Sunday, January 14, 2018

१३ जानेवारी,२०१८

🚩ज्ञानभाषामराठीपंधरवडा🚩

#वाचनीय

प्रवाळ बेटे

सागरामध्ये असणाऱ्या प्रवाळाच्या (coral) अतिसूक्ष्म कीटक अवशेषापासून ही बेटे तयार होतात. प्रवाळ कीटक सागराच्या पाण्यातील कॅल्शियमचे क्षार शोषून घेऊन त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रुपांतर करतात. हे सूक्ष्म जीव एकाच ठिकाणी मोठ्या वसाहतीने वाढलेले असतात व त्यांच्या पासून सागरपृष्ठावर बेटे निर्माण झालेली असतात.

बहुतेक प्रवाळ बेटांची निर्मित कुठल्याही खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर झालेली आढळते. पूर्व किनाऱ्यावर सागरजल तापमान त्या मानाने अधिक असल्यामुळे असे घडते. पॅसिफिक व हिंदी महासागरात प्रवाळ खडक मोठ्या प्रमाणावर आहेत.

जगातील सर्वातमोठी प्रवाळ खडकांची रांग म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस असलेली सुमारे १९२० किमी लांबीची *‘ ग्रेट बॅरिअर रीफ’ (Great Barrier Reef)*ही होय.
गेल्या काही वर्षात जल-वायू परिवर्तानाचे परिणाम प्रवाळांवर ही दिसू लागलेत. समुद्री पाण्याच्या वाढत्या तापमानामुळे या प्रवाळबेटांवर औष्णिक ताण दिसू लागला आहे आणि त्यांचा रंग फिक्का होणे हे सगळ्यात जास्ती आढळते आहे.

संकलन:- निवेदिता खांडेकर

समूह:- ज्ञानभाषा मराठी मुख्य समूह प्रशासक,ज्ञानभाषा मराठी विदर्भ विभाग

संदर्भ: डायमंड भूगोल – पर्यावरणशास्त्र कोश आणि इंटरनेट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#ज्ञानभाषामराठीपंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञानकथा

फुंटर

चिकन मसाला- प्रोटिन धागे १०० ग्रॅम, फॅट ५ ग्रॅम, टेस्टमेकर ५ ग्रॅम, थिकनिंग एजेंट १० ग्रॅम, वेळ : तीन मिनिटे.

प्रकाशने सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट केली. समोरच्या सूचना पटकन वाचून घेतल्या. आतमध्ये त्या त्या गोष्टी टाकल्या आहेत याची खात्री करून घेतली आणि बटण दाबलं.

फूंटर गप्पच होता.

पॉवरचा लाल डोळा सुरू आहे ना?  केबल नीट जोडली गेलीय ना? प्रकाशने पुन्हा एकदा हे बघून घेतलं. पण फूंटर शांत होता.

‘‘ए वेडय़ा- कर की प्रिंट, जाम भूक लागलीय गडय़ा.’’ दोन-चार थपडा मारत प्रकाशने आपला राग काढला.

फूंटर अजिबात दाद देत नव्हता.

मग प्रकाशने सगळी सेटिंग्ज तपासली. फूंटर ऑफ करून परत सुरू केला.

पण तो छापायचं नाव काढत नव्हता.

‘‘रुसला वाटतं. चला घेऊन जाऊ  दुरुस्तीला. पण थांब हं जरा सख्या, थोडं खाऊन घेतो.’’

घरात खूप शोधून शोधून प्रकाशला एक संत्रं आणि थोडं दूध मिळालं. दोघांचीही चव त्याला आवडली नाही, पण नाईलाज होता.

फूंटर सर्व्हिस सेंटरवर लांबलचक रांगा होत्या.

‘‘तुमचा कधी बिघडला?’’ रांगेतल्या एकाने प्रकाशकडे चौकशी केली.

‘‘आताच. लगेच आलो इकडे. फूंटर थ्री-डी प्रिंट करून फूड देत नाही, तर खायचं काय?’’

