिंधी
ड)पंजाबी
उत्तरे-अ-हिंदी
मराठीच्या काही सीमाप्रदेशांवर हिंदी भाषा नांदतात.हिंदी भाषकांचा संबंध पूर्वी नागपूर शासनाशी आला असल्याने नागपुरी मराठीवर हिंदीचा प्रभाव विशेष दिसतो.त्यातूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ,आभार व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद 'हा शब्द हिंदीतुन मराठीत आला.
प्रश्न २-ज्ञानेश्वरीत आढळणारा 'अडालु'हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?
अ)मल्याळम
ब)संस्कृत
क)कन्नड
ड)महाराष्ट्री
उत्तरे-क-कन्नड
मराठी -कन्नडचा संबंध जुना आहे.विविध व्यवहारांवर कन्नडची मराठीवर जशी छाप आहे तशी ती भावभावना व्यक्त करण्यासाठी लागणार्या शब्दांवरही आहे.ज्ञानेश्वरीत काही कन्नड शब्द आले आहेत. त्यापैकी 'अडालू' हे एक.अडालू म्हणजे भय/भीती या अर्थी.
प्रश्न ३-नात्यांचा संबोध करणारे अक्का,अण्णा,अम्मा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
अ)तमीळ
ब)उर्दू
क)गुजराती
ड)तेलुगु
उत्तर-ड-तेलुगू
नाते स्पष्ट करणारे वरील शब्द जसे कन्नडमधे आहेत तसे तेलगुमधे देखील आहेत. नातेदर्शक शब्दांमधे दोन्हींमधे बरेच साम्य आहे.मराठीवर जसा कन्नडचा प्रभाव आहे तसा तेलगुचा देखील आहे.
प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन
डाॅ. अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषापंधरवडा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🚩 ज्ञानभाषामराठीपंधरवडा🚩
#वाचनीय
हिमनदी (Glacier)
२०१३ मध्ये उत्तराखंडातल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळ्यात लक्षात राहिले ते केदारनाथ या उंच हिमालयात वसलेल्या तीर्थक्षेत्रात त्याहून उंचीवर असलेल्या चोराबरी ग्लेशिअरचा तलाव फुटून झालेलं अतोनात नुकसान. चोराबरी ग्लेशिअर अनेकांनी ऐकलं नसेल पण दुसरे एक उदाहरण आपल्या जास्ती परिचयाचं आहे, ते म्हणजे सियाचीनचे
ग्लेशिअर.
ग्लेशिअर म्हणजेच हिमनदी. गुरुत्वाच्या प्रभावाखाली सावकाशपणे वाहणाऱ्या बर्फाच्या प्रचंड मोठ्या राशीला हिमनदी म्हणतात.
हिमनदीत अनेक वर्षे साचलेले व घट्ट झालेले हिम असून त्याच्या वजनाने अखेरीस त्याचे खालचे थर दाबले जाऊन बर्फ बनलेला असतो. जमिनीवरून वाहताना हिमनदीमुळे जमीन खरवडली जाते आणि जुन्या भूमिरूपांचे क्षरण (झीज) होऊन नवी भूमिरूपे तयार होतात. हिमनदीची जाडी काही मीटरपासून ३,००० मी. वा अधिक असते.
हिमनद्यांचे प्रकार:
हिमनद्यांचे वर्गीकरण त्यांचे आकारमान व आकार यांनुसार करतात.
हिमस्तर ही घुमटाकार हिमनदी असून तिचे क्षेत्रफळ ५०,००० चौ. किमी.पेक्षा जास्त असते. हिमस्तरातील बर्फ मध्यवर्ती एका वा अधिक घुमटांपासून बाहेरच्या दिशेत सावकाशपणे वाहत असतो.
सुमारे ५०,००० किंवा त्यापेक्षा कमी चौ.किमी. क्षेत्र व्यापणाऱ्या घुमटाकार हिमनदीला हिमटोप म्हणतात.
काही उंच पर्वतीय क्षेत्रांत ⇨ हिमगव्हरा त हिमनद्या तयार होतात. हिमगव्हर म्हणजे वाडग्याच्या आकाराची खोलगट सर्व बाजूंनी भिंतींनी वेढलेली जागा असून तिच्या भिंती प्रपाती (तीव्र उताराच्या) असतात. हिमगव्हरापुरत्या मर्यादित असलेल्या लहान हिमनदीला हिमगव्हर हिमनदी म्हणतात.
