🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩
शिकण्यासाठी सक्षमता
लेखक~डॉ रमेश पानसे
शिक्षणाच्या अनुषंगाने शाळा, शिक्षक यांविषयीची चर्चा नेहमीच होत असते. पण पालकत्वाला केंद्रीभूत मानून शिक्षणाचा विचार होत नाही. पालकांनी ठरवले, तर शाळेवर वा ‘मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जा’वर अवलंबून न राहता मुले शिक्षणासाठी सक्षम होऊ शकतात,अशी भूमिका मांडणारे टिपण..
मुले आणि त्यांचे आई-वडील हा एक नैसर्गिक संबंध असतो. नैसर्गिकतेने मूल जन्माला येते आणि संबंधित स्त्री-पुरुषाचे रूपांतर ‘आई-वडील’ या नात्यात होते. आपल्या मुला-मुलींचे लालन, पालन व पोषण करण्याची व्यावहारिक जबाबदारी मात्र निसर्ग आई-वडिलांच्या पदरात टाकतो. हे कसे करावे, याविषयीचे काहीसे ज्ञान आजूबाजूचा समाजाकडून येते; आणि मुले आपापल्या कुटुंबात वाढू लागतात.
मुलांचा जन्म ही जशी एक नैसर्गिक घटना आहे तशीच मुला-मुलींची होत जाणारी वाढ ही देखील निसर्गनियमांनी ठरवून दिलेली असते. मुलांची होणारी शारीरिक वाढ, त्यांच्या विकसित होत जाणाऱ्या क्षमता तसेच त्यांना हळूहळू येत जाणारी शारीरिक कौशल्ये व भाषा, या साऱ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातात, ही सर्वच आई-वडिलांना माहीत असलेली, त्यांच्या नित्य ओळखीची अशी बाब आहे. सहजपणे घडत जाणाऱ्या या बाबी सर्वाच्या परिचयाच्या असतात.
या सर्व नैसर्गिक वाढीच्या एका विशिष्ट टप्प्याला मूल समाजाने ठरवून दिलेल्या अशा ‘शिकण्या’च्या वयात पदार्पण करते तेव्हा, मुलाचे रूपांतर ‘विद्यार्थ्यांत’ होते आणि आई-वडिलांचे रूपांतर ‘पालकां’मध्ये होते. आणि मग आपल्या मुलांची बौद्धिक प्रगती, बौद्धिक वाढ हे विषय पालकांना जवळिकीचे व चिंतेचे वाटू लागतात. या, मुलांच्या औपचारिक (म्हणजे, ज्याच्या आशय आणि पद्धती समाजाने निर्धारित केलेल्या आहेत अशा ) शिक्षणाच्या टप्प्याला पालक अधिक जागरूक होतात. मुलांचे लालन, पालन, पोषण यांच्याबरोबर शिक्षणाची नवीन जबाबदारी पालकांवर येऊन पडते; आणि मग आपल्याला मुलांकडे ‘विद्यार्थ्यांच्या’ अंगाने ते पाहू लागतात. चांगले शिक्षण, चांगली शाळा, शिक्षणाचे माध्यम, शाळेचे शुल्क, गणवेश, क्रमिक पुस्तके, शाळेत नेण्या-आणण्याच्या व्यवस्था, शाळेतील स्पर्धा,परीक्षा, निकाल, हुशारपण असे विषय पालकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. याचवेळी आणखीही दोन गोष्टी, बऱ्याचदा पालकांच्या नकळतच, पालकांच्या मनाचा ताबा घेऊ लागतात. एक म्हणजे, आपला पाल्य हा इतर मुलांच्या तुलनेने आजमावण्याची सवय त्यांना लागते. म्हणजे आता त्यांना आपला मुलगा नुसता हुशार नको असतो, तर तो इतरांच्या तुलनेने- इतर मुलांपेक्षा अधिक- हुशार हवा असतो. दुसरे म्हणजे, आत्ताच्या पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याची स्वप्ने पडू लागतात; आणि पाल्याबाबतच्या अपेक्षांची पालवी त्यांच्या मनात फुटू लागते. या दोन्हींतून पालकांची आपल्या पाल्याकडे पाहण्याची दृष्टी घडू लागते. मुले ही आई-वडिलांच्या अशा आकांक्षांची प्रतीके बनू लागतात. आणि हे कसे सारे सहजपणाने घडून येते. पालकांनी ठरविलेल्या दिशेने मुलांची प्रगती व्हावी यासाठी केवळ पालकांची जंगी धडपड सुरू होते. ठराविक दिशेने मुलांना नेण्याची जबाबदारी पालक घेऊ लागतात; आणि साहजिकच स्वतला ‘जबाबदार पालक’ मानतात.