‘‘तर काय! मी पण बाकीची सगळी कामं टाकून अश्शी इकडे धावत आले.’’ एका बाईने आपली कैफियत मांडली.

‘‘इथे वेळ लागेल वाटतं, दुसरं सर्व्हिस सेंटर कुठे आहे माहीत आहे का कोणाला?’’ एका तरुणाने विचारणा केली.

प्रकाश त्याला घेऊन जायला तयार झाला. पण त्या सेंटरवरही माणसांची गर्दी होती.

‘‘एखादं स्टोअर बघून काही खायला घेतो आणि मग घरी जातो. उद्या-परवा बघतो.’’ प्रकाशने आपला निर्णय जाहीर केला.

पण जवळच्या चारही दुकानातला सगळा माल संपला होता. २०० किलोमीटर परिसरात फिरूनही प्रकाशला एकाही दुकानात साधी बिस्किटं की दूध मिळालं नाही.

मग नाईलाजाने तो एका महागडय़ा रेस्तराँमध्ये गेला. शहरात अशी दोन-तीन रेस्तराँ फक्त होती. कधीमधी चैन करायला, पाटर्य़ा करायला म्हणून. फटाफट थ्री-डी फूड प्रिंट करणारा फूंटर घरोघरी पोहोचल्यापासून पिझ्झा डिलिव्हरी, डोसा स्टॉल, वडापाव गाडी- सगळं बंद

झालं होतं.

आठवडा झाला तरी कोणाचेच फूंटर दुरुस्त होऊ शकले नाहीत.

दरम्यान फुडी नावाचा एक छोटा स्टॉल कोणीतरी सुरू केला. तो तुफान चालला. एक छोटा फुडी कॅफे हळूच उघडला. तिथला बिझनेस बघता बघता

दुप्पट झाला.

बघता बघता छोटीमोठी रेस्तराँ सुरू झाली. लोकं तिथे जमून गप्पा मारत मारत नवनव्या पदार्थावर ताव मारायला लागली.

‘‘किती बरं वाटतं नै, असं निवांत बोलत बोलत खायला’’ प्रकाशची मैत्रीण नंदा कॅफेत बसून बोलत होती. ‘‘नाहीतर आधी आपण फूंटरमधून काहीतरी काढून एकटय़ाने खाणं उरकून घ्यायचो अगदी.’’

प्रकाशने मान डोलावली.

‘‘हो की नै रे- त्याची चव काही खास नाही लागायची. हे खाणं मस्त स्वादिष्ट आहे नै?’’ तिचं गुणगान चालूच होतं.

‘‘हो. हो.’’

‘‘मला तर बाई असं खूप खूप आवडायला लागलंय.’’

‘‘अगं एवढा वेळ कोणाला? मला फूंटर केवढा सोयीचा पडायचा.’’

‘‘सोय होती खरी. पण लज्जत कुठे? आणि एरव्ही आपण असे बोलत बसलो असतो का?’’

काही दिवसांनी सगळे फूंटरला विसरले. फूड प्रॉडक्ट्स आणि फूड स्टॉल्सचे दिवस चांगले आले. बेकऱ्या सुरू झाल्या. मिठाईवाले आले. कसल्या-कसल्या खाण्याच्या गाडय़ा दिसायला लागल्या. इकडे फूड प्रोसेसिंग कंपन्यांचे शेअर्स वधारले.

मग काही जणांना घरी स्वयंपाक करण्याची कल्पना सुचली. अर्थात २०५० मधल्या त्या चिमुकल्या घरांमध्ये किचन अशी काही गोष्टच नव्हती. तरी पण काही जणांनी हौसेने इलेक्ट्रिक शेगडय़ा आणून एका कोपऱ्यात ठेवून काहीबाही शिजवायला सुरुवात केली.

कोणी बटाटे शिजवून बघितले. कोणाला स्वत: बनवलेला भात आवडला.

मग त्यांनी हळूहळू हे सोशल नेटवर्कवर शेअर करायला सुरुवात केली. बाकीच्यांना त्यांच्या

फोटोंचं अप्रूप वाटायला लागलं. काहींनी आपल्या अर्ध्यामुर्ध्या पाककृती अपलोड केल्या. इतरांनी त्यात आपली भर घालायला सुरुवात केली. या सगळ्याचा एक मोठ्ठा ट्रेंड सुरू झाला.