दरी हिमनदी म्हणजे बर्फाचा लांब, अरुंद प्रवाह असून तो डोंगराच्या दरीपर्यंत खाली वाहत जातो. जगातील पर्वतीय प्रदेशांत दरी हिमनद्या आढळतात.
काही दरी हिमनद्या पर्वताच्याबाहेर अधिक व सपाट जमिनीवर वाहत जातात. दरीच्या भिंतीचे बंधन नसल्याने हिमबर्फ पसरतो व गोलाकार पिंड वा राशी तयार होते. तिला गिरिपद (गिरिपाद) हिमनदी म्हणतात.
हिमनदीची निर्मिती:
ज्या प्रदेशांत वर्षभर जमिनीवर थोडे हिम असते, अशा प्रदेशांत हिमनद्या तयार होतात. हे हिम शेकडो वा हजारो वर्षे स्तरांमध्ये साचलेले असते. अखेरीस हिमाच्या वरच्या थरांच्या वजनाने खालचे थर दाबले जाऊन बर्फाच्या बारीक गुलिका बनतात. त्यांना कण हिम वा हिम-बर्फ गुलिका म्हणतात. अधिक खोलीवर वजनामुळे कण हिमावर आणखी दाब पडून घनरूप बर्फ तयार होतो. हिमाचे कण हिम व बर्फ यांत परिवर्तन होताना गोठलेली राशी अधिक दाट होते. पुरेशा दाबामुळे बर्फ वाहायला सुरुवात होऊ शकते आणि या राशीची हिमनदी बनते.
आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि आल्प्स क्षेत्रातल्या तुलनेनी भारतातल्या हिमालयीन भागातल्या हिमनद्यांचा अभ्यास झालेला नसल्यामुळे त्यांविषयी फारसी माहिती नाही. सगळ्यात मुख्य समस्या म्हणजे ह्या सगळ्या हिमनद्या १२,०००-१४,००० फुटांच्यावर आहेत आणि तिथे पोहोचणेच मुळात जिकीरीचे काम असते. पण हिमनद्यांचा अभ्यास होणे पर्यावरणीय कारणांकरता जरुरी आहेच पण त्याहून महत्वाचे म्हणजे हिमालयातील हिमनद्या वितळून उगम पावलेल्या छोट्या मोठ्या सगळ्या नद्या भारतीय उपखंडातल्या जवळ जवळ ४०% जनतेचे पोषण करतात.
भूशास्त्रीय सर्वेक्षण विभागाने (Geological Survey of India) भारतीय हिमालयात एकूण ९,५७५ हिमनद्या असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी २६७ आहेत ज्या १० वर्ग कि.मी. हून जास्ती मोठ्या आहेत.
संदर्भ: मराठी विश्वकोश
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/23-2015-02-10-05-01-37/11240-2015-11-10-05-17-48?showall=&limitstart=
हिमनद्यांवरचा लेख: http://earthjournalism.net/stories/india-to-monitor-all-large-himalayan-glaciers
संकलन:- निवेदिता खांडेकर
समूह: ज्ञानभाषा मराठी मुख्य समूह
प्रशासक, ज्ञानभाषा मराठी, विदर्भ विभाग
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩
विज्ञानकथा
हीट'लर
माझं नाव आहे ‘हीट’लर! नाही, तो ओठांवर छोटीशी मिशी राखणारा, कुप्रसिद्ध हिटलर मी नव्हे, पण माझं नाव मात्र त्याच्यावरून ठेवण्यात आलंय.
इथे- या रेस्तराँमध्ये येण्याआधी आणि ‘हीट’लर असं नामकरण होण्याआधी मी संशोधक होतो. तेव्हा माझं नाव होतं, डॉ. विक्रांत सदावत्रे.
‘हीट’लर काय किंवा डॉ. विक्रम सदावत्रे काय, त्याने काय फरक पडतो? नावं बदलल्याने आपलं अस्तित्व थोडीच बदलणार असतं? ते आपल्याला जसं असेल तसं निमूटपणे स्वीकारावंच लागतं. पण या शेजारच्या खिडकीत कबूतर घुमू लागलं की, माझी कर्मकहाणी सांगण्याची उबळ मला
अनावर होते..