इथे खरी मुलांची ‘विद्यार्थी’ म्हणून होणारी परवड सुरू होते. जोवर मुले लहान असतात, आई-वडिलांवरच खूपशी अवलंबून असतात, तोवर पालक व पाल्य यांच्या संबंधात फारसे वितुष्ट येत नाही. परंतु मुले बाल्यावस्थेतून बाहेर पडून कुमार वयात शिरतात, पुढे युवावस्थेत पदार्पण करतात, तेव्हा असे वितुष्ट यायला सुरुवात होते. मुले जेव्हा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतच्या मनाचा ताबा स्वतकडे घेऊ लागतात, त्यांना स्वतंत्र विचाराची पालवी फुटू लागते आणि स्वतचे हित स्वत पाहण्याची ओढ निर्माण होते; याच काळात मुलांना उपजत असलेल्या बुद्धिमत्ता (ज्या पुढे जाऊन मुलांचा पेशा ठरविणार असतात.) त्यांना आपल्याकडे आकर्षति करून घेऊ लागतात. मुलांचा कल, मुलांची आवड आणि यांची दैनंदिन शिक्षणाची सांगड घालण्याचा प्रयत्न मुले प्रामाणिकपणे करू लागतात. जिथे ही सांगड नीटपणे घातली जाते, तिथे मुले जुळवून घेतात. पण जिथे ही सांगड घातली जात नाही तिथे मुले बंड करतात, अथवा त्यांच्यापासून पळ तरी काढतात. पालकासाठी पेचाचे प्रसंग उद्भवतात.
कुटुंबातील शैक्षणिक वातावरणाचे हे सर्वसामान्य चित्र आहे. जागरूक, जबाबदार पालक आपापल्या कुटुंबापुरते हे चित्र बदलू शकतात. त्यासाठी त्यांना जरा वेगळ्या वाटेने जावे लागेल. त्यासाठी काही वेगळा विचार करावा लागेल; वेळप्रसंगी काही शिकावेही लागेल. त्यांना हे समजावून घ्यावे लागेल की, आई-वडील होणे ही नैसर्गिक घटना आहे तर पालक होणे ही एक सामाजिक घटना आहे. मुले शालेय शिक्षण घेऊ लागतात तेव्हा पालकांना दोन गोष्टी शिकाव्या लागतात. एक, शिकणारे मूल असते कसे? ते शिकते कसे? शिकताना त्यांच्या बौद्धिक गरजा काय असतात? भावनिक गरजा काय असतात? वाढते वय आणि वाढते शिक्षण यांचा परस्पर संबंध आणि त्यातच टप्प्याटप्प्याने होत जाणारा स्वभावातील बदल, यांची नेटकी कल्पना पालकांना असायला हवी. थोडक्यात असे की, पालकांना, शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर असणारे मूल समजावून घायला हवे. दुसरे असे की, मुलांना कोणते शिक्षण कोणत्या माध्यमातून केव्हा कसे आणि का घ्यायचे असते? मुलांच्या उपजत बुद्धिमत्तांना, त्यांना मध्यवर्ती स्थान देऊन, शिक्षणात त्याचे ज्ञान, त्याची कौशल्ये, कशी मिळतील? कुठे मिळतील? आपल्या पाल्याचे शिक्षण इतर मुलांपेक्षा काही वेगळे असेल काय? त्यातून त्याचा पेशा कसा ठरेल? समाजातील यशस्वी पेशांचे शिक्षण मुलांना घ्यायचे की, मूल यशस्वी ठरेल अशा पेशाचे शिक्षण मुलांना द्यायचे? या आणि अशा कित्येक प्रश्नांच्या वाजवी उत्तरांसाठी पालकांनी शिक्षण घेणे, हे खास शिक्षण घेणे गरजेचे आहे. तशा व्यवस्था म्हणजे पालक- शिक्षणाची केंद्रे अजूनही आपल्याला समाजात नाहीत. या व्यवस्था जोवर निर्माण होत नाहीत तोवर आपल्या शिक्षणाची जबाबदारी पालकांनाच घ्यावी स्वतच लागेल.