काही जणांनी तर कहर केला. मित्रमंडळींना बोलावून स्वत:च्या हाताने केलेले पदार्थ खिलवायला सुरुवात केली. त्याला फार धाडस लागत होतं अर्थात. कारण बाजारातून वेगवेगळ्या वस्तू आणायच्या, त्या कापून-बिपून शिजवायच्या- केवढी मेहनत होती.

प्रकाशला मात्र आपल्या फूंटरची फार आठवण यायची. त्याने तो दुरुस्त करण्याचे खूप प्रयत्न केले होते. पण थ्री-डी फूड प्रिंट करणारं ते यंत्र महाक्लिष्ट होतं. त्यातून जगात केवळ एकाच कंपनीकडे त्याचे मालकी हक्क होते. किंबहुना त्याच कंपनीने मुद्दाम सॉफ्टवेअर बदलून सगळे फूंटर्स निकामी केले अशी वदंता

होती. कारण तीच आता फूड प्रोसेसिंगमधली अग्रेसर कंपनी होती.

काही का असेना, त्या निमित्ताने लोकांची जीवनशैली बदलली होती. काजू फळाच्या बाहेर असतो आणि मटार शेंगांच्या आत असतो अशा नवनव्या ज्ञानाने सगळे रोमांचित व्हायला लागले होते. गाजरं जमिनीखाली असतात तर भोपळे गलेलठ्ठ असून चक्क नाजुकशा वेलीला लागतात, अशासारख्या माहितीने सगळे साफ नादावून गेले.

काही जणांनी तर शहरांपासून लांब लांब जाऊन भाज्यांचे मळे पाहण्याच्या सहली आखल्या. धान्य ठरावीक मोसमात पिकतं म्हटल्यावर काहींनी त्या त्या मोसमात शेतांना भेट देण्याच्या योजना बनवल्या. सगळे कसे खाद्यमय होऊन गेले होते.

प्रकाशला एकीकडे हे नवं फॅड ठीक वाटत होतं. पूर्वीही तयार जेवण मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे, फास्ट फूड, मग स्लो फूड, इंटरनॅशनल फूड, मग देसी फूड अशी फॅडं होऊन गेलेली त्याला माहीत होती. हेही स्वत: ताजं बनवायचं फॅड वाईट नव्हतं. पण दुसरीकडे फूंटरची कल्पना काही स्वस्थ बसू देत नव्हती. ज्या कंपनीने फूंटर पहिल्यांदा बनवला, त्यावेळी कोणीतरी जबरदस्त डोकं चालवलं असणार. मग आपणही प्रयत्न करून बघू या, म्हणत त्याने आपलं संशोधन गुपचूप सुरू ठेवलं होतं. पुढे त्याच्या मुलानेसुद्धा हे काम सोडलं नव्हतं.

मग दोन पिढय़ांनंतर प्रकाशच्या नातीने- रश्मीने परत फूंटर बाजारात आणला. नवीन सुधारित आवृत्तीचा. वेगळी टेक्नॉलॉजी वापरणारा. बाहेर खाऊन नाहीतर स्वत: करून कंटाळलेल्या माणसांना हा पर्याय बरा वाटला. घरच्या घरी ठरावीक साहित्य टाकून थ्री-डी प्रिंट करून जेवून घ्यायचं त्यांना हवंसं वाटलं. त्यांनी भराभर फूंटरवर उडय़ा टाकल्या.

किंमत भारी असल्याने फूंटर मिरवायची गोष्ट झाली. आता सोशल नेटवर्कवर त्याचे फोटो यायला लागले. फूंटरमुळे कितीतरी मोकळा वेळ मिळतोय अशी प्रशंसा ऐकायला मिळायला लागली.

पुन्हा एकदा तेच चक्र सुरू झालं.

दरम्यान रश्मीने फूड प्रोसेसिंग कंपन्यांचे घसरायला लागलेले शेअर्स घेऊन ठेवायला सुरुवात केली.