0 0 0
मला तो दिवस अजूनही जसाच्या तसा आठवतो- माझ्या वाढदिवसाचा.
एखाददुसरा एसएमएस वगळता शुभेच्छा देणारं कोणी नसल्याने त्या दिवशी सकाळी उठल्यावर मी माझं मलाच ‘हॅप्पी बर्थडे’ म्हणून विश केलं होतं. नंतर आन्हिकं उरकून माझ्याकडच्या रोबोटिक मायक्रोवेव्हला एक ग्रिल्ड सँडविचची मी ऑर्डर दिली.
‘येस सर,’ अशा खास यांत्रिक आवाजात त्याचं उत्तर आलं.
मी सायन्सचा विद्यार्थी असलो तरी मला तत्त्वज्ञान, अध्यात्म या विषयांतही खूप रस आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की, या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गायी असल्या तरीही आपण त्या सगळ्यांना ‘गाय’ असं म्हणतो. कारण त्या सगळ्यांमध्ये एक मूळ मूलभूत तत्त्व-‘गो-तत्त्व’सारखं असतं. या तत्त्वामुळे बाह्य़ांगी वेगळी असली तरी ती मुळात गायच ठरते.
यावर मी जरा खोलात विचार केल्यावर मला असं वाटलं की, हे गो-तत्त्व म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो तसंच काहीतरी तर नसेल..? असंही म्हटलं जातंच की, मुळात आत्मा तसाच राहतो, फक्त त्याचे कपडे म्हणजेच शरीरं बदलतात.. आणि यावरूनच माझ्या डोक्यात हा जैवरूपांतरणाचा किडा घुसला! या मूलभूत तत्त्वांच्या अदलाबदलीचा. तेव्हापासून मी स्वत:ला या विषयासाठी वाहून घेतलं. आणि आज चाळिसाव्या वाढदिवशी प्रत्यक्ष प्रयोगाचा दिवस येऊन ठेपला होता!
माझ्या प्रयोगासाठी मी एक दिसायला साधंच मशीन तयार केलं होतं. त्यात एका मोठय़ा बॅटरीसारख्या दिसणाऱ्या बॉक्सच्या दोन बाजूला वायरने जोडलेले दोन पितळी डबे होते. बॉक्सवर मशीन चालू-बंद करण्यासाठी काही बटणं होती.
आपण म्हणजे पूर्णत: रासायनिक क्रिया-अभिक्रिया असतो, या तत्त्वाचा वापर माझ्या प्रयोगात मी करणार होतो. सजीवांमधलं ते मूलतत्त्व म्हणजेही विशिष्ट रासायनिक क्रियांची साखळीच असणार, हे गृहीत धरून मी ही साखळी विशिष्ट प्रक्रियांद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतरित करणार होतो. आणि मग ती दुसऱ्या शरीरात वाहून नेऊन मूळ रूपात पुन्हा कार्यान्वित करणार होतो.
‘सँडविच तयार आहे,’ मायक्रोवेव्हने सांगितलं.
प्रयोग सुरू करण्यासाठी मी पिंजऱ्यातून कबूतर आणि कुत्र्याचं पिल्लू बाहेर काढून त्यांना त्या-त्या पितळी डब्यात ठेवलं. प्रयोग यशस्वी झाला असता तर कुत्र्यात कबूतराचं मूलतत्त्व आलं असतं नि ते पिल्लू उडू शकलं असतं; तसंच कबूतराला भुंकता आलं असतं! म्हणजे मग असं करून माणूस उडू शकला असता, पोहू शकला असता.. कदाचित मरणाऱ्या माणसाला रूपांतरण करून नवं शरीर देता आलं असतं..! अनेक गूढ प्रश्नांची उकल करता आली असती.. मी थरारून गेलो!
मशीन सुरू केल्यावर त्यातून घुर्रघुर्र असा आवाज आला.. मी एकटक त्या मशीनकडे पाहात होतो. थरार, उत्कंठा, भीती अशा मिश्र भावनांचा कल्लोळ माझ्या मेंदूत उठला.
‘सँडविच तयार आहे,’ मायक्रोवेव्हने पुन्हा सांगितलं.