आपल्या मुलांना, त्यांच्या शिक्षणात खूप मदत व्हावी असे जर पालकांना वाटत असेल तर, त्यांचा पाल्य कोणत्याही वयाचा आणि शिक्षणातील कोणत्याही पायरीवर (प्राथमिक शाळेत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इ.) असो, त्याच्या शिक्षणाबाबत काही मूलभूत गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात, त्या अशा:
(१) सर्वच मुले आपली आपण शिकू शकतात; आणि मुख्य म्हणजे शिकायला उत्सुक असतात. त्यामुळे शिकण्याच्या संधींच्या सागरात खुशाल मुलांना यथेच्छ पोहू द्यावे. असे केल्याने मुले भरपूर शिकतात; आणि मुख्य म्हणजे स्वतहून शिकायला शिकतात. याचा त्यांना कुठल्याही क्षेत्रात आणि पुढील आयुष्यात उपयोग होतो.
(२) सर्वच मुलांना सतत नवे नवे शिकायला आणि काहीतरी शोध घेऊन शिकायला आवडते. आपल्या शाळा, आपली महाविद्यालये विशिष्ट अभ्यासक्रम व त्यावरील लेखी परीक्षा या जंजाळात अडकून राहिल्यामुळे, अशा शोधांच्या नित्य नूतन संधी त्या मुलांना देऊ शकत नाहीत. पालक, नेमकी इथे मुलांना चांगली मदत करू शकतात. शाळेबाहेरचे अफाट विश्व म्हणजे विराट प्रमाणावरील शोधसंधींचा खजिनाच आहे. आपल्या मुलांना शाळेबाहेरच्या शिक्षणसंधी घ्यायला प्रवृत्त करता येते.. नव्हे, प्रयत्नपूर्वक केले पाहिजे.
(३) अनुभवांतून शिकणे, नवे नवे विविधांगी अनुभव घेऊन शिकणे, हीच खरे तर शिकण्याची एकमेव पद्धत आहे. शाळा-महाविद्यालये आपल्या मर्यादित व बंदिस्त चौकटीत, विविध अनुभवांची धमाल उडवून मुलांचे शिक्षण प्रभावी करणारे काम करू शकत नाहीत. पण शाळा महाविद्यालये पुरवू शकत नाहीत अशा कितीतरी संधी घरे पुरवू शकतात. स्वतचे घर- कुटुंब हे शिक्षणाचे सर्वात चांगले व संपन्न असे प्रभावी केंद्र असू शकते. पालकांनी ते कसे असू शकते. याचा स्वतच शोध घ्यायला हवा. शाळांतील शिक्षणाला घरातील अनुभवांधारितशिक्षणाची जोड द्यायला हवी.
(४) सामान्यत आपण असे मानतो की, मुलांचे शिक्षण हे केवळ बौद्धिक काम आहे. त्यामुळे, मुलांच्या बुद्धिची वाढ, बुद्धीवाढीसाठी वेगवेगळे उपाय किंवा बुध्यांकाचा अंदाज घेणे अशा अनेक गोष्टी पालकांच्या मनात व व्यवहारात असतात. मुख्य समजावून घायची गोष्ट अशी की, बुद्धी ही एकटी नसते. बुद्धी आणि भावना यांची कायमच निसर्गाने बांधून ठेवलेली जोडगोळी ती असते. त्यामुळे बुद्धीबरोबर आणि बुद्धिविकासासाठीही मुलांच्या भावनांची नेहमीच कदर राखावी लागते. मुले प्रसन्न भावनेने शिकत असतील तर ती एकाग्र होऊन शिकतात. आणि चांगले मन लावून शिकायला मिळाले तर आनंदी होतात. त्यांच्या बुद्धीचा विकास आपसूकच व वेगाने होतो. आपण आपल्या मुलांना प्रसन्न, समाधानी, आनंदी ठेवण्याचा विचार कितपत करतो? केवळ ‘अभ्यास’ या आग्रहापोटी त्यांची आनंद उभारी तर आपण मारत नाही ना?