-प्रज्ञा सहस्त्रबुद्धे
prad1nya2@gmail.com

संदर्भ : दै. लोकसत्ता ११ ऑक्टोबर २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

दि.१३/१/२०१८

🧐मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- 'इस्पितळ',' कप्तान' ,'कंत्राट' हे शब्द कोणत्या गटात मोडतात?

अ) अपभ्रंश
ब)इंग्रजी अपभ्रष्ट
क)देशी
ड)हिंदी

उत्तरे-ब-इंग्रजी अपभ्रष्ट

ज्या इंग्रजी शब्दांचे यथामूल उच्चारण मराठी भाषिकांना अवघड वाटते आणि म्हणून त्यांचे सुरभीकरण करण्यात आलेले आहे.अशा 'अपभ्रष्ट'इंग्रजी शब्दांची एक यादी डाॅ. म.अ.करंदीकर यांनी प्रकाशित केलेली आहे.त्यांच्या मते अन्य भारतीय भाषांपेक्षा वापरात येणाऱ्या अपभ्रष्ट इंग्रजी शब्दांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४५६ इतके आहे.या शब्दांनाही एका अर्थाने इंग्रजी तद्भव शब्द असे म्हणता येईल.कारण इंग्रजी नवीन शब्दांचा सतत होणारा परिचय आणि त्यांचे मराठीकरण ही प्रक्रिया भाषेत सतत चालू असते.ग्रामीण भागातील लोकांनाही इंग्रजी शब्द वापरण्याची आवश्यकता भासते,आवड असते आणि ते आपल्या पद्धतीने इंग्रजी शब्दांचे उच्चारण करीत असतात.आज इंग्रजी शब्दांसाठी 'इंग्रजी अपभ्रष्ट' हा प्रकार नावारुपाला आला.भविष्यात अन्य भाषांतील शब्दांसाठी अनेक प्रकार जन्माला येण्याची शक्यता भाषा विज्ञान नाकारत नाही.

प्रश्न २- नाताळ,पगार,लिलाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले?

अ)अरबी
ब)फ्रेंच
क)पोर्तुगीज
ड)इंग्रजी

उत्तर-क-पोर्तुगीज

१५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवे जिंकून घेतले तेव्हापासून पश्चिम किनाऱ्यानजिकच्या मुलूखावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली.त्यांच्या स्वामित्वाखालील प्रदेश कमी अधिक प्रमाणात होत राहिला तर काही प्रदेश सातत्याने जवळ जवळ ४५० वर्षे त्यांच्या ताब्यात होता.साहजिकच पोर्तुगीज शब्दांशी परिचय होऊन ते मराठीत दाखल होणे अटळ होते.

प्रश्न ३-अंमलदार,हुकूम,मालमत्ता,इमारत हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले?

अ) उर्दू
ब)अवेस्ता
क)जर्मन
ड)फारसी

उत्तर-ड-फारसी

डाॅ. माधवराव पटवर्धनांच्या फारसी-मराठी कोशात सुमारे ५६०० फारसी शब्द व वाक्प्रचार समाविष्ट आहेत. डाॅ यू.म.पठाण यांनी केवळ मराठी बखरीत आढळलेले ३५०० शब्द आणि ९०० वाक्प्रचार आपल्या प्रबंधात अंतर्भूत केले आहेत.त्यावरून असे दिसते की ,फारसी शब्दांचे हे आक्रमण केवळ शासकीय व्यवहारापुरते मर्यादित नसून लोकजीवनाची सर्व क्षेत्रे त्यांनी व्यापली आहेत.

प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्यांचे अभिनंदन!!

डाॅ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

1 comment:

  1. Borgata Hotel Casino & Spa - Mapyro
    Find Borgata 메이피로출장마사지 Hotel Casino & Spa, Atlantic City (NJ) location 수원 출장샵 in New Jersey. Get directions, reviews and information 충청북도 출장안마 for 평택 출장샵 MGM Resorts International in 구미 출장안마

    ReplyDelete