काही मिनिटांनी मशीनमधून सुई-सुई असा आवाज येऊ लागला. पितळी डब्यांभोवती चंदेरी आभा पसरली. मग मशीन सुईसुर्र.. पीपीपॉपॉ.. सुईसुर्र.. असा कर्कश आवाज करू लागलं, जणू ते केकाटत होतं! काहीतरी अघटित घडणार असं वाटून मी मशीन बंद करणार तोच त्या बॉक्समधून विजेची एक शलाका अंगावर आली.
‘सँडविच तयार..’
मला वेगवेगळ्या रंगांचे मोठे मोठे होणारे गोल दिसू लागले, मग शॉक लागल्यासारखी एक लहर सर्वागातून सरसरत गेली.. माझी शुद्ध हरपली..
जाग आल्यावर जाणवलं की, मी आक्रसलोय, माझे हात-पाय, मान, डोकं, गायब झालंय.. मग कळलं की, मी चौकोनी पेटी- एक मायक्रोवेव्ह झालोय.
0 0 0
खरंच, मी मायक्रोवेव्ह झालो होतो. माझ्या पोटात एक काचेची फिरणारी तबकडी होती. बाह्य़ांगावर एक स्क्रीन होता, त्यावर पिवळ्या रंगात सूचना, वेळ दिसायची. आज्ञा ऐकू येण्यासाठी एक मायक्रोफोन आणि बोलण्यासाठी स्पीकर होता. मला जोडूनच असलेल्या एका पेटीत ब्रेड, चीझ, भाज्या असा कच्चा माल भरून ठेवलेला होता.
मी घाबरलो होतो.
‘पूर्ववत होण्यासाठी मशीन तर चालू केलं पाहिजे, पण कसं? कारण आता आपल्याला हातच नाहीयेत? पण आपण विचार करू शकतोय म्हणजे आपला मेंदू शाबूत आहे, हे एक बरंय!’ थोडा अधिक शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं, ‘मायक्रोवेव्हचं प्रोग्रॅिमग नीट लक्षात घेतल्यास त्यात फेरफार करून काहीतरी करता येईल.’
0 0 0
घराचा दरवाजा उघडला गेला. माझ्या घरी काम करणारी मोलकरीण-बिबाबाई आली होती. कामात व्यत्यय नको, म्हणून मीच तिच्याकडे घराची एक किल्ली दिली होती. ती यायची आणि काम करून जायची.
बिबाबाईचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी म्हणालो, ‘मिसेस् बिबाबाई, तुमचं सँडविच तयार आहे!’ प्रोग्रॅमिंगअजून मला ताबा मिळवता आला नसला, तरी आत्ता लक्ष वेधण्यासाठी हे पुरेसं होतं.
बिबाबाईने इकडे-तिकडे पाहिलं, मग दुर्लक्ष करून ती आत गेली. मी आपला तसाच चरफडत राहिलो.
दहा-पंधरा मिनिटांनी ती साफसफाई करण्यासाठी माझ्याजवळ आली. मी पुन्हा यांत्रिकपणे भडाभडा बोललो, ‘बिबाबाई.. मला मुक्त करा, त्या बॉक्सवरचं बटण दाबा..’ हेच वाक्य दोनदा पुन:पुन्हा म्हणालो. तशी बिबाबाई माझ्याकडे पाहू लागली. ती गांगरली, भांबवली होती. तिने माझी वायर हलवली. तिने माझ्याकडे, मग मशीनकडे, कबूतराकडे आणि पिल्लाकडे पाहिलं. तिला काय वाटलं कुणास ठाऊक; तिने झटकन मशीनचं बटण दाबलं. पुन्हा तसाच सुईसुई, पीपीपॉपॉ आवाज येऊ झाला, आणि एक विजेचा शलाका उठली!
0 0 0
बिबाबाई गायब झाली होती.
मशीनजवळ एक कबूतर होतं. ते गुटर्गू करत भांबावल्यागत खिडकीतून निघून गेलं.
मला अतीव दु:ख झालं होतं. माझ्या प्रयोगांमुळे इतर कोणाला त्रास व्हायला नको म्हणून मी मुद्दामहून सगळ्यांपासून दूर, एकटय़ाने माझं संशोधन करायचो. म्हणून मी लग्नही केलं नव्हतं! पण आज मात्र माझ्यामुळे एका माणसाच्या आयुष्याची वाट लागली होती.