(५) भावनांचा विचार केवळ शिकण्याशी संबंधित नाही, तो अधिक करून आपल्या जीवनाशीच संबंधित असतो. मुलांना दुसऱ्यांच्या भावना ओळखून, समजावून घेऊनच आयुष्यभर समाजात वावरायचे असते. त्यावरच समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. तसेच, व्यवहारात वेळोवेळी आपल्याला मन आवरून वावरावे लागते. अशावेळी, स्वतच्या भाव-भावनांचे नियंत्रण करण्याचे कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे असते. परंतु या महत्त्वाच्या गोष्टींचे शिक्षण शाळा-महाविद्यालये त्यांच्या मर्यादांमुळे देऊ शकत नाहीत; त्यामुळे ही जबाबदारी सुद्धा पालकांनी आपापल्या कुटुंबामध्ये घ्यायला हवी. कशी घ्यायची? पालकांनी स्वतच शोध घ्यायला नको का?
सूज्ञ पालक हे नेहमीच, आपल्या पाल्यांच्या केवळ परीक्षांतील यशाचाच विचार करून थांबत नाहीत. ते आपल्या पाल्यांच्या अधिक सक्षम, अधिक संपन्न, अधिक समाजोपयोगी अशा जीवनाचा विचार करतात.
शिकण्याची प्रक्रिया ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असते. तिच्यासाठी सक्षम करणे, म्हणजे मुलांचे शिक्षण करणे होय! तसे आपण करू शकलो तर आपण आपले पालकत्व पूर्णाशाने निभावले असे म्हणता येईल !
लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत
संदर्भ~loksatta.com
संकलन - वृषाली गोखले
गट -रायगड
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
आज १५ जानेवारी!
मराठी भाषा पंधरवड्याचा शेवटचा दिवस.
गेल्या १५ दिवसांत पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या विविध whatsapp गटांवर *ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान* ने वेगवेगळे उपक्रम घेतले, या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत. या उपक्रमांतर्गत घेतलेल्या परीक्षांचे निकाल पुढीलप्रमाणे :-
टंकलेखन स्पर्धा - पूर्ण देशात स्मार्टफोनवर सर्वात जास्त मराठीतून लिहिले जाते. हे प्रमाण अजून वाढावे, प्रोत्साहन मिळावे याकरता ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
[गुगल फॉर्म मार्फत परीक्षा घेण्याची सुविधा करून दिल्याबद्दल गुगलचे आभार]
निकाल :-
डेस्कटॉप- महेश शेट्टी (इतर)
स्मार्टफोन- मंदार शिंदे (ज्ञानभाषा मराठी - पुणे गट)
निबंध स्पर्धा - निबंध स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष आहे. मराठीत तंत्रज्ञानावर अवांतर लिखाण अतिशय कमी होते आणि हा प्रश्न लक्षात घेऊनच निबंध स्पर्धेचे विषय ठरवले गेले.
१ - मला आवडलेले गॅजेट
२ - मला आवडलेली चारचाकी/दुचाकी
३ - समाज माध्यमे आणि मी
४ - २१ व्या शतकातील शेती
५ - डिजिटल युगातील शिक्षक
पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा स्पर्धा कशा पद्धतीने घेऊन जाता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आलेले सर्व निबंध ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून देण्याकरता ब्रोनाटो सारख्या ईपुस्तक निर्मात्यांची मदत घेण्यात येईल.
हे सर्व निबंध ईमेल मार्फत मागवले गेले होते, याचा प्रचार whatsapp, फेसबुक, ट्वीटर मार्फत करण्यात आला. या सर्व संबंधित apps चे मनापासून आभार.
निकाल :- २६ जानेवारी.
मराठी प्रश्नमंजुषा - या उपक्रमात एकूण ३ प्रश्नमंजुषा घेतल्या गेल्या. यावेळी प्रथमच व्याकरणावर भर न देता, आकलनावर भर देत इंग्रजीच्या शालेय परीक्षा/शिष्यवृत्ती परीक्षा ज्याप्रमाणे सेट केल्या जातात साधारण त्याप्रमाणे मराठी उतारे आणि कविता देऊन त्यावरील प्रश्नोत्तरे/संबंधित प्रश्न विचारले गेले. यासाठी प्रभाकर खाडिलकर, तुषार जोशी, डॉ. अमेय गोखले, ओमकार करंबळेकर यांच्या साहित्याचा वापर करण्यात आला. या स्वरूपात अजून काय सुधारणा करता येतील याबाबत विचार केला जाईल. तिसरी प्रश्नमंजुषा राजभाषा मराठी अधिनियामाबाबत होती, जेणेकरून मराठीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना नियम समजतील आणि असे सर्व नियम दाखवून मराठीचे प्रश्न धसास लावण्याकरता त्यांच्याकडे कायदेशीर माहिती उपलब्ध असेल.
[या सर्व प्रश्नमंजुषा गुगलफॉर्मवर घेतल्या गेल्या]
निकाल:-
प्रथम प्रश्नमंजुषा - रोहिणी बागुल - ज्ञानभाषामराठी
गुण- २९/३०
द्वितीय प्रश्नमंजुषा - कीर्ती कर्पूर - इतर
गुण- २५/२५
तृतीय प्रश्नमंजुषा - वर्षा चोपदार - ज्ञानभाषामराठी
गुण - ९/१०
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषापंधरवडा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩
विज्ञानकथा
फोन कॉल
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘कम ऑन यार! तुला माहितेय- मला या मशीनशी बोलायला नाही आवडत. कितीदा सांगितलं सेलफोन वापरत जा. बर्थडेला मी तुला सेलफोन गिफ्ट करतोय आणि तो तू वापरणारेस. ओके? नो मोर डिस्कशन! आणि हो, आज मी घरी लेट येईन. फायनल रीडिंग्ज घ्यायच्यात. बाय. लव यू!’
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थॅंक यू!’
‘हॅल्लोऽऽऽऽ, एकदम एक्स्पेक्टेड रिझल्ट्स मिळालेत. एक बिग सरप्राइज आहे! आज रात्री सेलिब्रेट करूया! लवकर परत ये. मीपण पोहोचेन अध्र्या तासात घरी. ओके? लेट्स सेलिब्रेट युहूऽऽऽऽऽ!’
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थॅंक यू!’
‘ए नको ना करूस असं! उचल ना फोन! का वागतेस अशी? मला माहितेय- तिथेच आहेस.. मुद्दाम उचलत नाहीयेस. का चिडलीयस? बोल ना नीट. माहितेय ना- तू नीट नाही बोललीस की माझा मूड पण बिघडतो मग सगळा. किती खूश होतो मगाशी माहितेय? डिमेंशन फोल्ड फायनली शोधून काढलाय मी. आता एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाणं शक्य होईल- माहितेय? प्लीज- फोन उचल ना..’
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘काय झालंय? तू का चिडलीयस इतकी? आय नो- मी तुझ्या आईशी नीट बोललो नाही काल. सॉरी खरंच! एकतर माझा मूड आधीच ठीक नव्हता; त्यात पुन्हा त्या असं टिप्पिकल बोलत होत्या ना! आय जस्ट हेट- व्हेन शी कॉल्स मी जावईबापू. मला एकदम गांधीजी झाल्यासारखं वाटतं. म्हणतात- नातवाचं तोंड कधी बघायला मिळणार? आई शपथ.. असलं डोकं सटकलं ना! आय मीन- सॉरी. तुझ्या आईची चूक नाही म्हणत मी; पण एकंदरीत आपली मागची जनरेशनच ना..! सगळे डोक्यात जातात. यांचं समाधान नेमकं कशात आहे तेच कळत नाही. शिक्षण झालं की नोकरी, नोकरी मिळाली की लग्न, लग्न झाल्यावर नातवंड.. यापलीकडे काही लाइफ आहे की नाही? मूल काय नुस्तं जन्माला घातलं म्हणजे झालं? त्याचं पुढे सगळं व्यवस्थित व्हायला नको? आपलं ठरलंय ना? सांग ना आईला नीट समजावून. एकतर इथे आपल्यालाच एकमेकांचं तोंड बघायला वेळ नाही; त्यात त्या बाळाचे हाल कशाला? आय नो- मी हेच नीट शब्दांत सांगायला हवं होतं. जरा जास्तच उर्मटपणे बोललो. आम रियली रियली सॉरी.’
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘रात्रीचे साडेअकरा वाजलेयत. मला माहितेय- तू बसलीयस तिथेच. कसला राग आलाय तुला एवढा? तो विशाल तुला काहीतरी सांगतो आणि तू त्यावर विश्वास ठेवतेस? ठीके. मी मान्य करतो- माझं स्नेहावर होतं प्रेम कॉलेजमध्ये असताना. मग त्यात गैर काय? पुढे काही नाही झालं.. मी सोडून दिला विषय. आता त्याच त्या जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या? आता इतक्या वर्षांनी ती अशी अचानक भेटल्यानंतर मला नेमकं कसं रिअॅक्ट व्हायचं, कळलंच नाही. मनात कुठेतरी तिच्याबद्दल काहीतरी वाटत असेल कदाचित अजून- म्हणून बोलत राहिलो तिच्याशी. पण याचा अर्थ असा नाही ना गं, की मी तुला फसवतोय. ती भूतकाळ आहे माझा. मी तो नाही बदलू शकत. मी काय करू आता त्याला? तूच सांग ना आता! तू भांड माझ्याशी. ओरड माझ्यावर. चीड खूप. रागाव हवं तेवढं. पण बोल ना- प्लीऽऽऽज! उचल ना फोन एकदाच. प्लीज, फक्त एकदाच!’
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘हॅलो, प्लीज फोन उचल ना गं! आय नो- मी तुला नेहमी डॉमिनेट करायला बघतो. माझ्या प्रायॉरिटीज् तुझ्या कामांपेक्षा जास्त इम्पॉर्टन्ट आहेत अशा आविर्भावात असतो. माझे विचार तुझ्यावर लादत असतो सारखे.. माहितेय मला. पण मी सुधारतोय ना आता हळूहळू? ऐकतोय की नाही मी तुझं हल्ली? कळतंय, माझं काय काय चुकतंय ते. एकटय़ानेच झालो गं मी लहानाचा मोठा. कुणी भावंडं पण नाहीत. माहितेय ना? सगळेच लाड करायचे माझे. मागितलेलं सगळं मिळायचं. सांगितलेलं सगळे ऐकायचे. कधीच कुठली गोष्ट शेअर करावी लागली नाही कुणासोबत. त्यामुळे खूप मनमानी करायचो पूर्वी.. हे जाणवतंय आता. तू खूप समजून घेतलंस मला नेहमी- आय नो! खूप सहन केलंस माझं मनमानी वागणं. पण कधीच उलटून बोलत नाहीस. कधी चिडली नाहीस. नेहमी शांतपणे सहन करतेस. नंतर कळतं- चूक माझीच होती; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मला कल्पना आहे- खूप चुका केल्यात मी. कुठलंही नातं दोन लोकांनी मिळून टिकवायचं असतं.. आपल्यात ते तू एकटी सांभाळत्येयस. खरंच, इथून पुढे मी नाही वागणार कधी असं. प्लीज, ऐक ना.. फोन उचल ना एकदाच- प्लीज!’
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ’
‘..’
‘हॅलोऽऽऽ’
‘..’
‘कोण बोलतंय?’
‘श.. श्.. श्वेता?’
‘आ.. आकाश?’
‘कशी आहेस?’
‘..’
‘बोल ना.. प्लीज, तुझा आवाज ऐकायला मी.. मी.. किती कॉल केलेत.. माहितेय..?’
‘..’
‘बोल नाऽऽ तुला माहितेय, मी किती फिरलोय तुला शोधायला? रीडिंग्स परफेक्ट आलीयत. वी हॅव मेड इट! फायनली! वी हॅव डिस्कवर्ड डिमेंशन फोल्ड. कन्फ.. कन्फर्मड्!’
‘कुठून.. बोलतोयस.. तू?’
‘आत्ताच आलोय माहितेय इथे. थकलोय गं जाम तुला शोधून! तुला माहितेय- समांतर विश्वात उघडणारा दरवाजा सापडलाय. यू कॅन ट्रॅव्हल अक्रोस द युनिव्हर्स यार! आपण शोध लावलाय याचा. मी हेच सांगायला तुला कॉल केला, पण तू उचललाच नाहीस, माहितेय? मी वेडय़ासारखा शोधतोय तुला ते सांगायला तेव्हापासून. पण तू नव्हतीसच!’
‘म्हणजे? कुठे होते मी.. तेव्हा?’
‘नव्हतीसच गं तू! कुठेच नव्हतीस.. मी घरी परत आलो तुला सरप्राइज द्यायला त्या रात्री.. पण.. तू.. आलीच नाहीस माहितेय.. फक्त एक.. फोन आला.. तू.. हॉस्. हॉस्पिटलमध्ये असल्याचा. अॅक्.. सिडंट झालेला.. तुझा त्या रात्री.. मला सुचेचना काही.. माहितेय? त्यानंतर.. विश्वासच बसला नाही त्या गोष्टीवर. त्यानंतर काही दिवस असेच सुन्न बसून काढले. मग मग एक दिवस ठरवलं- या फोल्डमध्ये शिरायचं.. आणि पोहोचायचं- त्याच दिवशी.. त्याच वेळी.. पण दुसऱ्या विश्वातल्या.. आणि.. आणि फोन करायचा तुला.. तिथून. पण तू उचलायचीसच नाही तिथेही.. ‘मी बाहेर आहे..’ तोच मेसेज ऐकू यायचा- रात्री साडेअकरा वाजताही.. मग मी समजून जायचो.. की तू नाहीस त्या विश्वातही आता. पण मग त्रास व्हायचा खूप.. त्या गोष्टीचा.. मग बोलून टाकायचो जे मनात येईल ते.. तुला जे जे सांगायचं राहून गेलेलं ते सगळं तुझ्या त्या रेकॉर्डेड आवाजालाच सांगायचो.. मग परत शिरायचो या फोल्डमध्ये आणि निघून जायचो दुसऱ्या समांतर विश्वात- त्याच दिवशी, त्याच वेळेला.. तिथे पोहोचल्यावर पुन्हा कॉल करायचो तू उचलशील या अपेक्षेने.. पण.. तोच एक मेसेज ऐकू यायचा दरवेळी. असं वाटलं, की जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा ती सगळ्या समांतर विश्वातूनही निघून जाते कायमची कदाचित.. पण आज तू फोन उचललास.. मला यायचंय आता घरी.. खूप बोलायचंय तुझ्याशी.. मी..’
‘नको! तू.. जा परत. नको येऊस इथे! तू जा परत- जिथून आलायस तिथे.’
‘ए, नको ना बोलूस असं.. मी नेमक्या कुठल्या विश्वातून आलोय हे पुन्हा शोधून काढणं अशक्य आहे गं..’
‘तुला जावंच लागेल आकाश.. कारण.. या विश्वात तू नाहीयेस आता..’
प्रसन्न करंदीकर
Kprasanna.mangesh@gmail.com
संदर्भ : दै. लोकसत्ता २७ सप्टेंबर २०१५
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩
*१५/१/२०१८
🧐मूळ भाषेतील शब्द शोधा🧐
उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण
प्रश्न १- 'मनला' ,'इरूध' हे शब्द कोणत्या बोलीतील आहेत?
अ)कारवारी
ब)बालाघाटी मऱ्हेटी
क)धनगरी
ड)कोष्टी
उत्तर-ब-बालाघाटी मऱ्हेटी
बालाघाटच्या परिसरातील मऱ्हेटी बोली हिंदी भाषेच्या प्रभावाखाली दिसते.पण काही रूपे वऱ्हाडीच्या जवळ जाणारी देखील दिसतात.'मनला'म्हणजे म्हणाला आणि 'इरूध'म्हणजे विरूद्ध.या बोलीमधे मात्र वाक्यातील लिंगभेदाचा थोडा घोटाळा आहे.
प्रश्न २- 'घोळा', 'ईर' हे शब्द कोणत्या बोलीतील आहेत?
अ)चंद्रपुरी वऱ्हाडी
ब)कमारी
क)गोवारी
ड)झारपी
उत्तर-ड-झारपी
एलिचपूर जिल्ह्यातील काही थोडे लोक वऱ्हाडीच्या जवळपास येणारी ही बोली बोलतात.'घोळा'म्हणजे घोडा.या बोलीत 'ड'साठी 'ळ' येतो.तर 'ईर' म्हणजे वेळ , 'ळ' साठी 'र'येतो.
प्रश्न ३- 'आंदुळो' ,'घोऊश' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
अ)चित्पावनी कोकणी
ब)मावळी
क)घाटी
ड)भिल्ली
उत्तर-अ-चित्पावनी कोकणी
रत्नागिरी,वेंगुर्ले,सावंतवाडी,गोमंतकाचा काही भाग इत्यादी भागातील ब्राह्मण लोक जी भाषा बोलतात ती चित्पावनी होय.यामधे सानुनासिक उच्चारण अधिक असते.ओकारान्त शब्द अधिक असतात. 'आंदुळो'म्हणजे झोपाळा तर 'घोऊश'म्हणजे नवरा.
प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्यांचे अभिनंदन!!
डाॅ. अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा
No comments:
Post a Comment