बिबाबाईचा नवरा मेला होता आणि तिच्या दोन लहान मुलांची सगळी जबाबदारी तिच्यावर होती. आता त्या मुलांचं काय होईल, ते आईला कुठे शोधतील..?
मग मी निश्चय केला, ‘काही झालं तरी यातून बाहेर पडायचं आणि बिबाबाईला शोधून काढायचंच.’ पण प्रश्न होता, ‘कसं?’ कारण, आता घरी येणाऱ्यांपकी कोणीही नव्हतं. बिबाबाई हीच काय तो बाहेरच्या जग आणि मी यातला एक दुवा होता.
मला एक आयडिया सुचली. मुद्दामहून ब्रेड जाळण्याची. जेणेकरून माझ्यातून धूर येऊन तो खिडकीतून बाहेर जाईल आणि त्यामुळे शेजारा-पाजाऱ्यांचं लक्ष जाईल.
मी तसं केलं. काही मिनिटांतच माझ्या डोक्यावरच्या आउटलेटमधून गरम हवा बाहेर पडू लागली.. १५-२० मिनिटांनी करडा धूर बाहेर पडू लागला.. अर्ध्या तासाने धूर काळा झाला, पण कोणीही येईना किंवा काही गडबड ऐकू येईना. पण तासाभराने खिडकीतून येणारा धूर पाहून सोसायटीचा वॉचमन वर आला. त्याने लागलीच अग्निशामक दलाला कळवलं आणि घर फोडून आलेल्या माणसाने सर्वप्रथम माझा स्विच बंद करून माझी बोलतीच बंद केली!
त्यानंतर पोलिसांत मी आणि बिबाबाई हरवल्याची तक्रार केली गेली. माझ्या घरीच तिची पिशवी सापडल्याने आमच्याबद्दल अनेक अफवा उठल्या, बातम्याही छापून आल्या.. आणि थोडय़ाच दिवसांत आम्ही विस्मरणातही गेलो!
माझ्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ते मशीन आणि इतर गोष्टी जप्त केल्या. ते मशीन आता कुठेतरी भंगारात असेल किंवा नष्टही झालं असेल किंवा कोणाला तरी ‘गायब’ करत असेल..
0 0 0
पोलीस स्टेशनात मी नुसताच पडून होतो, पण एकदा एका हवालदाराने साहेबांना मस्का मारला आणि मला साफसूफ करून घरी नेलं. मायक्रोवेव्ह आणल्याचं पाहून त्याची बायको जाम खूश झाली. कारण त्यांच्या बिल्डिंगमध्ये आता फक्त तिच्याकडे मायक्रोवेव्ह होता. त्यामुळे बढाई मारता येणार होती. पण थोडय़ाच दिवसांत मी तिला नकोसा झालो. कारण मी मुद्दामहून पदार्थ जाळायचो. मग ती नवऱ्याकडे कटकट करायची, ‘काय पण मेलं मशीन; तुमच्यासारखंच आहे-तापट!’
एकेदिवशी वैतागून हवालदाराने मला भंगारात काढलं. पण किरकोळ बिघाड वगळता बाकी कामाचा आहे असं भंगारवाल्याला लक्षात आल्याने त्याने मला विकून टाकलं.
मला विकत घेणारा होता, या रेस्तराँचा मालक. त्याने तेव्हा नवीनच रेस्तराँ सुरू केलेलं, त्यामुळे स्वस्तात विकत घेऊन टाकलं मला. तेव्हापासून मी असा-इथे आहे.
‘हीट’लर, एक चीझ ग्रिल सँडविच!’
मी खूप तापतो, वाट्टेल ते बडबडतो म्हणून मला सगळे आचारी ‘हीट’लर म्हणतात आणि मी जास्त तापायच्या आधीच माझा स्विच बंद करून टाकतात!
आता मला या सगळ्याची सवय झालीय. पण इथे-माझ्या बाजूला असलेल्या खिडकीवर कबूतर करुण आवाजात घुमू लागलं ना की, वाटतं, ती बिबाबाई तर नसेल?
-प्रणव सखदेव
sakhadeopranav@gmail.com
संदर्भ : दै. लोकसत्ता १२ एप्रिल २०१५.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment